cotton rate
cotton rate  agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton : कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?

टीम ॲग्रोवन

राज्यात लसूण दर तेजीत

1. लसूण उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशात लसणाची आवक वाढली. यंदा इथं लसणाचं चांगलं उत्पादन झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. मात्र बाजारात आवक वाढल्यानं लसणाच्या दरात मोठी घट पाहायला मिळाली. लसणाला प्रतिक्विंटल किमान १०० रुपयांपासून तर २७०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मात्र दर दबावात असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. तर महाराष्ट्रात मात्र लसणाला चांगला दर मिळतोय. सध्या ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलने लसणाचे व्यवहार होत आहेत. मात्र पुढील काळात मध्य प्रदेशातील मालाचा दबाव वाढून दर दबावात येऊ शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

हिरव्या मिरचीच्या दरात वाढीची शक्यता

2. राज्यात सध्या हिरवी मिरची भाव खातेय. मालाची कमी उपलब्धता असल्यानं बाजारात हिरव्या मिरचीची आवक कमी होत आहे. त्यामुळं दरही चांगला मिळतोय. सध्या राज्यातील बाजारांमध्ये प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपयाने हिरव्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. मिरची पिकाची स्थिती पाहता पुढील महिन्यात हिरव्या मिरचीचे दर आणखी सुधारू शकतात. तर पुढील दोन महिने मिरची पिकाला चांगले दर देणारे ठरु शकतात, असं जाणकारांनी सांगतलं. सणांच्या काळात हिरव्या मिरचीला मागणी वाढते. मात्र बदलत्या वातावरणानं पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं दर वाढतील, असा अंदाज आहे.

मुगाचा दर बाजारात टिकून

3. चालू खरिपात सध्या मुगाचा पेरा मागील वर्षापेक्षा काहीसा कमी झाला. ताज्या आकडेवारीनुसार देशात ३२ लाख हेक्टरवर मुगाची लागवड झाली आहे. मात्र पावसानं पिकाचं नुकसान झालंय. तर राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन मुगाची आवक सुरु झाली. मात्र ओलावा अधिक असून गुणवत्ताही काहिशी कमी आहे. राज्यातील बाजारात मुगाला सध्या ७००० ते ८००० रुपये दर मिळतोय. बाजारात आवक वाढल्यास मुगाचे दरावरही दबाव येईल, असं जाणकारांनी सांगितलं.

हळदीचे दर दबावात

4. हळदीचे दर सध्या दबावात आहेत. निर्यातीसाठी मागणी कमी झाली. तसचं देशांतर्गतही हळदीचा वापर सद्या कमी आहे. त्यामुळं हळदीला उठाव नाही. परिणामी हळदीचे दर नरमलेले आहेत. मात्र असं असतानाही व्यापाऱ्यांनी हळदीच्या वायद्यांवर बंदीची मागणी केली. पण वायदे बाजार शेतकऱ्यांच्याही फायद्याचे असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. वायद्यांमध्ये हळदीला सध्या ७४०० ते ७५०० रुपये दर मिळतोय. मागणी वाढत नाही तोपर्यंत हा दर कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. तर मागणी वाढल्यास हळदीच्या दरात एक हजार रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला.

कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?

5. देशात आणि जागतिक बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) पुन्हा सुधारले. त्याचं झालं असं की अमेरिकेचा कृषी विभाग (Department Of Agriculture United States) म्हणजेच युएसडीए आणि इंटरनॅशनल काॅटन अॅडव्हायजरी कमिटीनं (International Cotton Advisory Committee) जागतिक कापूस उत्पादन (Global Cotton Production) २०२२-२३ मध्ये कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळं कापूस दराला आधार मिळाला. न्यूयाॅर्कच्या काॅटन एक्सचेंजवर मागील आठवड्याभरात कापूस दरात १४ टक्क्यांची सुधारणा होऊन १२५ सेंटचा टप्पा गाठला होता. मात्र गुरुवारी कापसाचे वायदे पुन्हा ११८ सेंट प्रतिपाऊंडवर स्थिरावले.

तर देशातही कापसाचे वायदे ५० हजार रुपये प्रतिगाठीवर पोचले. एक कापूस गाठ १७० किलोची असते. यंदा अमेरिकेतील कापूस पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं अमेरिकेतील कापूस उत्पादन जवळपास ४० लाख गाठींनी कमी राहण्याची शक्यता युएसडीएनं व्यक्त केली. अमेरिकेची कापूस निर्यातही यंदा २५ लाख गाठींनी कमी राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेतून कापसाची निर्यात कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची टंचाई निर्माण होऊ शकते. या काळात भारतातून कापसाला मागणी वाढेल. यंदा भारतात कापूस लागवड ५ टक्क्यांनी वाढली. मात्र पावसाचा पिकाला मोठा फटका बसतोय. महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये यंदा उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सुधारल्यानंतर देशातही कापसाच्या दरात वाढ झाली. गुरुवारी कापसाचे वायदे जवळपास ५० हजार रुपये प्रतिगाठीने पार पडले. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला १० हजार ३०० रुपयांचा दर मिळला. हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT