Latur / Dharashiv News : हमीभावाने सोयाबीन खरेदीची मुदत गुरुवारी (ता. सहा) संपत असतानाच दोन्ही जिल्ह्यातील ६३ हजारहून अधिक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मुदत संपत आल्यामुळे हे शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीपासून वंचित राहणार असून लातूर जिल्ह्यात तर वीस हजार क्विंटलचे वाढवून दिलेले उद्दिष्टही गुरुवारी संपण्याच्या मार्गावर होते.
१६ लाख ८४ हजार १७० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट असताना बुधवारी (ता. पाच) रात्रीपर्यंत १६ लाख ३० हजार ३५१ सोयाबीनची खरेदी झाली होती. धाराशिव जिल्ह्यात उद्दिष्ट मोठे असले तरी खरेदीची मुदत संपत आल्यामुळे सुमारे २३ हजार शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता होती.
यातूनच शेवटच्या दिवशी सर्वच केंद्रासमोर सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी सुरु असतानाच मुदतवाढीची बाब केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या.
तीन वर्षापासून भाव वाढत नसल्याने यंदा सरकारने नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्याचा निर्णय घेत १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरवात केली. लातूर जिल्ह्यात ५२ तर धाराशिव जिल्ह्यात २१ केंद्रावर खरेदीला सुरवात होऊनही सुरवातीला बारदाना व त्यानंतर सोयाबीनमधील ओलाव्याची अडचण झाली.
ओलाव्याचे प्रमाण १२ वरून १५ टक्के झाले तरी खरेदीला अडचणी येतच राहिल्या. शेवटच्या टप्प्यात खरेदीला वेग आल्यानंतर पुन्हा बारदाना संपला. लातूर जिल्ह्यात वेगाने तर धाराशिव जिल्ह्यात मंद गतीने खरेदी सुरु झाली. यातूनच लातूरचे खरेदीचे उद्दिष्ट संपले. त्यानंतर सरकारने दोन्ही जिल्ह्यासाठी प्रत्येकी वीस हजार क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून दिले व खरेदीला मुदतवाढ दिली. यात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर एकच गर्दी केली. वाहनांच्या लांबच लांब रांगा केंद्रासमोर लागल्या.
दोन दिवस थांबूनही खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना केंद्रावर मुक्काम करण्याची वेळ आली. तरीही अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची परिस्थिती शेवटच्या दिवशी होती. आणलेल्या सोयाबीनची विक्री होण्याची आशा धुसर होती. यातूनच शेतकरी हवालदिल झाले होते.
लातूरला ४० हजार शेतकरी हतबल
लातूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची उद्दिष्ट केवळ ५० हजार क्विंटल उरले असतानाच दुसरीकडे मुदतही संपत आली होती. जिल्ह्यात एक लाख १५ हजार ३९७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एक लाख पाच हजार २७५ शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आले आहेत.
यातील ६४ हजार ३५९ शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी झाली असून आणखी ४० हजार ९१६ शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी राहिली आहे. तर दहा हजार १२२ शेतकऱ्यांना अद्याप मेसेज पाठवले नसल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी दिली.
धाराशिवला २३ हजार शेतकरी वेटींगवर
धाराशिव जिल्ह्यातील ३५ हजार ४०३ पैकी केवळ बारा हजार ४९७ शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी झाली असून २२ हजार ९०६ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. २५ हजार १५७ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीला घेऊन येण्यासाठी मेसेज पाठवण्यात आले असून यापैकी १३ हजार शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी बाकी आहे.
आतापर्यंत तीन लाख ३० हजार ७६० क्विंटलची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात यापूर्वीच मोठे उद्दिष्ट शिल्लक होते. तरी सरकारने सहा दिवसापूर्वी त्यात वीस हजार क्विंटलची वाढ केली. असे असले तरी मुदत संपत आल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचे चित्र आहे.
केंद्रावर तडजोडी अन् घासाघीस
केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना ते खरेदी होईलच याची शेवटपर्यंत खात्री दिली जात नाही. सोयाबीनमधील खराब दाण्यांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते. काही सोयाबीन काळे पडल्याचे सांगून खरेदीला नकार दिला जातो. काही केंद्रावर चाळणीसाठी क्विंटलमागे शंभर तर कुठे १२० रुपये वसुल केले जातात. चाळणी व वजन करताना सोयाबीन मोठ्या प्रमाणात खाली सांडले जाते. चाळणीचा वेग पहाता मजुरांची मिनिटाला शंभर रुपये कमाई होते. विविध कारणे सांगून नकार दिलेले शेतकरी मजुर व केंद्रचालकांकडे घासाघीस करत तडजोडी करताना दिसतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.