पुणे ः देशातील जैव उत्तेजके (बायो स्टुम्युलंस्ट) नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत ठेवा. अकारण, कोणत्याही अडचणींना उत्पादकांना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्या, अशा शब्दांत केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्याचे कान टोचले आहेत.
केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या सहसचिव प्रिया रंजन यांनी हरियाना कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना एका पत्रात केलेला उल्लेख जैव उत्तेजकेनिर्मिती उद्योगात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, हरियानापेक्षाही जास्त गोंधळ महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे केंद्राने लक्ष घालण्याची गरज आहे.
तात्पुरत्या मान्यतेसाठी नाहरकत महत्त्वाची देशात जैव उत्तेजकांना सध्या मान्यता नाही. त्यामुळे या क्षेत्रातील अंधाधुंदी थांबविण्यासाठी उत्पादनांना कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे. त्यासाठी केंद्राने कायद्यात सुधारणा केली असून, जैव उत्तेजकांना पहिल्या टप्प्यात तात्पुरती मान्यता दिली जाणार आहे. ‘‘मान्यतेकरिता उत्पादकांनी आधी त्या त्या राज्यातील कृषी विभागाकडे अर्ज करावेत व नाहरकत दाखले प्राप्त करून आमच्याकडे प्रस्ताव पाठवावेत,’’ असे केंद्राने सुचविले आहे. नाहरकत दाखले वाटपाची प्रक्रिया महाराष्ट्रापुरती कृषी आयुक्तालयाकडून राबविली जात आहे. मात्र आयुक्तालयात सध्या शेकडो अर्ज संशयास्पदपणे पडून आहेत. त्यामुळे केंद्राने दिलेली सूचना राज्याच्या कृषी विभागाने पुन्हा एकदा वाचावी आणि अमलातही आणावी, अशी अपेक्षा कृषी उद्योजक व्यक्त करीत आहेत.
३१ मार्चपूर्वी वितरणाचा प्रयत्न ‘‘३१ जानेवारीपूर्वी तात्पुरत्या नोंदणीसाठी उत्पादकांना प्रस्ताव द्यायचे आहेत. त्यासाठी जी २ प्रपत्रे वितरणाची प्रक्रिया सुटसुटीत राबवावी. त्यामुळे या उत्पादकांना आम्हाला ३१ मार्च २०२२ पूर्वी जी ३ प्रपत्रांचे वितरण करता येईल,’’ असे केंद्रीय सहसचिवांनी स्पष्ट केलेले आहे. केंद्रीय खत नियंत्रण आदेश १९८५ मधील ‘२०-सी’मधील तरतुदीनुसार जैव उत्तेजक उत्पादने आता कायदेशीर झालेली आहेत. मात्र अशा उत्पादनांची तात्पुरती व कायम नोंदणी कऱण्यासाठी जी १, जी २, जी ३ ही प्रपत्रे प्राप्त करणे आता उत्पादकांना कायदेशीरदृष्ट्या अत्यावश्यक झालेले आहे.
विनाकारण कागदपत्रांची मागणी काही राज्ये जी २ प्रक्रियेशी संबंधित नसलेली कागदपत्रे देखील जैव उत्तेजके उत्पादकांकडून अकारण मागवत आहेत. आपण जैव उत्तेजके उत्पादकांना तात्पुरती नोंदणी याकरीता देत आहोत की, त्यांनी नव्या कायद्यामुळे त्यांची उत्पादने बंद करता कामा नये. या उत्पादकांना कायम नोंदणीसाठी विषाक्तता (टॉक्सिकॉलजी) व कृषिविषयक कार्यक्षमता (अॅग्रोनॉमिक इफिकसी) पुरेसा वेळ मिळावा, याकरिता देखील ही प्रक्रिया राबविली जात आहे, असेही केंद्राने नमूद केले आहे.
प्रपत्रांसाठी राज्यांनी तयार केला संभ्रम जी १, जी २ ही प्रपत्रे राज्य शासनाने संबंधित उत्पादकाला द्यायची आहेत. संबंधित उत्पादक त्याचे उत्पादन (प्रॉडक्ट) गेल्या तीन वर्षांपासून आमच्या राज्यात विकतो आहे. ते उत्पादन पर्यावरण किंवा मानवी आरोग्याला घातक किंवा बाधा आणणारे नाही, असे या प्रपत्रातून राज्य शासनाने स्पष्ट लिहून द्यायचे आहे. मात्र, देशात विविध राज्यांकडून जी २ प्रपत्रासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी केली जात आहे. मुळात, जी २ साठी नेमके काय करायचे आहे, या बाबत गेल्या २ ऑगस्ट २०२१ रोजीच्या पत्रात आम्ही स्पष्ट नमूद केलेले आहे, असेही केंद्रीय कृषी मंत्रालयाचे म्हणणे आहे.
अप्रचार केला जात असल्याचा दावा आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जी १, जी २ प्रपत्रे देण्याचे काम राज्यात सुरळीतपणे सुरू आहे. उलट या क्षेत्रात चुकीचे काम करणारे घटक मुद्दाम आयुक्तालयाबाबत अपप्रचार करीत आहेत. केंद्राने सदर पत्र हरियानाला पाठविले आहे. त्यामुळे त्याचा संबंध महाराष्ट्राशी जोडणे गैर आहे. राज्यात काही प्रस्तावांना उशीर होतो आहे हे खरे आहे. मात्र, कामकाज कायदेशीरदृष्ट्या काळजीपूर्वक केले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.