Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : जुलैमध्ये साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता

Sugar Rate : गेल्या वर्षीही या महिन्यात इतकाच कोटा दिला होता. यंदाच्या जूनच्या तुलनेत जुलैसाठी दीड लाख टन कोटा कमी केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने जुलैसाठी देशातील साखर कारखान्यांना २४ लाख टनांचा साखर कोटा दिला आहे. गेल्या वर्षीही या महिन्यात इतकाच कोटा दिला होता. यंदाच्या जूनच्या तुलनेत जुलैसाठी दीड लाख टन कोटा कमी केला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत साखर कोटा कमी दिल्याने याचा सकारात्मक परिणाम साखर दरावर होण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांत साखरेच्या दरात फार नसले तरी क्विंटलला ३० ते ५० रुपयापर्यंत वाढ अपेक्षित आहे. नवीन सरकार आल्यानंतर देशपातळीवरील साखर उद्योगातील अनेक संस्थांनी एमएसपी (किमान विक्री) मूल्य दरामध्ये वाढ करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.

किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) ४२०० रुपये प्रतिक्विंटल करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे एमएसपी वाढवण्याची आग्रही मागणी केली आहे.

२०१९ नंतर साखर विक्री दराकडे केंद्राने अजिबातच लक्ष दिले नाही, हे सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न या संघटनांचा सुरू आहे. विशेष करून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे.

पहिल्या टप्प्यातील काही निर्णयांमध्ये साखरेची एमएसपी वाढीचा निर्णय घ्यावा, यासाठी अधिकारी ते मंत्री यांच्याशी सातत्याने संपर्क करण्यात येत असल्याचे संघाच्या सूत्रांनी सांगितले. केवळ निवेदने न देता व्यक्तिशः: गाठीभेटी घेण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर एमएसपी वाढीबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. असा निर्णय झाल्यास साखर वाढीव दराने खरेदी करावी लागेल. या उद्देशाने व्यापारी सध्या खरेदीला प्राधान्य देतील असे चित्र आहे. त्यामुळे दरात थोडी का होईना वाढ होण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

अजूनही देशात मॉन्सून सक्रिय झाला नाही, यामुळे जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तरी जून इतकीच साखर विक्री होईल, असा अंदाज साखर कारखाना प्रतिनिधींचा आहे. साखर नंतर महाग खरेदी करावी लागेल. या शक्यतेने मागणी वाढेल. यामुळे जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तरी साखरेचे दर चढे राहतील, असा अंदाज व्यापारी सूत्रांचा आहे.

जुलैमध्ये साखरेचा उठाव राहण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील साखर राज्याबाहेरील बाजारामध्येही जात आहे. जूनच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत राज्यातच साखर विक्री होत होती. जूनच्या उत्तरार्धात राज्यातून काही रेल्वे रेक अन्य राज्यांमध्ये गेल्या.

यामुळे साखरेची विक्री झाली. विशेष करून महाराष्ट्रमध्ये जुलैमध्ये साखरेचा उठाव राहण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. त्या साखरेच्या किमती एक्स मिल ३५०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल इतके आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT