सोयाबीनचे दर टिकून
1. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात १०० ते २०० रुपयांनी चढ-उतार सुरु आहेत. मात्र सोयाबीनचे सरासरी दर टिकून आहेत. देशातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ६०० रुपयांवर आहे. तर कमाल ६ हजार ४०० रुपये दर लातूर बाजार समितीत मिळाला. इतर बाजार समित्यांमधील कमाल दर ५ हजार ७०० रुपयांपेक्षा कमी होता. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता सोयाबीनला ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
तुरीचे दर तेजीतच
2. देशात टंचाई असल्याने सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तसेच चालू हंगामातही तुरीचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदार यांच्याकडील तुरीच्या साठ्याची माहिती मागितली आहे. सरकारला देशात तुरीचा नेमका किती साठा आहे याचा अंदाज घ्यायचा असल्याने माहिती मागवल्याच सांगितलं जातं. सध्या देशात तुरीला ७ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.
संत्र्याचे दर दबावात
3. राज्यातील संत्री आता बाजारात दाखल होत आहे. मात्र सध्या संत्रीला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या संत्र्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळतोय. चालू हंगामात पिकाला पोषक वातावरण नव्हते, परिणामी संत्र्यामध्ये गोडी उतरली नाही. तर काही ठिकाणी कीड-रोगामुळे गुणवत्ता कमी झाली. याचा फटका आता संत्रा पिकाला बसत आहे. संत्र्याला मागणी वाढल्यानंतर दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
शेवगा खातोय भाव
4. सध्या बाजारात शेवग्याचा तुटवडा जाणवतोय. सध्या केवळ मुंबई बाजार समितीतच शेवग्याची आवक जास्त दिसते. मात्र इतर बाजारातील आवक ही ५ ते १० क्विंटलच्या दरम्यान आहे. त्यामुळं शेवगा सध्या चांगलाच भाव खातोय. शेवग्याला राज्यातील बाजारात सध्या सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. बाजारात आवक वाढेपर्यंत शेवग्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.
5. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापसाच्या दरात (Cotton Rate) सुधारणा होत गेली. आंतरराष्ट्रीय तसेच देशातील बाजारातही कापसाचे दर (Cotton Production) वाढले. ऑक्टोबर महिन्यातील दबाव नोव्हेंबरमध्ये काहीसा दूर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात २६ ऑगस्टला कापसाचे दर ११८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तेव्हापासून कापसाच्या दरात सतत घट होत गेली. ३१ ऑक्टोबरला कापूस दर जवळपास दोन वर्षातील निचांकी पातळी गाठत ७२ सेंटपर्यंत घसरले होते. मात्र त्यानंतर कापसाचे दर वाढत गेले.
कालपर्यंत कापूस दराने ८८.२ सेंटपर्यंत मजल मारली. देशातही कपसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली होती. त्यामुळे दरात वाढ होत कापसाने सरासरी ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला. तर कमाल दर ९ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले. तर दुसरीकडे कापडाला उठाव नसल्याची चर्चा अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे कापसाच्या दरात चढ-उतार होऊ शकतात, असाही अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. पण शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.