Chana Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate : हरभऱ्याच्या दरात शंभर ते दोनशे रुपये चढउतार

Chana Market : सध्या बाजारात हरभऱ्याला ६८०० ते ७४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

Anil Jadhao 

Pune News : हरभऱ्याच्या भावात आठवड्यापासून काहीसे चढउतार सुरू आहेत. कमी पुरवठा, वाढलेली मागणी यामुळे दरात तेजी आली. परंतु वाढलेल्या भावात कमी झालेला उठाव, आयातवाढीची शक्यता आणि स्टॉकिस्टची नफा वसुली यामुळे दरात मागील आठवडाभरात १०० ते २०० रुपयांचे चढउतार दिसून आले. सध्या बाजारात हरभऱ्याला ६८०० ते ७४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

आयातीचा विचार केला तर पिवळा वाटाणा आयात यंदा मोठ्या प्रमाणात झाली. जुलैपर्यंत देशात जवळपास ३१ लाख टन पिवळा वाटाणा आयात झाली. तर हरभरा आयात मर्यादितच म्हणजे एक लाख टनांच्या दरम्यान राहिली. पिवळा वाटाणा आयात वाढल्याने हरभरा दरावर दबाव राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कारण हरभऱ्याला पर्याय म्हणून विशेषतः प्रक्रिया उद्योगात पिवळ्या वाटाण्याचा वापर होतो. दुसरीकडे भारताने आयात खुली केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढले होते. त्यातच आता देशात सणांमुळे मागणी वाढत आहे. तसेच आयातीचे चित्र स्पष्ट झाल्याने तेजी-मंदीचे सत्र सुरू झाले. दीड महिन्यातच हरभऱ्याच्या भावात मोठी तेजी आली. स्टॉकिस्टनी बाजारात हरभऱ्याचा पुरवठा कमी केला. सणांची मागणी, देशातील उपलब्ध साठा आणि आयात मालाचा अंदाज यामुळे बाजारात कृत्रिम तेजी आल्याचे काही बाजार अभ्यासकांनी सांगितले.

अकोला येथील एका डालमिल चालकाने सांगितले, की देशात हरभऱ्याचा पुरवठा कमी आहे. त्यातच मागणी वाढत आहे. आयात होत असली तरी जागतिक बाजारात देशी हरभरा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आयात करूनही देशाची गरज भागणार नाही. पिवळा वाटाणा काही प्रमाणात पर्याय म्हणून वापरला जात असला तरी त्यामुळे हरभऱ्याची मागणी कमी होणार नाही. नवा माल आल्यानंतर बाजारातील पुरवठा वाढणार आहे. तरीही हरभऱ्यातील तेजी जास्त काळ टिकून राहील, असे वाटत नाही.

हरभऱ्याचे भाव मागील दीड महिन्यात चांगलेच वाढले. मात्र आठवडाभरात बहुतांश बाजारांतील तेजी कमी झाली किंवा भाव टिकून आहेत. देशपातळीवरच्या सरासरी भावाचा विचार केला तर मागच्या आठवडाभरात हरभरा भाव क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. तर बहुतांश बाजार समित्यांमध्ये दरात चढउतार सुरू आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील बाजारांत भावपातळी मागील आठवडाभरात काहीशी कमी झाली.

टांझानिया, ऑस्ट्रेलियातून आयात वाढली

प्रक्रियादारांनी सांगितले, की सध्याच्या भावात मागणी कमी येत आहे. डाळ आणि बेसनचेही भाव वाढले आहेत. दुसरे म्हणजे देशात मोठी तेजी आल्यानंतर विदेशात केलेला स्टॉकही देशात येत आहे. टंझानिया आणि ऑस्ट्रेलियातून आयात वाढत असून मागील काही दिवसांत ५० ते ६० कंटेनर हरभरा बंदरांवर दाखल झाल्याचे काही अभ्यासकांनी सांगितले. टंझानियातून नव्या हरभऱ्याची आयात सुरू झाली. तर ऑस्ट्रेलियातून सध्या जुन्या हरभऱ्याची आयात होत आहे. जुन्या मालाचा स्टॉक तेथे उपलब्ध आहे. तर ऑक्टोबरच्या शेवटीपासून नव्या मालाची आयातही सुरू होईल. टंझानियात यंदा १.५ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज आहे. यापैकी बहुतांश हरभरा भारतात आयातीची शक्यता आहे.

स्टॉकिस्टची नफावसुली

स्टॉकिस्टही वाढलेल्या भावात नफावसुली करत आहेत. बहुतांश स्टॉकिस्टची खरेदी ६ हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. सध्या हरभऱ्याला मोठ्या ग्राहक बाजारांमध्ये ७४०० ते ७९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. खरेदी भावाच्या तुलनेत सध्या मिळत असलेला भाव चांगला नफा देणारा आहे. त्यामुळे स्टॉकिस्ट सध्याच्या भावात माल बाहेर काढत आहेत. वरील सर्व कारणांमुळे हरभरा भावातील तेजी जास्त दिवस टिकणार नाही, असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT