Market Update :
सोयाबीनमध्ये चढ उतार सुरुच
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. पण भावपातळी एक मर्यादेत दिसत आहे. वायद्यांमध्ये आजही सोयाबीनला सरासरी ९.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सचा भाव मिळाला. तर सोयातेलाचा बाजार ३९.४७ सेंट प्रतिपाऊंवर होता. सोयापेंडचा भाव ३०३ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातील सोयाबीनचे भाव दबावातच असून आजही सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दबावातच
कापसाचा बाजार दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव काहीसा कमी जास्त होत आहे. पण भावपातळी एका मर्यादेत दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस निचांकी पातळीच्या दरम्यान कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाला सरासरी ६९.४७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५७ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांद्यात काहीशी सुधारणा
कांदा बाजारात सध्या काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. घटलेल्या दरात मागणी वाढल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे. तर दरात वाढ झाल्यानंतर मागणी कमी होऊन दरात काहीशी नरमाई दिसत आहे. हे समिकरण गेल्या तीन आठवड्यांपासून दिसत आहे. दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा अनेक बाजारांमध्ये झाली. सध्या कांद्याला सरासरी ३००० ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील हे चढ उतार आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटो बाजार स्थिरावला
बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव आला आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारात टोमॅटोची आवक कमी होती. मात्र अनेक भागातील तोडा सुरु झाल्यानंतर बाजारातील आवक वाढली. त्यामुळे भाव कमी झाले. गेल्या काही दिवसांपासून भावपातळी स्थिर दिसत आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
लसणाच्या दरात सुधारणा
राज्यात लसणाचे भाव पुन्हा काहीसे सुधारले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यातच सणांच्या पार्श्वभुमीवर लसणाला चांगला उठव दिसत आहे. पण बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे लसणाचे भाव पुन्हा काहीसे वाढले आहेत. सध्या लसणाला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.