१) कापूस बाजार दबावातच (Cotton Market)
कापसाच्या दरावर दबाव कायम आहे. कापसाला आजही प्रतिक्विंटल ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. कापूस वायद्यांमध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत.
एमसीएक्सवर कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ५६ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. कापूस गाठी आणि सूताला उठाव कमी असल्याने कापसाचे भाव दबावात आहेत. हा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) मक्याचे दर स्थिर (Maize Rate)
देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावातच आहेत. तर बाजारातील मका आवक सरासरीपेक्षा जास्त दिसते. मक्याला सध्या जास्त उठाव नसल्याने बाजारावर दबाव असून भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत, असल्याचे जाणकारांनी सांगितले.
मक्याला सध्या १ हजार ७०० ते २०० रुपये भाव मिळत आहे. मक्याचा बाजारा आणखी काही दिवस दबावात दिसू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
३) रताळ्याला उठाव (Sweet Potato)
आज आषाढी एकादशी असल्याने मागील काही दिवसांपासून रताळ्याला चांगला उठाव होता. खास आषाढीसाठी शेतकरी पिकाचं नियोजन करत असतात. मागील पाच दिवसांपासून बाजारातील रताळी आवक वाढली.
मात्र दर २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान होता. पुढील काळात बाजारात रताळी आवक आणि दर दोन्हीही कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
४) लिंबाचा बाजार टिकून (Lemon Market Rate)
राज्यात उन्हाचा चटका कमी होऊन पाऊस सुरु झाला. अनके भागात जोरदार पाऊस पडत आहे. पण तरीही लिंबाला बऱ्यापैकी उठाव मिळत आहे. सध्या बाजारातील आवकही कमी आहे.
लिंबाला आज प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात पावसामुळे लिंबाची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबाचा बाजार स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
५) सध्या सोयाबीनला काय भाव मिळत आहे? (Soybean Rate)
देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला सध्या सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपये भाव मिळत आहे. देशातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये ही दरपातळी दिसून येत आहे. यंदा शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन आवकेचा दबाव वाढू दिला नाही. त्यामुळे भावपातळी टिकून दिसते.
पण शिल्लक सोयाबीनचे प्रमाणही जास्त आहे. परिणामी सध्या आवकेचा हंगाम नसतानाही सरासरीपेक्षा जास्त आहे. आज देशातील बाजारात सरासरी १ लाख ४० हजार क्विंटलची आवक झाली. यापैकी ६५ हजार क्विंटल मध्य प्रदेशात तर ६० हजार क्विंटल महाराष्ट्रात आवक झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतार सुरु आहेत.
सोयाबीनचे वायदे पुन्हा १४ डाॅलरपेक्षा कमी झाले. तर सोयापेंडचे वायदे ३७९ डाॅलर प्रतिटनांवर होते. खाद्यतेलाचे भाव दबावात असल्याने सोयाबीनवर मागील दोन महिन्यांपासून दबाव आहे. आता खरिपातील सोयाबीन लागवडही सुरु झाली. नवा माल तीन महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये बाजारात येईल.
देशात सध्या सोयाबीनचा स्टाॅक चांगला आहे. त्यातच सोयापेंड निर्यात कमी होत आहे. खाद्यतेलही दबावात आहे. त्यामुळे दराला आधार मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दरात चांगली वाढ झाल्यास देशातील बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.