Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean rate : सोयाबीन सहा हजाराचा टप्पा ओलांडणार का?

टीम ॲग्रोवन

सोयापेंड (सोयामील) निर्यातीसाठी (Soymeal Export) पोषक स्थिती असल्यामुळे सोयाबीनच्या भावाला (Soybean Rate) आधार मिळणार आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला आता प्रति क्विंटल ५,४००-५,५०० रुपयांचा दमदार आधार राहील; तसेच सध्याचा ५,७००-५,८०० हा भाव आठवडाभर राहिल्यास सोयाबीन उर्वरित नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पहिला पंधरवडा या कालावधीत ५,४५० ते ६,२५० या मोठ्या कक्षेत राहील असे बाजारविश्लेषकांचे म्हणणे आहे.

यंदाच्या हंगामात सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सुरू झाली तेव्हा दर दबावात होते. आवक सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये सोयाबीन सुमारे १५ टक्के घसरले. काही बाजारपेठांमध्ये चार हजार रूपये क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला. सोयाबीनचा हमीभाव ४३०० रूपये आहे.

परंतु नंतरच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, मागणी-पुरवठ्याचे चित्र, भारतात खाद्यतेल आणि तेलबियांवरील साठा मर्यादा (स्टॉक लिमिट) उठवण्याचा सरकारचा निर्णय आदी गोष्टींमुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली.

दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात नेणे बंद केले आणि साठवणूक करू लागले. त्यामुळे पुढील तीन आठवड्यात सोयाबीन परत साडेपाच-सहा हजाराजवळ पोहोचले. गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर किंचित कमी झाले. परंतु आता सायोपेंड निर्यातीचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे दराला मजबुती मिळण्याची शक्यता आहे.

भारतातून होणारी सोयापेंड निर्यात पुढील काही महिन्यांत वाढती राहील, असे सॉल्वन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एसईएचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी सांगितले. चालू हंगामात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताची सोयापेंड निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८ टक्के घटली.

परंतु आता परिस्थिती सुधारत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निर्यात वाढलीय. ऑक्टोबर महिन्यात ४० हजार १९६ टन सोयापेंड निर्यात झाली. तर सप्टेंबरमध्ये फक्त १३ हजार ७१८ टन सोयापेंड निर्यात झाली होती. म्हणजे महिनाभरात निर्यातीत सुमारे १९३ टक्के वाढ झाली.

महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराच्या तुलनेत भारतातील सोयापेंड महाग पडत होती. परंतु आता सोयाबीनला प्रति क्विंटल ५७०० ते ५८०० रूपये दर मिळत असून निर्यातीच्या किमतीतही पडतळ बसत आहे. त्यामुळे निर्यात वाढलीय, असे मेहता म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सायोपेंडेच्या किंमतीत किंचित घट होऊ शकते.

भारतातील सोयापेंड निर्यात आता वाढत जाईल, असे त्यांनी सांगितले. सोयापेंड निर्यात वाढल्यास त्याचा सोयाबीन उत्पादकांना थेट फायदा होईल. भारताची एकूण ऑईलमील निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के वाढली असल्याचेही एसईएने म्हटले आहे. भारतात उत्पादित होणारे सोयाबीन नॉन जीएम असल्याचा फायदाही सोयापेंड निर्यातीसाठी होतोय. काही युरोपीय देश नॉन जीएम सोयापेंडला पसंती देत असल्याने तिथे भारतीय सोयापेंडीला मोठी मागणी आहे.

दरम्यान, पामतेलाच्या किंमतींतही सुधारणा होत आहे. गेल्या काही महिन्यांत पामतेलाच्या किंमतींत मोठे चढ-उतार बघायला मिळाले. परंतु आता पामतेलाच्या किंमती ८ ते १० टक्के वाढण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती मलेशियन पाम ऑईल बोर्डाचे महासंचालक अहमद परवीज गुलाम यांनी दिली. ग्लोबल व्हेज ऑईल ॲन्ड ऑईलसीड राऊंट टेबल कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. पामतेलाची मागणी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही बाबही सोयाबीनच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

सोयाबीनचे क्रशिंग केल्यानंतर सोयापेंड आणि सोयातेल ही उत्पादने तयार होतात. या उत्पादनांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत किती मागणी आहे, त्यांची दरपातळी काय आहे, यावर सोयाबीनचे दर ठरतात.

सोयातेलाची थेट स्पर्धा पामतेलाशी असते. पामतेलाचे दर वाढले की सोयातेलाच्या दरावरही परिणाम होतो. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता सोयापेंड आणि सोयातेल या दोन्हींसाठी स्थिती सध्या तरी अनुकूल दिसते आहे. त्यामुळे सोयाबीनमध्ये मोठ्या मंदीची शक्यता दिसत नाही. शेतकऱ्यांनी पाच हजार ते सहा हजाराच्या भावपातळीवर लक्ष ठेऊन टप्प्याटप्प्याने माल विकेणे फायदेशीर ठरेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT