Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मकादर पुन्हा २६०० रुपयांवर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा आणि प्रक्रिया उद्योग, कापड उद्योग, इथेनॉलसह, पोल्ट्री उद्योगाची वाढती मागणी अशा कारणाआड गेल्या आठवडाभरापासून मका दर तेजीत आले होते. राज्याच्या काही भागांत २९०० ते ३००० रुपये क्‍विंटलने मका विक्री झाली. आता मात्र १५० ते २५० रुपयांनी घट नोंदविली गेली आहे. २६०० ते २६५० रुपये क्‍विंटलने सध्या मक्‍याचे व्यवहार होत आहेत.

देशात दरवर्षी ३५० ते ३८० लाख टन मक्‍याचे उत्पादन होते. तर देशांतर्गत तक्‍याची मागणी ४०० लाख टन आहे. त्यामुळे दरवर्षी मक्‍याचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण होते, अशी स्थिती आहे. असे असले तरी देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्यात जवळपास वर्षभर मक्‍याची लागवड होते. त्यामुळे मागणी, पुरवठ्याची साखळी वर्षभर सुरू असते.

पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी बिहारमधील मका देशभराची गरज पूर्ण करतो. बिहार सरकारने जैवइंधनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे त्याच भागातून मक्‍याला मागणी वाढली आहे. साधारणतः १७ ते १८ रुपये किलोने विकल्या जाणारा मका त्या भागात २२ ते २३ रुपये किलोवर आला आहे. देशभरात कुक्‍कुट व्यावसायिक पशुखाद्यात याचा वापर करतात. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. मक्‍याला पर्याय म्हणून तांदूळ चुरीच वापर पशुखाद्यात होतो.

यंदा तांदूळ चुरीचे व्यवहार २२०० ते २३०० रुपयांनी होत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. तांदूळ चुरीचा देखील तुटवडा भासवीत दरात तेजी आणण्यात आली आहे. अशातच आता अचानक मका दरात घसरण नोंदविली गेली आहे. सुरुवातीला तुटवडा असल्याचे भासवीत जादा दराने विक्री करणारे व्यापारी आता २६०० ते २६५० रुपयांनी वाटेल तितका मका पुरविण्यास तयार असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.

व्यापाऱ्यांनी मक्‍याची साठेबाजी केल्याची शक्‍यता वर्तविली गेली असून, त्यामुळे देखील यापूर्वी दर वधारल्याचे सांगितले जाते. हिंदी भाषिकांच्या श्रावणामुळे मांस आणि अंडी मागणीत घट झाली आहे. कमी पक्ष्यांच्या बॅचेस पोल्ट्री व्यावसायिक घेत आहेत. त्याचाही परिणाम पशुखाद्याच्या मागणीवर झाला असल्याने मका दर प्रभावित झाले आहेत.

तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत झालेली आयात त्यासोबतच व्यापाऱ्यांनी त्यांच्यास्तरावर केलेल्या साठ्यातील मका विक्रीसाठी बाजारात आणला आहे. परिणामी आता सर्वदूर मका मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. त्याच कारणामुळे दरातही घसरण नोंदविली गेली आहे. २६०० ते २६५० रुपयांनी मका बाजारात मिळत आहे.
- रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती
तुटवड्याच्या परिणामी तांदूळ चुरीचा वापर पशुखाद्यात वाढला आहे. २२ ते २३ रुपये किलोचा दर चुरीला आहे. त्यामुळे देखील मक्‍याची मागणी घटत दर दबावात आल्याची शक्‍यता आहे. सध्या २६०० ते २६५० रुपये क्‍विंटलने मक्‍याचे व्यवहार होत आहेत. यापुढील काळात या दरात आणखी घट होईल, असे संकेत आहेत. आधी तुटवडा असताना आता मात्र बाजारात मुबलक प्रमाणात मका असल्याची स्थिती आहे.
- शुभम महाले, अमरावती जिल्हा पोल्ट्री व्यावसायिक संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT