Tur Rate
Tur Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : म्यानमारमधून आयात तुरीचे दर जास्तच

Team Agrowon

१) सोयाबीनचे दर स्थिर (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा नरमाई दिसली. सोयाबीनचे वायदे निचांकी १४.१० डाॅलर प्रतिपाऊंडवर आले होते. तर सोयापेंडच्या वायदेही ४१९ डाॅलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले.

ब्राझीलमध्ये वेगाने सुरु असलेली सोयाबानची काढणी आणि अमेरिकेत सुरु झालेली पेरणी याचा बाजारावर परिणाम दिसत असल्याचं जाणकारांनी सांगतिले. तर देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत.

सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळतोय. देशातील बाजारात सोयाबीनचे दर टिकून राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस आवक कायम (Cotton Arrival)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे स्थिर होते. आज दुपारर्यंत कापसाच्या वायद्यांनी ८१.६५ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. तर देशातील बाजारात कापसाची आवक कायम आहे. आजही कापसाची आवक ९० हजार गाठींच्या दरम्यान होती.

आवकेचा दबाव असल्याने कापसाचे दर स्थिर आहेत. खरिपातील लागवडी तोंडावर आल्याने शेतकरी कापूस विकत आहेत. पण शेतकऱ्यांकडे कापसाचा स्टाॅक कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील काळात कापसाची आवक कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

३) हरभरा बाजार दबावातच (Chana Market)

नाफेडच्या हरभरा खरेदीने आता १८ लाख टनांचा टप्पा पार केला. नाफेडने सोमवारपर्यंत १८ लाख १७ हजार टनांची खरेदी केली. पण नाफेडच्या खेरदीचा वेग आता कमी झाला. तसेच महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमधील खरेदी केंद्रे हळूहळू बंद होत आहेत.

नाफेडने चांगल्या प्रमाणात हरभरा खरेदी करूनही दरात सुधारणा दिसली नाही. हरभरा दर आजही दबावातच आहेत. सध्या हरभऱ्याला ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काही काळ हरभरा बाजार स्थिर राहू शकतो, असाही अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

४) उडदाला चांगला उठाव (Urad Rate)

बाजारात उडदाचे दर सध्या तेजीत आहेत. यंदा देशात उडदाचे उत्पादन घटले. तसेच आयात उडीदही महाग पडतोय. त्यामुळे उडादचे दर तेजीत आहेत. सध्या उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळतोय.

म्यानमारमधून आयात होणाऱ्या उडदाचे भावही याच दरम्यान आहेत. तसेच रब्बी हंगामात उत्पादनही कमी झालं. त्यामुळे देशातील उडदाचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? (Tur Rate)

भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर पोचला. त्यामुळे अन्नधान्याची गरजही मोठी आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा ग्राहक ठरला. देश काही शेतीमालाच्या उत्पादनात आत्मनिर्भर झाला. तर काही मालाची आयात करावी लागते.

देशात कडधान्याचे उत्पादन वाढले. पण ते वाढती मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळं भारताला कडधान्याची आयातही करावी लागते. सहाजिकच मोठा ग्राहक असल्यानं भारताची आयात वाढली की आंतरराष्ट्रीय बाजारात त्या मालाचे दर वाढतात.

सध्या तुरीच्या बाबतीत हाच अनुभव येत आहे. देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे केंद्र सरकार आयातीवर जोर देत आहे. पण भारताची गरज लक्षात घेऊन आफ्रिका आणि म्यानमार या देशांमध्येही तुरीच्या दरात वाढ झाली. म्यानमारमध्ये १ मार्च रोजी तुरीचा निर्यातीसाठीचा भाव ९५० डाॅलर प्रतिटन होता.

तो एप्रिल महिन्यात १ हजार डाॅलरवर पोचला. त्यानंतर तुरीच्या दरात सतत वाढ झाली. सोमवारी म्यानमारमधून आयातीसाठी प्रतिटन १ हजार ८० डाॅलर मोजावे लागले. भारताची गरज लक्षात घेऊन म्यानमारमधील स्टाॅकिस्ट आणि व्यापारी माल मागं ठेऊन दरवाढ करत आहेत.

तसचं काही भारतीय आयातदार कंपन्याही इतर देशांमध्ये तुरीचा स्टाॅक ठेवत आहेत. परिणामी आयात तुरीचे भाव देशातील दरापेक्षा जास्तच पडत आहेत. सध्या देशात तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार १०० रुपये भाव मिळतोय. तुरीच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : पाणीटंचाईची सर्वाधिक झळ महिलांनाच

Interview with Vikas Patil : शेतकऱ्यांनी केवळ युरियाचा आग्रह धरू नये

Village Story : वळवाचा पाऊस...

Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT