Dairy Products Export Agrowon
बाजार विश्लेषण

दुग्धजन्य पदार्थांची निर्यात तेजीत

कोविडमुळे डळमळीत झालेली जागतिक बाजारपेठ सुरळीत होत असताना दुधाच्या उत्पादनात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे जगाच्या बाजारात भारतीय दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढते आहे.

टीम ॲग्रोवन 

पुणे - कोविडमुळे डळमळीत झालेली जागतिक बाजारपेठ सुरळीत होत असताना दुधाच्या उत्पादनात (Milk Production) अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे जगाच्या बाजारात भारतीय दुग्धजन्य पदार्थांना मागणी (Dairy Product Demand) वाढते आहे. त्याचा फायदा राज्यातील दूध प्रकल्पांना होत असून, निर्यात झपाट्याने वाढते आहे.

एप्रिल २०२१ पासून देशातून सुरू असलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीने फेब्रुवारी २०२२ पर्यंत १ लाख ७० हजार टनांचा पल्ला गाठला होता. त्यातून ५५२ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल केली आहे. ‘‘डेअरी उद्योगातील निर्यात ६३ टक्के वाढली आहे. गेल्या हंगामात २१२२ कोटी रुपयांच्या आसपास निर्यात (Export) होती. या हंगामात ती दुपटीने वाढून चार हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे,’’ असे डेअरी उद्योगाचे (Dairy Industry) म्हणणे आहे.

पुण्याच्या इंदापूर भागातील सोनाई डेअरी उद्योग (sonai Dairy) समूहाच्या वार्षिक निर्यातीत ५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सोनाईला निर्यातीमधील पंचतारांकित निर्यातदाराचा (फाइव्हस्टार्स एक्स्पोर्टर) मान मिळतो आहे. चीज, बटर, पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, व्हाइट मिल्क पावडर, डेअरी व्हाइटनर, तूप अशा सर्वच पदार्थांना विदेशात मागणी वाढते आहे.

सोनाई डेअरी उद्योग समुहाचे अध्यक्ष दशरथ माने (Dashrath Mane) यांनी सांगितले, की जगात दूध उत्पादनात अग्रगण असलेल्या युक्रेन, रशिया, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह अनेक देश आता उत्पादनात पिछाडीवर आहेत. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत देशात सर्वांत मोठी कामगिरी अमूलची आहे. अमूलने गेल्या वर्षभरात १४०० कोटी रुपयांच्या पदार्थांची निर्यात केली. तसेच, सोनाईने देखील ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतून केली आहे. त्यामुळे राज्य आता निर्यातीत गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

राज्यातील दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातवाढीचा फायदा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना होतो आहे. निर्यात वाढविल्यामुळे सोनाईचे दूध संकलन २० लाख लिटर्सपर्यंत गेले आहे. दुधाच्या खरेदीदरात सतत होणारी वाढ याच निर्यातीवाढीमुळे घडून येते आहे. ‘‘न्यूझीलंडनतर उत्पादनात भारत आघाडीवर आहेत. निर्यातीत सातत्य ठेवल्यास दुग्ध व्यवसायाची आणखी भरभराट होऊन शेतकऱ्यांना आधार मिळू शकेल,’’ असे श्री. माने यांनी स्पष्ट केले.

चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांच्या म्हणण्यानुसार, तेजीत आलेल्या निर्यातीला कायम ठेवण्याची देशातील सरकारी व बिगर सरकारी दूध क्षेत्राने संयुक्तपणे पुढील दिशा आखायला हवी. ‘‘भारतीय दूध भुकटी, लोणी, चीज यांच्या मागणीत झपाट्याने वाढ होते आहे. जागतिक पातळीवर दुधाची तयार झालेली टंचाई, उन्हाळ्याचा कालावधी, युक्रेन-रशिया युद्धाचा हा परिणाम आहे,’’ असे ते म्हणाले.

गोविंद मिल्कचे माजी महाव्यवस्थापक बी. पी. पाटील म्हणाले, की कोविडनंतरच्या काळात जगभर पोषणविषयक जागृती आली आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे तरूणाईतील ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांकडे वळतो आहे. त्यामुळे देशी व विदेशी बाजारात नावीन्यपूर्ण दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होते आहे.’’

एस. बी. मार्केटिंग डेअरी सोल्युशनचे प्रमुख संजय भागवतकर यांच्या मते जगातील दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठा भारतीय डेअरी क्षेत्रासाठी आणखी विकसित होत जातील. ‘‘गाय, म्हशीच्या दूध उत्पादनात जगात दीड टक्के वाढ होत असताना भारतात हेच प्रमाणात ६.५ टक्के दराने वाढते आहे. त्यामुळे भारतीय उत्पादनांना वाव वाढतो आहे. अमूल, चितळे, कात्रज असे दूध प्रकल्प आता मिठाई निर्मितीमध्ये देखील उतरले आहेत. परिणामी, दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेची वाटचाल आता दमदार वळणार आली आहे,’’ असे भागवतकर यांनी स्पष्ट केले.

जागतिक पातळीवर भारतीय तसेच महाराष्ट्रातील दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढते आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी निर्यात टिकवून ठेवावी लागेल. मात्र निर्यात प्रोत्साहनासाठी दहा टक्के अनुदान देण्याची आधीची योजना आता तातडीने चालू करण्याची गरज आहे.
श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT