पुणेः देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दर (Soybean Export) नरमलेल्या पातळीवर स्थिर आहेत. दर सरासरी ५ हजार २०० रुपयांच्या जवळपास आहेत. त्यामुळे भारताच्या सोयापेंडचे दरही (Soya DOC Rate) कमी झाले. परिणामी देशातून सोयापेंड निर्यात वाढली. नोव्हेंबरमध्ये विक्रमी १ लाख ६४ हजार टन सोयापेंड निर्यात (Soya Doc Export) झाली, असं साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने (SEA) स्पष्ट केले.
साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने देशातून निर्यात झालेल्या सोयापेंड निर्यातीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात एसईएने म्हटले आहे की, देशात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर नरमले आहेत. सोयाबीनचे दर क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयाने कमी झाले आहेत. सोयाबीन सरासरी ५ हजार ६०० ते ६ हजार १०० रुपयांवरून कमी झाले. नोव्हेंबरच्या शेटवच्या आठवड्यात सोयाबीन ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांवर आले. सोयाबीनचा हा दर आजही कायम आहे. मात्र सोयाबीनचे दर कमी झाल्यानंतर सोयापेंडचेही दर नरमले. परिणामी देशातून सोयापेंडची निर्यात वाढली.
सोयापेंडचे दर सरासरी ५० हजार रुपये प्रतिटनावरून कमी झाले. सोयापेंडचे दर मागील महिन्यातील दराच्या तुलनेत जवळपास ७ हजार रुपयांनी नरमले. सध्या सोपेंडला सरासरी ४२ हजार रुपये दर मिळत आहे. सोयापेंडचे दर कमी झाल्याने निर्यातीसाठी पडतळ निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड ३८ हजार रुपयांवर आहे. मात्र ही सोयापेंड जीएम आहे. तर भारताची सोयापेंड नाॅन जीएम आहे. त्यामुळे भारताच्या सोयापेंडचे दर काहीसे जास्त असूनही निर्यात वाढली.
अर्जेंटीनातून सोयापेंड निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र यंदा अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन आणि सोयाबीन गाळप कमी होऊन सोयापेंडची निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिका, ब्राझील आणि भारत या देशांमधून चांगली निर्यात होऊ शकते. सध्या ब्राझीलमधून सोयापेंड निर्यातीचे दर ५८८ डाॅलर प्रतिटन आहेत. तर भारताची पेंड ५३५ डाॅलर प्रतिटनाने मिळते.
या देशांकडून मागणी
भारताच्या सोयापेंडचे मुख्य ग्राहक हे दक्षिण पूर्व आशियातील देश आहेत. या देशांना निर्यात करण्यासाठी भारताला लाॅजिस्टीकच्या दृष्टीने सोपे जाते. तसेच आपली सोयापेंड नाॅन जीएम असल्याने अमेरिका आणि युरोपातील काही देशांकडूनही मागणी असते. तसेच रुपयाचे अवमुल्यन झाल्यानेही निर्यातीला बळ मिळत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात देशातून विक्रमी सोयापेंड निर्यात झाली.
नोव्हेंबरमध्ये विक्रमी निर्यात
नोव्हेंबरमध्ये १ लाख ६४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. तर मागीलवर्षी नोव्हेंबरमधील निर्यात १ लाख ३४ हजार टनांवर स्थिरावली होती. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये देशातून ३ लाख २६ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. तर मागीलवर्षी याच काळतील निर्यात २ लाख १९ हजार टनांवर होती.
किती निर्यात शक्य
देशातून सोयापेंड निर्यातीसाठी पोषक स्थिती असल्याने निर्यात वाढू शकते. याचा फायदा देशातील सोयाबीनला मिळू शकतो. यंदा देशातून १५ लाख टनांपर्यंत सोयापेंड निर्यात होऊ शकते, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.