Pune News : केंद्र सरकार भरडधान्य उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी चालू खरिप हंगामात २६ लाख टन भरडधान्य खरेदीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.
यापैकी २२ लाख ३१ हजार टन भरडधान्याचे वितरण होण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक वितरणातून आहारात भरडधान्याचा वापर वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाने स्पष्ट केले.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने नुकतेच राज्याच्या अन्न मंत्र्यांची एक बैठकीत बोलावली होती. या बैठकीत देशात भरडधान्य खेरदीची प्रभावी आणि सर्वसमावेशक पध्दती ठरवण्यात आली, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
भरडधान्य वापराकडे विशेष लक्ष दिल्यास नागरिकांना पोषणमुल्याची कमतरता पडणार नाही. भरडधान्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे भरडधान्य उत्पादन, सरकारी खरेदी आणि वापर वाढविण्यासाठी धोरण ठरविण्यात येत आहे, असेही अन्न मंत्रालयाने स्पष्ट केले.
या बैठकीत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी धान्य खरेदी आणि वितरणात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. या बैठकीत मंत्री गोयल यांनी नव्या साखर-इथेनाॅल पोर्टलचे उद्घाटनही केले.
शेतीमाल खरेदीत सुसुत्रता आणि गुणवत्ता राखण्यासाठी खरेदी केंद्रांच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर मंथन झाले. त्यासोबत सार्वजनिक वितरण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबांपर्यंत अन्न पोचविण्यावर जोर देण्यात आला.
खरिप हंगामात २०२३-२४ मध्ये केंद्राने भरडधान्य खरेदीचे उद्दीष्ट वाढवले आहे. एक ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या खरिप विपणन हंगामात २६ लाख १४ हजार टनांवर खरेदीचे उद्दीष्ट आहे. तर या एकूण खेरदीपैकी २२ लाख ३१ हजार टनांचे वितरण होण्याचा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला.
देशात एकसंघपणा टिकून राहावा यासाठी राज्यांनी केंद्रासोबत काम करावे. केंद्र सरकारने भरडधान्याला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठरवले आहे. यंदा भरडधान्य खरेदीवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. देशातील अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि देशाची अन्नसुरक्षा दृढ करण्यासाठी धान्य खरेदीच्या प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक आहे.- पीयूष गोयल, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.