Cotton crop News : देशातील कापूस उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी घटणार आहे. उत्पादन यंदा २९५ लाख गाठींवर स्थिरावेल. त्यामुळे कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन २२ लाख गाठींवर पोहोचेल. त्यातच कापसाचा वापर यंदाही कायम राहील, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सीएआय’ने जाहीर केला आहे. त्यामुळे यंदा कापसाला चांगली मागणी असूनही दरवाढीलाही पूरक स्थिती आहे, असे जाणकारांनी सांगितले.
देशातील कापूस मूल्यसाखळीतील सर्वच घटकांची शिखर संघटना असलेल्या ‘सीएआय’च्या अंदाजावर मागील काही वर्षांपासून टीका होत आहे. मागील हंगामात तर सीएआयने सुरुवातीला जास्त उत्पादनाचा अंदाज दिला होता. मे महिन्यात उत्पादनात घट होईल असे सांगितले आणि हंगामाच्या शेवटी पुन्हा उत्पादनाचा अंदाज वाढवला होता. त्यामुळे सीएआयच्या अंदाजाविषयीची विश्वासार्हता कमी झाल्याची टीका होत आहे.
सीएआयने नव्या हंगामात २९५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. तर मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास २९ लाख गाठींचा आहे. तर यंदा आयात जवळपास ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांची होईल. म्हणजेच यंदा एकूण कापूस पुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे सीएआयने म्हटले आहे. तर देशातील कापूस वापर गेल्या वर्षीऐवढाच म्हणजेच ३११ लाख गाठींचा होईल. तर कापूस निर्यात १४ लाख गाठींवर स्थिरावेल. मागील हंगामातील कापूस निर्यात १५ लाख ५० हजार गाठींची झाली होती.
आयात ७६ टक्क्यांनी वाढणार
‘सीएआय’ने आपल्या पहिल्या अंदाजातच देशातील कापूस उत्पादन कमी राहून आयात वाढणार, असे स्पष्ट केले. मागील हंगामात देशात १२ लाख ५० हजार गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा २२ लाख गाठींवर पोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल ७६ टक्क्यांची वाढ होणार आहे. यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर आयात वाढेल की स्थिर राहील, हे स्पष्ट होईल.
निर्यात काहीशी घटणार
‘सीएआय’ने आपल्या अंदाजात यंदा १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल असा अंदाज दिला. मागील हंगामात देशातून १५ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात झाली होती. पण बाजारातील अभ्यासकांच्या मते, यंदा अमेरिकेतील कापूस उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेजारचे देश भारताकडून कापूस खरेदी करू शकतात. असे झाल्यास देशातून होणारी निर्यात वाढेल.
दरवाढीला पूरक स्थिती
यंदा भारताची आयात वाढणार हे आता सीएआयनेही स्पष्ट केले. पण भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त कापूस मिळण्याची शक्यता नाही. कारण महत्त्वाच्या अमेरिका आणि चीनमधील कापूस उत्पादन यंदा तब्बल १२ टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव अधिक राहण्याची शक्यता आहे. कारण चीनची आयात वाढणार आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
यंदा देशातील कापूस उत्पादन घटणार आहे. पण जागतिक पातळीवर सध्या कापडाला मागणी कमी आहे. युद्ध आणि काही देशांमधील ताणामुळे ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कापसाचे भाव सध्या कमी आहेत. पण जागतिक परिस्थिती पूर्वपदावर आली आणि मागणी वाढली तर दरातही सुधारणा होऊ शकते.- महेश शारदा, माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.