Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : सोलापूर बाजार समितीत एक दिवसाआड कांदा लिलाव

Onion Export Ban : निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना केंद्र सरकारने या आधीच धक्का दिला असताना, आता सोलापूर बाजार समितीनेही कांद्याच्या वाढत्या आवकेमुळे एकदिवसाआड कांदा लिलावाचा घाट घातला आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना केंद्र सरकारने या आधीच धक्का दिला असताना, आता सोलापूर बाजार समितीनेही कांद्याच्या वाढत्या आवकेमुळे एकदिवसाआड कांदा लिलावाचा घाट घातला आहे.

पण वाढत्या आवकेवर अन्य पर्याय शोधण्याऐवजी थेट लिलाव बंद ठेवणे, हे कितपत योग्य आहे, यावरून शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा निर्णय थेटपणे व्यापारीहिताचा आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या लिलावासाठी पाच मोठे सेलहॉल आहेत, पण वाढत्या आवकेमुळे ते भरून पुन्हा रस्त्यावर आणि भुसार बाजारातही कांदा उतरविला जात आहे. या आवकेमुळे बाजार समितीत लोडिंग आणि अनलोडिंग करणे एका दिवसात शक्य होत नाही,

हे कारण देत गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीकडून कांद्याचे लिलाव एक दिवसाआड केले जात आहेत. पण दरवर्षी या कालवधीत ही समस्या उद्‌भवते, अशा वेळी बाजार समितीला समोरील जनावर बाजार आवारात तात्पुरती सोय करता येऊ शकते, पण थेट लिलाव बंद करणे कितपत योग्य आहे, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

सततच्या लिलावबंदीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होतेच, पण आदल्या दिवशी लिलाव बंद ठेवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी दुप्पट-तिप्पट आवक होते. या वाढत्या आवकेमुळे व्यापारी आणि खरेदीदार त्याचा गैरफायदा घेतात आणि थेट दर पाडतात. मग बाजार समितीचा हा निर्णय कोणाच्या फायद्याचा ठरतोय, हा विचार करण्याची वेळ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

निर्यातबंदीमुळे आवक वाढली

गेल्या आठवड्यात कांद्यावरील निर्यातबंदीचा निर्णय झाला आणि बाजार समितीतील आवक एकदम वाढली. गेल्या गुरुवारी (ता. ७) तब्बल ८६८ गाड्यांची आवक झाली. त्यामुळे शुक्रवारी (ता. ८) लिलाव बंद ठेवण्यात आले. पण शनिवारी (ता. ९) पुन्हा लिलाव सुरू झाले. तेव्हा ५१४ गाड्या आवक झाली.

त्यानंतर रविवारी बाजाराला सुट्टी राहिली. सोमवारी (ता. ११) तब्बल १२८५ क्विंटल आवक झाली. त्यामुळे पुन्हा मंगळवारी (ता. १२) लिलावाला सुट्टी देण्यात आली. बुधवारी (ता. १३) लिलाव झाले, सुमारे १०७७ गाड्या आवक झाली. पण वाढत्या आवकेमुळे गुरुवारी (ता. १४) पुन्हा लिलाव बंद ठेवण्यात आले. या प्रमाणे गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने एक दिवसाआड लिलाव सुरू आहेत.

एक हजाराने दर उतरले

निर्यातबंदीच्या निर्णयाआधी मंगळवारी (ता. ५) बाजार समितीत सर्वाधिक ५७७ गाड्या आवक असूनही कांद्याचा सरासरी दर प्रतिक्विंटल २९०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपयांवर होता. पण निर्यातबंदीच्या निर्णयानंतर अवघ्या आठवड्यातच दरात १००० ते ११०० रुपयांनी घट झाली. बुधवारी (ता. १३) सरासरी दर १७०० रुपये आणि सर्वाधिक दर ४५०० रुपयांवर खाली आला आहे.

आवक वाढत असल्याने बाजार समितीत गाड्या उतरणे, भरणे यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे आतल्या गाड्या बाहेर गेल्याशिवाय बाहेरच्या गाड्या आत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आवकेचा विचार करून गेल्या आठवड्यात हा निर्णय घेतला. पण तो थोड्या दिवसांसाठी आहे. आवक पाहून लिलाव नियमित सुरू ठेवणार आहोत.
- दत्तात्रेय सूर्यवंशी, प्रभारी सचिव, सोलापूर बाजार समिती, सोलापूर
माझा दहा एकर कांदा आठवडाभरात काढणीला येईल. मुळात आवक वाढली, तर त्याचे नियोजन बाजार समितीने करायला हवे, त्यात शेतकऱ्यांना वेठीस का धरता. सततच्या लिलावबंदीमुळे आमची धावाधाव होतेच, पण व्यापारी आवकेमुळे दरही पाडतात. शिवाय आदल्या दिवशी बंद ठेवल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी आवक वाढणारच आहे. त्याचे काय?
- तुकाराम रेळेकर, कांदा उत्पादक, शेळगाव (आर), ता. बार्शी, जि. सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT