Sugar Export
Sugar Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar export: यंदा साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज फसणार? साखर उत्पादन घटल्यास निर्यातीवर काय परिणाम होईल? 

Team Agrowon

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही देशात अतिरिक्त ऊस असून साखरेचे (Sugar Production) बंपर उत्पादन होईल, असे आजवर सांगितले जात होते. परंतु रॉयटर्स वृत्तसंस्थेने सोमवारी (ता. ५) यंदा साखर उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा ७ टक्के घट होण्याचा अंदाज असल्याचे वृत्त दिले. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात (Karnatka) ऊस उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने साखर उत्पादनात घट अपेक्षित आहे. रॉयटर्सने शेतकरी, साखर कारखनदार आणि व्यापारी यांच्याशी बोलून हा निष्कर्ष काढला आहे.

रॉयटर्सने वर्तवलेल्या या अंदाजामुळे खळबळ उडाली आहे. कारण साखरेचे जादा उत्पादन होईल, असे गृहित धरून धोरणं आखली जात आहेत. त्या हिशोबानेच केंद्र सरकारने साखर निर्यातीचे नियोजन केले होते. साखर निर्यातीसाठी दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त कोटा मिळावा, यासाठी साखर उद्योगाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु साखर उत्पादन कमी राहण्याचे वृत्त आल्यामुळे या सगळ्या नियोजनाला सुरूंग लागण्याची शक्यता आहे.

हवामानात झालेल्या टोकाच्या बदलांचा ऊस पिकाला फटका बसला असून त्यामुळे उत्पादनात घट येणार असल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. ऊस उपलब्धता कमी राहिल्यास अर्थातच साखरेचे उत्पादन घटणार. त्यामुळे साखर निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक बाजारात साखरेचे दर चढे राहण्यासाठी भक्कम आधार मिळणार आहे. भारताचे स्पर्धक असलेल्या ब्राझील आणि थायलंडमधून साखर निर्यात वाढू शकते.

"यंदा उसाचं पीक गेल्या वर्षीइतकंच चांगलं दिसत होतं. पण जेव्हा आम्ही ऊसतोड सुरू केली तेव्हा लक्षात आलं की यंदा टनेज खूप कमी येणार आहे," प्रदीप जगताप म्हणाले. ते सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांचा नऊ एकराचा उसाचा मळा आहे. गेल्या वर्षी नऊ एकरातून ७५० टन ऊस उत्पादन झाले होते; यंदा उत्पादन ५३० टनावर घसरेल, असा त्यांचा अंदाज आहे. रॉयटर्सने जगताप यांच्यासह राज्यातील ११ प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांतील १९२ शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यात पावसात पडलेला मोठा खंड आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे.

"यंदा उन्हाळा कडक होता. त्यानंतर जुलैमध्ये पावसाने धुमाकूळ घातला," कोल्हापूरचे बबन करपे म्हणाले. शेतकऱ्यांनी सर्वसाधारपणे १५ टक्के उत्पादनघट असल्याचे सांगितले. परंतु काही पट्ट्यांमध्ये मात्र हेक्टरी ३५ टक्के नुकसान झाल्याचे शेतकरी म्हणाले.

भारत साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात देशातील एक तृतियांश साखर उत्पादन होते. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या चालू गळीत हंगामात राज्यातील साखर उत्पादन १३८ लाख टन राहण्याचा सुरूवातीचा अंदाज होता. गेल्या वर्षी १३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. परंतु आता उत्पादनात १५ टक्के घट होणार असेल तर राज्याचे साखर उत्पादन ११७ लाख टनावर घसरेल, असे एका साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. एका ट्रेड हाऊसच्या डिलरनेही त्याला दुजोरा दिला.

महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे कर्नाटकातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या ६० लाख टनावरून यंदा ५५ लाख टनावर येण्याची शक्यता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादन घटणार असल्याने देशाचे साखर उत्पादन ३३३ लाख टनावर येण्याची शक्यता आहे, असे साखर कारखानदारांनी सांगितले. गेल्या हंगामात विक्रमी ३५८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. केंद्र सरकारने यंदा पहिल्या टप्प्यात ६१.५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) दुसऱ्या टप्प्यात सरकारने आणखी ४० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आता साखर उत्पादनात घटीचा अंदाज आल्याने सरकार दुसऱ्या टप्प्यात अगदी कमी साखर निर्यातीचा कोटा जाहीर करेल किंवा कदाचित दुसऱ्या टप्प्यात साखर निर्यातीला परवानगीच देणार नाही, असे मत मुंबईस्थित ग्लोबल ट्रेडिंग हाऊसच्या एका डिलरने व्यक्त केले.  

यंदा देशातील साखर उत्पादन ३३३ लाख टन होण्याची शक्यता आहे. साखरेची देशांतर्गत गरज २७५ लाख टन राहील. ती पूर्ण करण्यासाठी पुरेशी साखर उपलब्ध होण्याची तजवीज झाल्यावरच सरकार साखर निर्यातीला परवानगी देईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. 

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT