Tomato Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Market : राधासुता, तेव्हा कुठे जातो तुझा धर्म?

महारुद्र मंगनाळे

Tomato Market Review : खरं तर सोशल मीडियावरचे अर्धवट शहाणे विद्वान बघून शेतीबद्दल इथं लिहायची इच्छा हळूहळू संपुष्टात येतेय. पण गेल्या १५ दिवसांपासून टोमॅटोवर चाललेला गदारोळ बघून, अगदीच असह्य झालं म्हणून एक पोस्ट टाकली. पोस्ट साधी आहे- टोमॅटो परवडत नसतील तर खाऊ नका, बोंबलता कशाला? अतिशय योग्य मुद्दा आहे हा.

गेल्या नऊ वर्षांत किती वस्तूंचे भाव किती वाढले त्याची यादी करा. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस ही महत्त्वाची उदाहरणे आहेत. या तिन्ही बाबी जीवनावश्यक आहेत. यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही.

या तिन्हींची एवढी मोठी दरवाढ झाली, याविरुद्ध तुम्ही किती आरडाओरडा केला? एकदा तरी रस्त्यावर उतरलात का? सरकारला जाब विचारलात का? जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रचंड पिळवणूक करतेय; त्याविरुद्ध कधी आंदोलन केलंय का? कोणत्या टी.व्ही. चॅनेलने याविरुद्ध मोहीम उघडली का? याची उत्तरं नकारार्थी येतील.

पण वर्षभरात कधीतरी एकदा कांद्याचे भाव वाढतात; तेव्हा प्रचंड आरडाओरडा होता. टी.व्ही.वाले घरोघर बायकांच्या मुलाखती घेत फिरतात. कांदा भाववाढ हा राष्ट्रीय प्रश्‍न बनतो आणि देशभक्त सरकार पाकिस्तानमधून कांदा आयात करून देशातील कांद्याचे भाव पाडते. आठवा हे किती वेळा झालंय? किती वर्षांपासून होतंय? हाच कांदा कवडीमोल दराने विकला जातो, रस्त्यावर फेकावा लागतो तेव्हा किती ग्राहक असं म्हणतात, की सरकारने हा कांदा खरेदी केला पाहिजे?

खाद्यतेलाबाबतही नेहमी असंच होतं. तेलाच्या किमती वाढल्या, की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाववाढीची बोंब होते. राष्ट्रभक्त सरकार जगभरातून चढ्या किमतीने तेल आयात करते आणि भारतातील तेलबियांचे भाव पाडते.

शेतकऱ्यांच्या पदरी पडू पाहणारे चार पैसे या कृतघ्‍न मध्यमवर्ग आणि सरकारमुळे हिरावून घेतले जातात. शहरी विद्वानांनी याचा कधी तरी निषेध केला आहे काय? अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, की केवळ मध्यमवर्गीय मतदारांच्या या आरडाओरडीला घाबरून सरकार शेतकऱ्यांचा बळी देतं.

सहा महिने टोमॅटोची काय स्थिती होती? आजची ही दरवाढ होण्यापूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकले जात होते, ५० पैसे किलोने विकले जात होते, हे तुम्हाला आठवतंय का? तेव्हा सरकारने हे टोमॅटो किफायतशीर भावात विकत घ्यावेत, किमान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असं तुम्हाला वाटलं का? कितीतरी टोमॅटो उत्पादक टोमॅटोच्या या जुगारात बरबाद झालेत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर कशाला टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने खडे फोडताय?

दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बाजारात किरकोळ विक्रीमध्ये टोमॅटो ला १५०, १७० रु. किलो भाव मिळत असला तरी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना किती भाव मिळतोय? ४० रुपये किलो. अपवादात्मक ५० रुपये किलो. हा दर शेतकऱ्यांसाठी वाजवी असाच आहे. बाजार शेतकऱ्यांच्या ताब्यात नाही. बाजारावर शेतकऱ्यांचं कसलंच नियंत्रण नाही. त्यामुळे किरकोळ विक्रीचे दर काय असावेत, हे शेतकरी ठरवू शकत नाही. टोमॅटो तिप्पट दराने विकले जात असले, तरी तो फायदा शेतकऱ्यांकडं येत नाही.

तुम्हाला टोमॅटो कायम स्वस्तात मिळावे वाटत असतील, तर ते कसं शक्य आहे? टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळं उत्पादन मर्यादित झालं. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला म्हणून भाव वाढले. एवढी साधी बाब कशी काय लक्षात येत नाही?

टोमॅटोचे दर परवडत नसतील तर खाऊ नका, असं कोणी म्हणत असेल, तर तुम्हाला का राग येतो? विजेचे दर वाढले, ती महाग झाली, म्हणून तिचा वापर सांभाळून करता. पेट्रोल, गॅसबाबतही असंच करता. मग काही काळ टोमॅटोचा मर्यादित वापर करा किंवा टाळा, असं म्हटलं तर तुम्हाला मिरची का लागते? ‘गरीब की जोरू, सबकी भाभी’ असंच आहे ना हे!

ज्या सोशल मीडियावर शहरी विद्वान अक्कल पाजळत आहेत, त्याच्या डेटाचे दर बघता बघता किती वाढले? त्याबद्दल कधी तक्रार केलीत? कधी अंबानींच्या नावाने बोटं मोडलीत? तसं नाही करणार तुम्ही.

तुमची सरकारच्या एकाधिकारशाही विरुद्ध, हडेलहप्पी धोरणांविरुद्ध बोलायची हिंमत नाही. तुम्हाला दिसतो तो फक्त शेतकरी आणि शेतीमाल. भाववाढ सगळी चालते फक्त शेतीमालाची नको.

इतक्या सहजासहजी शेतीचं महत्त्व तुम्हा बांडगुळांच्या लक्षात येणार नाही. ज्या दिवशी अन्नधान्यासाठी जगासमोर भीक मागण्याची पाळी सरकारवर येईल, तुम्ही धान्यासाठी रेशनच्या लाइनला उभे राहाल; तेव्हाच तुमचे डोळे उघडतील.

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT