soybeans Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीन, मोहरी दरवाढीसाठी सरकार पामतेल आयातशुल्क वाढवणार?

देशातील तेलबियांचे दर कमी झाल्यामुळे भारत पामतेल आयातीवरील शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे.

Anil Jadhao 

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात (Soyameal Rate) मोठी सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे दर (Soyeban Rate) १५.२९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४९७ डाॅलरवर पोचले. आज देशातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद होते.

पण मागील तीन दिवसांमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारल्याने देशातील दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस बाजार स्थिरावला (Cotton Market)

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचे दर (Cotton rate) दबावात आहेत. शनिवारी आणि सोमवारी दरात काही ठिकाणी सुधारणा पाहायला मिळाली. मात्र सरासरी दर कायम होते. कापसाला सध्या ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस ८५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कायम आहेत. देशातील बाजारात आवक जास्त असल्यानं दर दबावात असल्याचं सांगितलं जातं. आवकेचा दबाव कमी झाल्यास दर सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

३) तुर दरातील तेजी कायम (Tur Rate)

देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तूर काढणीचा हंगाम संपत आला तरी बाजारातील आवक वाढलेली नाही. शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने तूर मागं ठेवली. त्यामुळं गुलबर्गा, बिदर, सोलापूर, लातूर, जालना आणि अकोला बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत.

सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळतोय. मार्च महिन्यात तुरीचे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे. तर एप्रिलनंतर दरातील तेजी वाढू शकते, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

४) हरभऱ्याचे नुकसान वाढले

देशात हरभरा पिकाचे नुकसान वाढत आहे. मागील तीन दिवसांपासून विविध राज्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा पिकाला फटका बसतोय. त्यामुळं हरभरा पिकाचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं हरभरा बाजाराला आधार मिळण्याचा अंदाज आहे.

सध्या हरभऱ्याला ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पण नुकसान जास्त वाढले आणि नाफेडची खेरदी सुरु झाल्यास हरभरा दरही सुधारू शकतात, असा अंदाज हरभरा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) सोयाबीनचे दर सुधारतील का?

देशातील तेलबियांचे दर कमी झाल्यामुळे भारत पामतेल आयातीवरील शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे. पामतेल आयात शुल्कात वाढ केल्यास देशातील खाद्यतेलाचे दर सुधारतील. मोहरीचे दर सुधारण्यासाठी पामतेल आयातीवरील शुल्क वाढीचा प्रस्ताव असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.

मागील काही महिन्यांमध्ये देशात खाद्यतेलाची आयात वाढल्याचा दबाव मोहरी दरावर आला. यंदा सरकारने मोहरीसाठी ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. पण मोहरीचे दर ५ हजार रुपयांपर्यंत कमी झाले. राजस्थानमध्ये पुढील काळात निवडणुका आहेत.

देशातील मोहरी उत्पादनात राजस्थानाचा वाटा निम्म्यापेक्षा अधिक आहे. पण मोहरीचे भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार शेतकऱ्यांचे हीत जोपासण्याची शक्यता आहे, असे व्यापारी आणि उद्योगाच्या सुत्रांनी सांगितले.

सरकारने मोहरीचे दर सुधारण्यासाठी पामतेल आयातशुल्कात वाढ केल्यास याचा फायदा सोयाबीनलाही मिळेल. सध्या सोयाबीनचे दर नरमलेले आहेत. सध्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

शेतकऱ्यांना दर सुधारण्याची प्रतिक्षा आहे. पामतेल आयात शुल्कात वाढ केल्यास सोयातेलाचेही दर वाढतील. यामुळे सोयाबीनचे दर सुधारण्यास मदत मिळेल, असेही सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Germination Issue: सोयाबीन बियाण्यांची ३० टक्केच उगवण

Pune Rainfall: ताम्हिणी घाटात १९० मिलिमीटर पाऊस

Collector Jitendra Dudi: नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवा

Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार

Varun Seed Scam: वरुण सीड्स कंपनी काळ्या यादीत

SCROLL FOR NEXT