पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजाराने (Cotton Market) उभारी घेतली. देशातील बाजारातही मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात वाढ झाली. त्यामुळे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. देशातील कापूस दरात (Cotton rate) क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली होती.
देशातील कापासाचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु झाला. मात्र मागील महिनाभर कापसाचे दर दबावात होते. कापसाला सप्टेंबरच्या शेवटी ७ हजार ते १० हजार रुपये सरासरी दर मिळाला. मात्र त्यानंतर कापसाच्या दरात घट होत गेली. ऑक्टोबरच्या शेवटी कापूस दराने ६ हजार ते ८ हजार रुपयांचा वर्षातील निचांकी दर गाठला होता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील खानदेश भागात कापूस लवकर आला होता. पण दर कमी असल्यानं बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. परिणामी बाजारातील आवक कहीशी कमीच होती.
आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दर ऑक्टोबर महिन्यात दबावात होता. ३१ ऑक्टोबरला कापूस दराने १ नोव्हेंबर २०२० नंतरचा सर्वात कमी दराचा टप्पा गाठला. या दिवशी कापसाचे वायदे ७१.३३ सेंट प्रतिपाऊंडने झाले होते. तर मागील पाच वर्षातील कापूस बाजाराचा विचार करता निचांकी दर १ मार्च २०२० रोजी ५०.४१ सेंटचा मिळाला. कोरोनामुळे बाजारपेठा बंद होत असल्यानं कापूस बाजार अक्षरशः झोपला होता. त्यानंतर बाजाराने उभारी घेतली होती.
आता गुरुवारपासून कापूस दरात काहीशी सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय तसेच देशातील बाजारात कापूस दर सुधारला. शुक्रवारी दरातील वाढ जास्त होती. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दराने ८७.६६ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठत ८७.०७ सेंटवर बंद बाजार बंद झाला. शुक्रवारी कापसाच्या दरात जवळपास ५ टक्क्यांची सुधारणा झाली होती.
चीनच्या मागणीचा कापूस बाजाराला आधार मिळाला, असं कापूस बाजार विश्लेषक गिरीष काबरा यांनी सांगितले. देशातील बाजारातही मागील महिनाभरात कापसाच्या दरात चढ-उतार होत राहिले. कापसाच्या दराने ३१ ऑक्टोबरला निचांकी २८ हजार ६०० रुपये प्रतिगाठीची पातळी गाठली होती. त्यानंतर दरात मात्र सुधारणा होत गेली. शुक्रवारी कापसाचे वायदे ३१ हजार ९९० रुपये प्रतिगाठीने पार पडले. शुक्रवारी कापसाच्या दरात जवळपास सव्वातीन टक्क्यांनी सुधारणा झाली होती. यामुळे बाजार समित्यांमध्येही कापसाचे दर वाढले होते. कापसाच्या दरात प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली होती.
शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवल्याने दरात सुधारणा झाली, असं खानदेश जीनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितलं.
…………..
दर किती झाले?
बाजारात कापूस दर वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळताना दिसतोय. मात्र शेतकऱ्यांना आणखी दर वाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारातील कापूस आवक शनिवारीही वाढलेली नव्हती. मागील महिनाभरात अनेक शेतकऱ्यांनी ६ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान कापसाची विक्री केली. आता कापूस दर सरासरी ८ हजारांच्या पुढे गेले आहेत. अनेक बाजारांमध्ये दराने ८ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला.
विक्री फायदेशीर केव्हा ठरेल?
विक्रीची गरज असलेल्या शेतकऱ्यांनी या दरात काही कापूस विकण्यास हरकत नाही. हंगामात दीर्घकाळात शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यासाठी आणखी काही दिवस कापूस ठेवावा लागेल. मात्र शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
……………..
प्रतिक्रिया
चीनमधील अनेक भागातील लाॅकडाऊन आता कमी झाले. चीनचे मार्केट पुन्हा सुरु होत आहे. अमेरिकेने आठवड्यात जवळपास १ लाख ९१ हजार कापूस गाठींची विक्री केली. त्यापैकी तब्बल १ लाख २२ हजार गाठी चीनने खरेदी केल्या. चीनची मागणी वाढल्याने बाजारात कापूस दर सुधारले. तसेच कापूस आयातीवर आता पुन्हा ११ टक्के शुल्क लागू झाले आहे. याचाही परिणाम कापूस बाजारावर होत आहे.
- गिरिष काबरा, कापूस बाजार विश्लेषक
……………
शेतकऱ्यांना जास्त दराची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. सध्या कापसाचे दर सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांवरून ५०० रुपयाने सुधारलेले दिसत आहेत. कापसाचा सरासरी कमाल दर ८ हजार ५०० रुपयांवर पोचला. सरकीच्या दरातही क्विंटलमागे ३०० रुपयांची सुधारणा झाली. गरज आहे ते शेतकरी या भागात काही कापूस विकू शकतात. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यात कापूस विकल्यास फायदेशीर ठरू शकते.
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.