onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांद्याचे लिलाव तेरा दिवसांनंतर पुन्हा सुरू

Onion Procurement : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेले ४० टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी बंद राहिलेले कांदा लिलाव १३ दिवसांनंतर पुन्हा सुरू झाले आहेत.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेले ४० टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी बंद राहिलेले कांदा लिलाव १३ दिवसांनंतर पुन्हा सुरू झाले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता.२) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत तोडगा काढल्यानंतर व्यापाऱ्यांनी बिनशर्त बंद मागे घेतला. त्यानुसार मंगळवार (ता.३)पासून कांदा लिलाव पूर्ववत झाले.

दरम्यान, दरात कुठलीही सुधारणा नसल्याने कांदा उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाले. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून लिलाव बंद ठेवले होते. या विषयावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेतली.

तर पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी कांदा खरेदीची तयारी दाखवीत लिलावात सहभागी न होणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्याच दिवशी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीही व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. पण चर्चेत पुढे काहीच ठोस समोर आले नाही. त्यामुळे हा बंद कायम राहिला.

गेल्या १५ दिवसांत वातावरणीय बदलांमुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान वाढले. त्यामुळे लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेत २८ सप्टेंबरपासून लिलाव सुरू केले.

त्या पाठोपाठ निफाड उपबाजार समितीने लिलाव सुरू केले. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दबाव वाढला. तर कारवाईचा धाक मानगुटीवर असल्याने मागण्यांवर ठाम असलेले व्यापारी नरमले. चर्चा होऊनही तोडगा निघत नाही, असे असताना व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले.

बाजारातील चित्र असे ः

- जिल्ह्यात ‘नो वर्क-नो वेजेस’या मुद्द्यावरून व्यापारी व हमाल-मापाडी यांत सौम्य वाद

- लिलावाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात आवक कमी

- विंचूर उपबाजार आवारात विक्रमी आवक

- तेरा दिवसांनंतर लिलाव सुरू होऊनही दर स्थिर

- पिंपळगाव बसवंत येथे सरासरी उच्चांकी २२०० रुपये दर

व्यापाऱ्यांचा अखेर ‘यू -टर्न’

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लिलावात सहभागी होणार घेणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. त्यात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे लिलाव प्रत्यक्ष बंद असले, तरी काही व्यापाऱ्यांच्या खळ्यावरून देशभरात कांदा पुरवठा सुरू होता. त्यामुळे बंद ठेवून व्यापाऱ्यांची कोंडी केल्याचे स्पष्ट झाले. तर राज्य व केंद्र सरकारकडे मागण्या ठेवल्यानंतर चर्चेतून हाती काहीच आले नाही. अखेर कांदा व्यापारी अप्रत्यक्षपणे माघार घेत लिलावात सहभागी झाले.

बाजार समित्यांमधील आवक व दर : (ता. ३)

बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी

लासलगाव...१०,४००...१,०००...२,५४१...२,१००

विंचूर(लासलगाव)...१९,५००...१,०००...२५,००...२,१००

पिंपळगाव बसवंत...५,३००...८००...२,५००...२,२००

मनमाड...५,०००...८७०...२,३५०...१,९००

चांदवड...१,६६०...२,४५०...२,१३०

नामपूर...७,०००...५००...२,४९०...२,१००

उमराणे...७,५००...१,२५०...२,१७०...१,८८०

कळवण...७,५००...८००...२,३५०...१८००

सटाणा...७,०००...६,००...२,५००...२,१००

१८ सप्टेंबर रोजी कांद्याला जे दर होते, तेच दर कांद्याला मिळत आहेत. व्यापारी असोसिएशनच्या लिलाव बंदच्या आंदोलनाला राज्य व केंद्र सरकारने कुठल्याही प्रतिसाद दिला नाही. सरकारकडून कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही. दरम्यान, चाळींतील कांद्याची सड झाल्याने शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले. सरकारने ठरवून कांद्याचे भाव पाडले.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
कांद्याची वेळेवर विक्री न झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मात्र आता बाजार सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा विक्री करताना नियोजन करणे गरजेचे आहे. मालाच्या प्रतवारीनुसार टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा. आवक दाटल्यास दर पडण्याचा धोका आहे.
- बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, बाजार समिती, लासलगाव, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT