Nashik News : यंदा समाधानकारक पावसामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापासून राज्यात आगाप रब्बी उन्हाळ कांद्याच्या ठिकाणी लागवडी सुरू झाल्या. आता या कांद्याची काढणी सुरू झाल्याने बाजारात नवीन कांद्याची आवक टप्प्याटप्प्याने वाढत आहे. राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आवक होत आहे. तर कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर आवक सुरू झाली आहे. नवीन कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी २,१०० ते २,२०० रुपये दर आहेत.
गत खरीप हंगामात कांदापीक अतिवृष्टी व मान्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात सापडले. तर लेट खरीप कांद्याची आवक डिसेंबर महिन्यात सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी मध्यापर्यंत कांद्याचे दर सर्वसाधारण होते; मात्र पुन्हा आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसून आली. त्यातच आता नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे. मात्र ती दर वर्षीच्या तुलनेत दोन आठवडे उशिराने असल्याचे दिसते.
राज्यात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यापैकी आगाप लागवडीमधील सरासरी ११० दिवसांनंतर पुढील कांद्याची काढणी सुरू आहे. सध्या अहिल्यानगर, नाशिक, बीड, पुणे, सातारा जिल्ह्यांतून आवक सुरू झाली आहे. तुलनेत आवक कमी व प्रतवारी सर्वसाधारण असल्याचे दिसून येत आहे. मार्चअखेरपासून आवक वाढण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर येथे सर्वाधिक आवक
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक होत आहे. येथे आठवड्यातून तीन दिवस बंद गोणीमध्ये लिलाव होतात. २७ फेब्रुवारी रोजी ३१,११० क्विंटल, तर १ मार्च रोजी ३०,७९९ क्विंटल आवक होत आहे. ही आवक राज्यात सर्वाधिक आहे. २८ फेब्रुवारी रोजी पारनेर बाजार आवारात १०,२११ क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल सरासरी २,१२५ रुपये दर मिळाले. तर नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह नामपूर, सटाणा, उमराने, येवला, नांदगाव, चांदवड, नामपूर बाजार आवारात आवक सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यात लोणंद व बीड जिल्ह्यांत कडा येथे आवक सुरू झाली आहे.
राज्यातील आवक व दरस्थिती (क्विंटल रुपये १ मार्च रोजी)
बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी
अहिल्यानगर...३०,७९९...५००...२,६००...१,८५०
लासलगाव..९९५...१,८००...२,४४१...२,३००
विंचूर(लासलगाव)...७७५...१,९११...२,६२७...२,३००
कोपरगाव...२६४०...१,०००...२,६५१...२,२७५
शिरसगाव तिळवणी(कोपरगाव)...१,६८०...९००...२,०५०...१,९३०
मनमाड...१४१...६५०....२,२२३...२,००५
प्रामुख्याने आगाप लागवडी झालेल्या अहिल्यानगरसह बीड, पुणे जिल्ह्यांतून आवक होत आहे. बाजार समितीमध्ये अडते व खरेदीदारांची संख्या अधिक असल्याने स्पर्धात्मक दर मिळतो. तसेच बंद गोणीमध्ये लिलाव होतात. त्यामुळे नवीन गावरान कांद्याची आवक वाढत असून स्पर्धात्मक दर मिळत आहेत.अभय भिसे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगर
लासलगावसारख्या प्रमुख बाजारात आवक व प्रतवारीमध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढण्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे दर पडू शकतात. सरकारने हा मुद्दा विचारात घ्यायला हवा.मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव. जि. नाशिक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.