Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापूस भावात तेजीचे संकेत

अनिल जाधव

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावात आलेल्या तेजीचा आधार देशातील कापूस बाजारालाही मिळत आहे. सध्या भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे भारतीय कापसाला चांगलीच मागणी असून दरात तेजीचे संकेत आहेत.

फेब्रुवारी महिन्यातच ४ लाख गाठी कापूस निर्यातीचे करार झाले आहेत. यापुढील काळातही निर्यात चांगलीच राहील. परिणामी कापसाला उठाव मिळत असून भावात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली. तर पुढील महिनाभरात भाव आणखी १० टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच अमेरिकेच्या वायदे बाजारात कापसाचे भाव ८० सेंटवरून ९४ सेटपर्यंत पोचले आहेत. म्हणजेच १४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलवरून रुईचा भाव १७ हजार २०० रुपयांपर्यंत पोचला. याचाच अर्थ असा की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव एकाच महिन्यात तब्बल १६ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यानंतर देशातील वायदेही वाढले आहेत. पण त्याप्रमाणात प्रत्यक्ष कापूस खरेदीचे भाव वाढले नाहीत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव म्हणजेच ‘कॉटलूक ए इंडेक्स’ चांगलाच वाढला. हा इंडेक्स जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांपैकी सर्वात कमी भाव असलेल्या पाच देशांतील दराची सरासरी असते. कॉटलूक ए इंडेक्स आता १ डॉलरच्याही पुढे गेला.

ए इंडेक्स आता १०१.४५ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला. म्हणजेच १८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलवर रुईचा भाव पोचला. तर देशातील रुईचा भाव १६ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आहे. म्हणजेच भारतातील रुईचा प्रत्यक्ष खरेदीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील भावापेक्षा १ हजार ८०० रुपयांनी स्वस्त आहे.

कापूस बाजारात पुढील महिना ते दीड महिन्यात भाव किमान १० टक्क्यांनी वाढू शकतात. म्हणजेच भाव ७ हजार ५०० रुपयांची पातळी गाठू शकतात. तर मे महिन्यापर्यंत भावात १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

त्यामुळे मे महिन्यात कापूस ८ हजारांच्या जवळपास पोहचू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन दोन ते तीन टप्प्यात करावे. यामुळे बाजारातील सरासरी भावाचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त असल्याने निर्यातीला अचानक मागणी आली. फेब्रुवारीतच तब्बल ४ लाख गाठी कापूस निर्यातीचे करार पार पडले. दोन वर्षानंतर एखाद्या महिन्यात एवढे करार झाले. तर मार्चमध्ये निर्यातीसाठीचे ३ लाख गाठींचे करार झाल्याचे निर्यातदारांनी सांगितले.

आतापर्यंत देशातून १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल, असा अंदाज होता. पण आता भारत २० लाख गाठी कापूस निर्यात करेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी सांगितले. तर काहींच्या मते निर्यात २५ लाख गाठींवरही पोहचू शकते.

आयातीच्या स्थितीचा अंदाज असा...

- सध्या देशात कापसाचा भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये

- आयात कापूस आयातशुल्काविना किमान ८ हजार ५०० रुपये पडेल

- देशातील भावापेक्षा आयात कापूस १५०० रुपयाने महाग पडेल

- कापूस आयातीवर ११ टक्के शुल्कही लागू

- ११ टक्के शुल्क गृहीत धरले तर ९ हजार ३५० रुपयाने आयात होईल

- त्यामुळे कापूस आयात यंदा परवडणारी नसेल

- यंदाही निर्यात जास्त आणि आयात कमी ही स्थिती राहील.

चीन ठरतोय गेमचेंजर

फेब्रुवारीत भारतातून जे ४ लाख गाठी निर्यातीचे करार झाले, हा कापूस चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये जाईल. त्यातही चीन सर्वात मोठी खरेदीदार ठरत आहे. चीनने फेब्रुवारीत ३ लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले. या तीनही देशांना दोन गोष्टींमुळे भारतीय कापूस परवडतो आहे.

भारताचा कापूस स्वस्त आहे. तसेच भारताकडून कापूस आयात करण्याचा खर्च अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलपेक्षा कमी लागतो. त्यामुळे या देशांची मागणी वाढली. पुढील काळातही चीन आणि बांगलादेश भारताकडून जास्त कापूस खरेदी करण्याची शक्यता आहे.

देशात बाजारांतील कापूस आवक (गाठींमध्ये)

दिनांक…आवक

९ फेब्रुवारी…१ लाख ६९ हजार

१० फेब्रुवारी…१ लाख ४९ हजार

११ फेब्रुवारी (रविवार)…९३ हजार

१२ फेब्रुवारी…१ लाख ४७ हजार

१३ फेब्रुवारी…१ लाख ४४ हजार

१४ फेब्रुवारी…१ लाख ३७ हजार

१५ फेब्रुवारी…१ लाख ३४ हजार

१६ फेब्रुवारी…१ लाख २६ हजार

भारताचा कापूस सध्या जगात स्वस्त आहे. त्यामुळे कापूस निर्यातीला चांगली मागणी आहे. देशातील उद्योगांनाही कापसाची गरज आहे. त्यामुळे कापसाची खरेदी चांगली होत असून बाजारातील आवक मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. मार्चच्या शेवटी आवक ७० हजार ते ८० हजार गाठींच्या दरम्यान राहू शकते. त्यावेळी जिनिंग, व्यापारी आणि साठवणूकदारंकडे कापूस असेल. ते कमी भावात कापूस सोडण्याची शक्यता कमीच आहे.
- अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
कापसाचे भाव चार कारणांमुळे वाढतील. यंदा घटलेले उत्पादन, बाजारातील कमी जाणारी आवक आणि कापड उद्योगाकडून वाढत जाणारा उठाव. जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्याने निर्यातही वाढेल. यामुळे कापूस भाव पुढील महिनाभरात १० टक्क्यांनी आणि मे महिन्यापर्यंत १५ टक्क्यांनी वाढेल.
- राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT