Cotton Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापसातील तेजीचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?

यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेनं कापूस मागं ठेवला. पण मार्च महिन्यापर्यंत बहुतांशी कापूस विकला. सध्या कमी शेतकऱ्यांकडे कापूस आहे. वायद्यांमध्ये दोन दिवसांपासून मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

Anil Jadhao 

Cotton Rate Update : यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेनं कापूस मागं ठेवला. पण मार्च महिन्यापर्यंत बहुतांशी कापूस (Cotton) विकला. सध्या कमी शेतकऱ्यांकडे कापूस आहे. वायद्यांमध्ये दोन दिवसांपासून मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

त्यातच चालू महिन्यापासून कापसाची बाजारातील आवक कमी होऊन दरात तेजी येईल, असं शेतकरी आणि जाणकारांसह उद्योगांकडूनही सांगण्यात येत आहे. पण या तेजीपासून बहुतांशी शेतकरी वंचित राहतील. कारण बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे.

बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा अधिक दिसते. दरात क्विंटलमागं ३०० रुपयांची सुधारणा झाल्यानंतर अनेक शेतकरी कापूस विकत आहेत. त्यामुळं दरही स्थिर दिसतात. पण कापसाचे भाव पुढील काळात सध्याच्या पातळीवरून वाढतील. दरात नरमाई येईल असे कोणतेही घटक सध्या दिसत नाहीत, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

कापूस दरवाढीला पोषक घटकांमध्ये महत्वाचा घटक म्हणजे देशातील कापूस पुरवठा. सध्या शेतकऱ्यांकडे खूपच कमी कापूस शिल्लक आहे. तर उद्योगांची गरज कायम आहे. त्यातच सुतगिरण्यांकडे कापसाचा स्टाॅक कमी आहे. त्यामुळं सुतगिरण्यांना कापसाची खरेदी वाढवावी लागेल.

खुद्द काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनीही उद्योगांना कापूस खरेदी करण्यास सांगितलं. गणात्रा यांच्या मते पुढील काळात कापसाची बाजारातील आवक कमी राहील. उद्योगांना कापूस मिळणार नाही. त्यामुळं कापसाचे भावही वाढतील.

दुसरीकडं अनेक शेतकरी थांबण्यास इच्छूक दिसत नाहीत. कारण मागील आठवड्यात कापसाच्या दरात सुधारणा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री वाढवली. त्यामुळं एप्रिलनंतर खूपच कमी शेतकऱ्यांकडं कापूस असेल.

कापसाची बाजारातील आवक चालू महिन्यातच कमी होईल. यामुळं दरातही सुधारणा दिसेल. मे महिन्यात कापसाची आवक थांबल्यानंतर दरातील तेजी वाढू शकते. याचा अंदाज उद्योगांनाही आहे. त्यामुळेच गणात्रा यांनी उद्योगांना आताच कापूस खरेदी करण्याचं आवाहन केलं.

पण शेतकऱ्यांच्याबाबतीत यंदाही मागील हंगामासारखचं घडतं की काय? असा संशय येतोय. मागील हंगामात मार्चनंतर कापसाच्या दरात मोठी तेजी आली होती.

दरानं १० ते १२ हजारांचाही टप्पा गाठला होता. पण ही दरपातळी झाली त्यावेळी शेतकऱ्यांकडं कापूस नव्हता. कारण शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत ७ ते ८ हजार रुपयाने कापूस विकला होता. यंदाही बहुतेक कापूस शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत विकला.

गेल्या हंगामात कापसाचे भाव वाढले म्हणून यंदा शेतकऱ्यांनी माल दोन महिने मागं ठेवला. त्यामुळं फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत दर ८ हजारांपेक्षा जास्त होते. पण नंतर शेतकऱ्यांनी कापूस विक्री वाढवली. त्यामुळं दरही कमी झाले.

बाजारात आवक वाढल्यानं उद्योगांनी भाव कमी केले. यंदा फरक एवढाच आहे की गेल्यावर्षीपेक्षा काहीसा जास्त कापूस शेतकऱ्यांनी मागं ठेवला. पण त्याचं प्रमाणंही कमीच आहे. यातील किती शेतकरी या तेजीपर्यंत थांबतात हे पाहावं लागेल.

यंदाही कापूस उत्पादन कमीच असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळं दरात तेजी येणारच होती. पण जास्तीत जास्त कापूस फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच बाजारात आला. देशातील उत्पादन किती आहे त्यासोबतच हे उत्पादन हंगामाच्या १२ महिन्यांपैकी किती दिवसात बाजारात येतं, यावरही बाजारभाव तेवढाच असवलंबून असतो.

शेतकरी जास्त दिवस कापूस ठेऊ शकत नाहीत. हंगामाच्या मध्यानंतर म्हणजेच मार्चनंतर मोजक्याच शेतकऱ्यांकडे स्टाॅक असतो. त्यामुळे तेजीचा फायदाही शेतकऱ्यांना कमीच होताना दिसतो. याचा अनुभव आपल्याला मागील हंगामातही आला.

आता आपण आज देशातील बाजारात काय स्थिती होती ते पाहू, देशातील वायद्यांमध्ये मोठी तेजी आली. दोन दिवसांमध्ये एप्रिलच्या वायद्यांमध्ये खंडीमागं ६०० रुपयांची वाढ झाली.

एप्रिलचे वायदे आज दुपारपर्यंत ६३ हजार ३०० रुपयांवर होते. तर जूनच्या वायद्यांमध्ये ८०० रुपयांची तेजी दोन दिवसांमध्ये दिसली. जूनचे वायदे ६४ हजार ८०० रुपयांवर होते. पुढील काळात देशात कापसाचा पुरवठा कमी राहील, यामुळेच वायद्यांमध्ये तेजी आल्याचे जाणकारांनी सांगितलं.

बाजार समित्यांमध्ये कापसाला आज ७ हजार ७०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळाला. या दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केल्यास दरात सुधारणा होईल. उद्योगांना कापसाची गरज आहे. पण आहे त्या दरातच जास्तीत जास्त खरेदीचा प्रयत्न होईल.

पण आता स्टाॅक कमी आहे. शेतकऱ्यांकडील स्टाॅकही घटला. त्यामुळं पुढील काळात दर वाढवल्याशिवाय कापूस मिळणार नाही. त्यामुळं शक्य असल्यास थांबण्यास हरकत नाही.

पण शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताना बाजाराची शहानिशा करावी. बाजाराचा आढावा घेऊनच विक्रीचा निर्णय घ्यावा, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT