Soybean Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market: सोयापेंड निर्यात वाढली; सोयाबीन दरही वाढणार !

देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत. मात्र देशातून वाढणारी सोयापेंड निर्यात आणि अर्जेंटीनातील उत्पादन घटीचा अंदाज यामुळे देशातील सोयाबीन दर वाढीची शक्यता आहे.

Anil Jadhao 

पुणेः सोयाबीनचे भाव मुख्यतः सोयापेंडवर अवलंबून असतात. कारण सोयाबीनपासून १८ ते २० टक्के तेल आणि ८० ते ८२ टक्के पेंड मिळते. सोयापेंडचे दर (Soya meal rate) वाढल्यानंतर सोयाबीनलाही आधार (Soybean rate) मिळत असतो. तर देशात मागणीपेक्षा सोयापेंड निर्मिती जास्त होते. त्यामुळं निर्यात (Soya meal export) चांगली झाली तर सोयापेंड आणि पर्यायाने सोयाबीनचेही दर वाढत असतात. यंदा देशातून सोयापेंड निर्यातवाढीची शक्यता आहे. यामुळे देशातील सोयाबीन दरही (Soybean Bajarbahv) वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तर देशात यंदा जवळपास ८० लाख टन सोयापेंड उत्पादनाचा अंदाज आहे. पण पशुखाद्य आणि मानवी आहारात ६८ ते ७० लाख टन सोयापेंडचा वापर होईल. म्हणजेच देशात यंदा १२ लाख टन आणि मागील हंगामातील ३ लाख टन, अशी एकूण १५ लाख टन सोयापेंड जास्त असेल.

देशातील अतिरिक्त १५ लाख टन सोयापेंडचा निपटारा करण्यासाठी निर्यात आवश्यक आहे. देशातून निर्यात वाढल्यास सोयाबीनला चांगला दर मिळू शकतो. विशेष म्हणजे यंदा देशातून सोयापेंड निर्यात वाढू शकते. जगात सोयापेंड निर्यातीत आघाडीवर असलेल्या अर्जेंटीनात यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळं अर्जेंटीनातील सोयापेंड निर्यात यंदा कमी होईल. त्यामुळं जगातील आयातदार देश भारताकडून सोयापेंड खेरदी करु शकतात, असं काही निर्यातदारांनी सांगितलं. 

विक्रमी निर्यातीचा अंदाज
अर्जेंटीनातून यंदा सोयापेंड निर्यात घटण्याचे अंदाज आल्यानंतर भारताच्या सोयापेंडला मागणी वाढत आहे. आशियातील खरेदीदारांनी भारतातून आयातीचे करार सुरु केले आहेत. त्यामुळं यंदा गेल्यावर्षीपेक्षा सोयापेंड निर्यात अधिक होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात देशातून ६ लाख ४४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. ती यंदा १५ ते २० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला.

तिमाहितील निर्यात वाढली
देशातून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सोयापेंड निर्यात यंदा मोठ्या प्रमाणात वाढली. या तीन महिन्यांमध्ये देशातून ४ लाख टन निर्यात झाली. मागील हंगामात या काळातील निर्यात २ लाख ७५ हजार टनांवर होती, असे साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले.

निर्यातीचे करार
देशातून जवळपास अडीच लाख टन सोयापेंड निर्यातीचे करारही झाले आहेत. यापैकी जानेवारीत १ लाख ६० हजार टन आणि फेब्रुवारीत १ लाख टन निर्यात होणार आहे. ही निर्यात मुख्यतः व्हिएतनाम, बांगलादेश, जपान आणि नेपाळ या देशांना होणार आहे.

सोयाबीनला आधार
सोयापेंड निर्यात वाढल्यानं सोयाबीन गाळपही वाढलं. त्यामुळं सोयाबीनला मागणी आहे. प्रक्रिया प्लांट्सकडील साठा कमी झाल्यानंतर बाजारातून खरेदी वाढेल. परिणामी सोयाबीन दराला आधार मिळू शकतो. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय. तर पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनचे भाव वाढून ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT