Yavatmal News : यंदा कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दरही सद्यःस्थितीत खाली आली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सहकार विभागाने कंबर कसली आहे. खेडा खरेदीला आळा घालण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.
यंदा कापसाचे दर फार सुधारलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगले दर मिळाले होते. अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा फायदा अधिक झाला. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाच्या दरात घसरण झाली आहे. अजूनही शासकीय कापूस खरेदी सुरु झालेली नाही.
दिवाळीत कापूस शेतकऱ्यांच्या घरात येण्यास सुरवात होईल. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला जास्त दर नाही. यंदा कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पिकाची वाढ खुंटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिवाय, कापूस उशिरा हातात येईल, असाही अंदाज आहे. काही भागांत बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकात घट येणार आहे. अशा अनेक संकटांवर मात करून पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दराचा फटका बसण्याची भीती आहे.
‘सीसीआय’ने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, अजूनही केंद्र सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे दरात वाढ होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. यात मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे.
कापूस खरेदीत शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची खबरदारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय घेत आहे. खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी खरेदीवर सहकार विभागाचे लक्ष असेल. गेल्यावर्षी सहकार विभागाने पथक तयार केले होते. या वेळी हा प्रयोग राबविण्यासाठी सहकार विभागाची तयारी सुरू आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी सहकार विभाग कामाला लागला आहे. येणाऱ्या काळात कापूस पीक शेतकऱ्यांच्या घरात येणार आहे. त्यापूर्वी खेडा खरेदीद्वारे कमी भावात कापूस घेतले जात असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहे. यावर आमचे लक्ष असेल.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.