Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Market : डाळिंब उत्पादकांचा पाय आणखी खोलात

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : देशातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत डाळिंबाच्या बागा साधल्या. मात्र गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांतील डाळिंबाची देशभरातील बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत निम्म्याने डाळिंबांच्या दरात घसरण झाली आहे. ऐन हंगामात दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना २५ ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांची स्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी आहे.

देशात यंदाच्या मृग बहराखाली सुमारे ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थान या भागांत कमी पाऊस झाला. त्यामुळे इथल्या डाळिंबाला पोषक असे वातावरण मिळाले. तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या तीन राज्यांतही डाळिंब पीक चांगले आहे.

आतापर्यंत ४० टक्के डाळिंबाची काढणी उरकली आहे. या वर्षी डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात कमी अधिक पाऊस झाला. त्यातच पाण्याची टंचाई भासू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर डाळिंबाच्या बागा साधल्या. दिवाळीच्या दरम्यान, यंदाचा डाळिंबाचा हंगाम सुरू झाला.

हंगामाच्या सुरुवातीला दर्जेदार डाळिंबाला १५० ते १६० रुपये प्रतिकिलो असा दर होता. महिन्यानंतर डाळिंबाला १०० ते १३५ प्रति किलोस असा दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत असल्याने यंदाचा हंगाम गोड जाईल, अशी आशा निर्माण झाली.

दरम्यान, राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांत डाळिंबाला पोषक वातावरण होते. त्यातच या भागात कमी पाऊस झाला आहे. त्याचा फायदा इथल्या डाळिंब पिकाला झाला. या दोन्ही राज्यांतील डाळिंबाचा हंगाम सुरू झाला आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या दोन्ही राज्यांतील डाळिंब देशभरातील बाजारात विक्रीला आली. परंतु या दरम्यान आवक कमी असल्याने दरात घसरण झाली नाही. मात्र गेल्या पंधरा दिवसांत या दोन्ही राज्यांतील आवक वाढली. डाळिंबाचा उठाव कमी झाला. त्याचा परिमाण डाळिंबाच्या दरावर झाला. सध्या डाळिंबाला प्रतिकिलोस ४० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

देशातून दरवर्षी डाळिंबाची युरोपला निर्यात होते. मात्र गेल्या चार वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाला दर चांगले मिळत असल्याने निर्यात रोडावली होती. दरम्यान, यंदाही डाळिंबाला चांगले दर असल्याने शेतकरी निर्यातीच्या फारसे मागे लागला नाही.

यंदा स्थिती वेगळी निर्माण झाली आहे. मात्र यंदा युरोपमधून डाळिंबाची मागणी कमी आहे. त्यातूनही युरोपला १० कंटेनर म्हणजे १७० टनांची डाळिंबाची निर्यात झाली आहे. शेतकरी रसायन अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) प्रयोगशाळेत तपासणीसाठी डाळिंब पाठवू लागले आहेत. त्यामुळे यंदा देशातून डाळिंबाच्या निर्यातीला संधी असल्याची शक्यता डाळिंब संघाने व्यक्त केली.

थोडक्यात महत्त्वाचे...

* दोन वर्षांपूर्वीही परराज्यांतील डाळिंबाच्या आवकेचा फटका

* मागील चार वर्षांपेक्षा यंदा सर्वांत कमी दर

* यंदा परराज्यांतील डाळिंब आवकेचा दरावर परिणाम

* उत्पादन खर्चाचा ताळमेळ कठीण

* एकरी २५ ते ३० टक्के आर्थिक फटका

* आजअखेर डाळिंबाची युरोपला १७० टनांची निर्यात

परराज्यांतून डाळिंबाची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाला आहे. सध्या मिळणाऱ्या दराचा विचार करता उत्पादन खर्चही मिळणे मुश्कील आहे.
- महेंद्र बागारे, डाळिंब उत्पादक, महूद, जि. सोलापूर
राजस्थान, गुजरात राज्यात डाळिंबाचे पीक चांगले असल्याने देशभरातील बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत डाळिंबाच्या दराचे चित्र बदलले आहे. गेल्या चार वर्षांपेक्षा यंदा डाळिंबाच्या दरात निम्म्याने घसरण झाली आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT