Wheat Production
Wheat Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Production: यंदाही गव्हाला उष्णतेचा फटका बसणार? जादा उत्पादनाचा सरकारचा अंदाज हुकणार?

Team Agrowon

वाढत्या तापमानाचा गव्हाच्या पिकावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे.

प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

त्यामुळे यंदाही गव्हाच्या उत्पादनाला फटका बसेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात प्रचंड वाढ झाल्याने गहू पिकाला मोठा फटका बसला होता.

त्यामुळे निर्यातीला प्रचंड मागणी असूनही केंद्र सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात रातोरात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली.

या पार्श्वभूमीवर यंदा केंद्र सरकार ताकही फुंकून पिण्याच्या मनःस्थितीत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने समिती नेमली आहे. केंद्रीय कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये प्रमुख गहू उत्पादक राज्यांमधील प्रमुख अधिकारी आणि शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

जगात सर्वाधिक गहू पिकवणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला केंद्र सरकारने गहू उत्पादनाबाबत अंदाज जाहीर केला होता.

यंदाच्या वर्षी गहू उत्पादन ४.१ टक्के वाढून विक्रमी ११२.२ दशलक्ष टनावर पोहोचेल, असे केंद्र सरकारने म्हटले होते.

परंतु उत्तरेकडील राज्यांमध्ये, जिथे गव्हाची सर्वाधिक लागवड केली जाते, हिवाळी पाऊसच झाला नसल्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यात दैनंदिन सरासरी तापमान वाढलेले होते. एरवी मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतर जितकं तापमान असतं, ती पातळी गेल्या आठवड्यातच गाठली गेल्याचे, हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तापमानवाढीचा परिणाम गहू पिकाच्या वाढीवर होईल, अशी शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.    

"सरकारने वाढत्या तापमानाचा गहू पिकावर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे; परंतु सध्या पिकाची अवस्था उत्तम दिसतेय," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता, २०) जाहीर केलेल्या निवेदनानुसार या आठवड्यात देशातील काही राज्यांमध्ये कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

सरासरीपेक्षा हे तापमान ९ अंशाने जास्त आहे. पुढील तीन दिवसांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंश सेल्सिअस अधिक राहण्याची शक्यता आहे, असे ‘आयएमडी'ने म्हटले आहे.

गहू पक्वतेच्या, दाणे भरण्याच्या अवस्थेत तापमान जास्त राहिले तर त्यामुळे उत्पादनात घट येते, असे ‘आयएमडी'ने सांगितले.

भारतात गव्हाचे वर्षातून एकदाच म्हणजे रब्बी हंगामात पीक घेतले जाते. गव्हाची लागवड ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि मार्चपासून पिकाची काढणी सुरू होते.

प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT