Onion Market Update नाशिक : “शेतकरी राजा चांगला चांगला, या कांद्याच्या भावात (Onion Rate) भंगला, तुम्ही म्हणाल हो खोटं, तो कसंकाय भरील हो पोटं ” अशा कातरत्या शब्दात कांद्याच्या भावाच्या दुःखाच गाणं गात सोमठाण देश (ता.येवला) येथील ज्येष्ठ शेतकरी बाळासाहेब चव्हाण यांनी कांदा उत्पादकांची (Onion Farmer) लासलगाव बाजार समितीच्या कांदा आवारात व्यथा मांडली.
सध्या लेट खरीप कांद्याचा (Let Kharif Onion) खर्च दुप्पट;उत्पन्न निम्म्यावर अशीच वाईट परिस्थिती आहे. उत्पादन (Onion Production) व दराने अशा दोन्ही बाजूने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मात्र असे असताना सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
सध्या कांद्याचे दर पडल्याने लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा उत्पादकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘यंदा खरीप व लेट खरीप कांद्याला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. रोपांचे नुकसान झाले.
लागवडीची मजुरी वाढली. खते-औषधांचे तर विचारूच नका,’ या शब्दांत शेतकरी व्यक्त झाले. लासलगाव बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला किमान ३०० कमाल १२३५ तर सरासरी ५७५ रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे यंदा कांद्याचे गणित कोलमडले आहे.
पदरमोड करून एकरी पाऊण लाखांवर खर्च केला. मात्र भाव नसल्याने ३५ ते ४० हजार रुपये एकरी उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे सरकारी धोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे.
कातरणी (ता. येवला) येथील शेतकरी कौतिक कदम म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी उत्पादन बरे होते, दरही मिळाले. यंदा उत्पादनही नाही आणि कांद्याला भाव नाही. एकरी ८० हजार रुपये खर्च केला. तर ४० ते ४५ हजार रुपये परतावा मिळाल्याने खर्चही निघाला नाही.
दीड ते दोन हजार रुपये क्विंटलला भाव मिळाला पाहिजे. अन्यथा घरातून पैसे घालून सुद्धा हा खर्च फिटत नाही. खतांचे, औषधाचे, मजुरीचे असे सारेच भाव वाढले, मात्र कांद्याला भाव नाही. त्यामुळे कांदा उत्पादकाचे यंदा अवघड झालेय.’’
आता सरासरी दर ५०० रुपयांवर खाली आले आहेत. एकीकडे ५० हजार क्विंटलची आवक कमी होऊन ती निम्म्यावर आली. मात्र आवक कमी होऊनही सध्या दरात कुठलीच सुधारणा नाहीच. सध्याच्या भावात साधा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची गंभीर स्थिती आहे.
सरकारचे सर्व धोरण चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही. असे जर राहिले तर शेतकरी जगणार नाही. फक्त निवडणुका आल्या की शेतकऱ्यांना गोंजारले जाते, असा टीकेचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.
‘आता कुठे गेले केंद्रातील सरकार?’
ज्यावेळी कांद्याचे भाव असतात, त्यावेळेस दिल्लीवरून कांद्याचे दर पाडण्यासाठी पथके येतात. आता कांदा मातीमोल विकला जात आहे. आता सरकारचे लक्ष इकडे का नाही? ज्यावेळी दर वाढतात त्यावेळी खाणारा जगविण्यासाठी हस्तक्षेप केला जातो;
मात्र आता पिकविणारा मरतोय तर कुठे गेले सरकार? त्यांना शेतकऱ्यांची व्यथा दिसत नाही का? असा संतप्त सवाल कांदा उत्पादक पंढरीनाथ कदम यांनी उपस्थित केला.
सध्याचा कांद्याचा भाव शेतकऱ्याला डबघाईस आणेल. भांडवल गुंतवून सुद्धा कुठलाही मोबदला मिळत नाही. सरकारने शेतकऱ्यांचे अतोनात हाल चालले आहेत, ते पाहावे. शेतकरी सरकारकडे आशेने पाहात आहे. शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल अशा दराची तजवीज करावी.
- दिलीप जगताप, कांदा उत्पादक, शेळकेवाडी, ता. निफाड.
कांद्याला तीनशे ते साडेतीनशे रुपये कांद्याला प्रत्यक्षात भाव मिळत आहे. कांदा सोडून आज बाजारात सर्व काही महाग आहे. कांदा पिकविताना महागाईची सामना करायचा आणि बाजारात येऊन सगळ्यात स्वस्त कांदा विकायचा अशी भीषण स्थिती आहे.
- संदीप कदम, कांदा उत्पादक, कातरणी, ता. येवला.
माझा गुणवत्तेचा कांदा १२०० रुपये प्रतिक्विंटल गुणवत्तेचा होता. मात्र प्रत्यक्षात ६०० रुपये दर मिळाला. माझ्या मुलीचे लग्न करता येणार नाही. फक्त मतदान पुरताच शेतकऱ्यांना आश्वासने द्यायची. भाव वाढल्यावर पाडण्यासाठी प्रयत्न होतात. मात्र आता काय?
- बाळासाहेब चव्हाण, कांदा उत्पादक, सोमठाण देश, ता. येवला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.