कांदा दरप्रश्नी राहुरी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले
कांदा दरप्रश्नी राहुरी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले 
मुख्य बातम्या

लिलावात कांद्याला दर कमी निघाल्याने राहुरीत शेतकऱ्यांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन

राहुरी, जि. नगर  : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी निघाल्याने, मंगळवारी (ता. २४) दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांच्यात मध्यस्थी करून, यशस्वी तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

राहुरी बाजार समितीत मंगळवारी सकाळी कांद्याचे लिलाव सुरू झाले. तेव्हा, चांगल्या प्रतीच्या कांद्याला चार ते पाच हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता. परंतु, सोमवारी वांबोरी उपबाजार येथे झालेल्या लिलावांपेक्षा प्रतवारीनुसार पाचशे ते सातशे रुपये भाव कमी निघत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. मंगळवारी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्ग रोखला. दुपारी तीन वाजेपर्यंत शेतकरी रस्त्यावर बसून होते. 

दरम्यान, दीड वाजता बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख शेतकऱ्यांसमोर आले. शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींना बाजार समितीच्या कार्यालयात चर्चेला बोलविले. सहायक निबंधक दीपक नागरगोजे, उपसभापती अण्णासाहेब बाचकर, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, संचालक रमेश पवार, कांदा व्यापारी सुरेश बाफना, प्रमोद बजाज, दिलीप चोरडिया, चंद्रकांत पानसंबळ, तुळशीराम कडू, शेतकरी अजय लिप्टे (पढेगाव), भीमाशंकर शिंदे व नारायण गायकवाड (दोघेही रा. चांदेगाव), किरण भुसे (केंदळ), किशोर कोहाकडे (बारागाव नांदूर), सुनील आढाव (मुसळवाडी) यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

तहसीलदार शेख म्हणाले, की बेंगळूर (कर्नाटक) येथून सोमवारी नवीन कांद्याच्या पाचशे ट्रकची आवक झाल्याने, कांद्याचे दर कमी झाल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

सभापती तनपुरे म्हणाले, की मी शेतकरी आहे. आंदोलनाशी सहमत आहे. पंधरा दिवसांत कांद्याचे दर साडेपाच हजार रुपयांपर्यंत वाढले. परंतु, मागणी व पुरवठा यावर दराची चढ-उतार होते. 

सकाळी झालेले फेरलिलाव होणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना दर मान्य नाहीत. त्यांचे लिलाव स्थगित ठेवले जातील. पुढील लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याचे लिलाव साडेतीन हजार रुपयांच्या पुढे होतील, असे चर्चेअंती ठरले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT