Orange Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kalamana APMC : संत्रा-मोसंबीवरील काट पद्धत अखेर कळमना बाजारात बंद

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यासमोरच कानउघाडणी केल्यानंतर कळमना बाजार समितीद्वारे बाजार समितीच्या परिसरात काट आकारणी केली जाणार नाही, अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. संत्रा बागायतदारांनी या संबंधी थेट कृषिमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असला तरी याची अंमलबजावणी कशी होणार याविषयी साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

कळमना बाजार समितीत हंगामात २० लाख टन संत्रा-मोसंबीची खरेदी होते. या शेतकऱ्यांकडून प्रति टन १०० किलो याप्रमाणे काट आकारला जातो. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या संत्रा फळांमध्ये काही लहान आकाराची संत्रा फळे असल्याचे कारण देत हा काट (सूट) आकारला जातो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही लुटीची परंपरा कायम आहे. ही पद्धत बंद व्हावी याकरिता यापूर्वी देखील सातत्याने मागणी करण्यात आली.

पणन मंत्र्यांपर्यंत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, आठवडाभरापूर्वी माजी आमदार आशिष देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह ‘महाऑरेंज’चे संचालक मनोज जवंजाळ व इतर शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली होती.

या वेळी झालेल्या बैठकीत संत्रा बागायतदारांच्या विविध समस्यांवर मंथन झाले. त्या वेळी काही शेतकऱ्यांनी कळमना बाजार समितीत आकारल्या जाणाऱ्या काटचा मुद्दा उपस्थित केला होता. या बैठकीला पणन विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. त्यांनी बैठकीतूनच कळमना बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधत लुटीचा हा प्रकार थांबवावा, अशी सूचना दिली.

बाजार समिती प्रशासनाने देखील त्याची दखल घेत दि नागपूर फ्रूट डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यामध्ये काट न आकारण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर फ्रूट डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देखील काट घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

बाजार समितीत लागला फलक

बाजार समिती प्रशासनाच्या निर्देशानुसार फ्रूट डीलर असोसिएशनने काट घेणार नाही, असे जाहीर केल्यानंतर तसा फलकही बाजार समिती परिसरात लावण्यात आला आहे. शेतीमालाची ग्रेडिंग (प्रतवारी) झाल्यास कोणतेही वजनात काट राहणार नाही. जेणे करून शेतकरी बांधवांना रास्त भाव मिळेल, असा मजकूर यावर नमूद आहे.

काट आकारण्याविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत सर्वानुमते त्यावर तोडगा काढण्यात आला. आता संत्रा फळाच्या ढिगाची प्रतवारी केल्यानंतर त्यातून निघणाऱ्या लहान आकाराच्या फळांना देखील वेगळा दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
- नागनाथ येगलेवाड, सचिव, बाजार समिती, कळमना, नागपूर
कृषिमंत्र्यांनी संत्रा उत्पादकांच्या समस्यांसाठी बैठक बोलावली होती. या वेळी पणन अधिकाऱ्यांनी याच बैठकीतून थेट कळमना बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर आता काट न घेण्याचा निर्णय बाजार समितीने जाहीर केला आहे. हा निर्णय स्वागत योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
- मनोज जवंजाळ, संत्रा बागायतदार, काटोल, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Agriculture Mechanization : शेतीच्या कामासाठी सुलभ यांत्रिकिकरण आवश्‍यक

Apple Ber Farming : ॲपल बोर लागवडीत कीड-रोग व्यवस्थापनावर भर

Agriculture Processing : शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, निर्यातीवर भर द्यावा

Satara Agriculture Complex : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कृषी संकुल साताऱ्यात, १० हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT