अनिल जाधव
पुणेः कापूस बाजारात (Cotton Market) सध्या चढ उतार सुरु आहेत. मात्र आज सीसीआयने (cci) कापूस खरेदी दर कमी केल्याने काहीसे चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. पण सीसीआय बाजारभावानुसार खरेदी करणार असल्याने दर कमी जास्त झाल्यास त्या दराने खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून नये. तसेच अपेक्षित दरपातळी ठरवून गरजेप्रमाणे कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री सुरु ठेवावी, असे आवाहन जाणकारांनी केले.
देशातील बाजारात सध्या कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशातील दरावरही परिणाम होताना दिसत आहे. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सीबाॅटवर आज कापसाचे दर काहीसे वाढून ८२.४० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. चीन आणि इतर देशांची मागणी वाढत आहे. त्यामुळे कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी कापूस बाजार सुधारणेसह सुरु झाल्यानं चालू आठवड्यात कापूस चांगली उभारी घेण्याची शक्यता आहे.
देशात मात्र कापूस दरात आज नरमाई पाहायला मिळाली. कापूस दर क्विंटलमागं सरासरी २०० रुपयांनी नरमले होते. देशातील कापूस दर आज सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. तर राज्यात आज कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. एरवी डिसेंबरमध्ये आवक जास्त आणि दर कमी असं चित्र असतं. मात्र यंदा आवक कमी असल्यानं दर चांगले आहेत.
कापसाचे दर कमी करण्यासाठी उद्योग प्रयत्न करणार, हे गृहित धरून बाजारातील अभ्यासक आधीपासूनच डिसेंबरमध्ये कापूस दरात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यक्त करत होते. सध्या कापसाच्या दरात चढ उतार होत आहेत. मात्र जानेवारीत दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांनी काय करावं?
1. एकदम कापूस विक्री टाळावी
2. सर्वच कापूस मागे न ठेवता गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्याने विक्री करावी
3. बाजारातील अफवांना बळी पडू नये
4. विक्रमी दराच्या अपेक्षेने जास्त जोखीम घेऊ नये
5. आपल्याला अपेक्षित दरपातळी ठरवून विक्रीचे नियोजन करावे
सीसीआयच्या खरेदीचा आधारच
भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआय खुल्या बाजारात खरेदीत उतरले आहे. सीसीआय बाजारभावाप्रमाणे कापसाची खरेदी करणार आहे. मात्र बाजारात आज कापसाचे दर नरमल्याने सीसीआयने खरेदी दर क्विंटलमागे ३०० रुपयाने कमी केले. त्यामुळे बाजारात एकच चर्चा सुरु झाली. तसेच पॅनिक निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. मात्र सीसीआय खरेदीत उतरल्याचा बाजाराला आधारच मिळेल. पण बाजारभावाप्रमाणे खरेदी करणार असल्याने दर कमी झाले म्हणून सीसीआयनेही दर कमी केले. उद्या बाजारभाव वाढल्यावर सीसीआयही खरेदीचा दर वाढवेल. सीसीआय स्वतः दर कमी किंवा जास्त करणार नाही तर बाजारभावानुसार खरेदी करणार आहे. त्यामुळे सीसीआयने दर कमी केले तरी घाबरण्याचे कारण नाही, असे जाणकारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.