Nutritious Millets Agrowon
ॲग्रोमनी

चिमुकली, तरीही पोषणात सर्वांना भारी...

पौष्टिक लघू तृणधान्ये: ओळख आणि महत्त्व - भाग : १

टीम ॲग्रोवन 

डॉ. चंद्रकांत जायभाये, दिनेश कानवडे

अत्यंत गुणी, विविध पोषणमूल्यांनी भरपूर अशा लघू तृणधान्यांबाबत (भरडधान्ये) आपल्याला फार कमी माहिती आहे. भारत सरकारने पौष्टिक तृणधान्ये (Nutri Cereals) या वर्गात त्यांना अधिसूचित केले आहे. गरज आहे त्यांचे लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याची, त्यांचा दैनंदिन आहारात वापर वाढवण्याची. ग्राहकांच्या आरोग्याविषयीच्या विविध समस्या त्यातून कमी होतीलच शिवाय शेतकऱ्यांचे अर्थकारणही त्यातून वाढीस लागेल.

कृषी क्षेत्राच्या विकासकार्यात लघू तृणधान्य पिके (उदा. राळा, वरई, बर्टी, नाचणी, कोडो, बाजरी) काही प्रमाणात दुर्लक्षित राहिली होती. परंतु पौष्टिक मूल्यांचा विचार करता उत्तम आरोग्याच्या दृष्टीने व आहारविषयक जागृतीमुळे या पिकांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या बाबींचा विचार करता भारत सरकारने १३ एप्रिल, २०१८ च्या राजपत्राद्वारे राळा, नाचणी, बर्टी, कोडो, बाजरी आणि ज्वारी यांचा पौष्टिक तृणधान्ये (Nutri Cereals) या वर्गात समावेश करून त्यांना अधिसूचित केले आहे. अशा या दुर्लक्षित राहिलेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख आणि महत्त्व लक्षात घेऊन सुधारित पद्धतीने लागवड करून त्यांची उत्पादकता वाढवणे काळाची गरज झाली आहे. या पिकांची ओळख पुढीलप्रमाणे

वरई (Little Millet)

वरी, कुटकी, सावा या नावांनी सुद्धा ओळखले जाते. धान्य सर्वांत लहान आकाराचे असल्यामुळे यास इंग्रजीमध्ये लिटील मिलेट (Little Millet) असे म्हणतात. भारतातील पारंपरिक पिकांपैकी हे आहे. महाराष्ट्रात लागवड अमरावती (चिखलदरा, धारणी), नगर (अकोले), नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी भागांत केली जाते. दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे वरई हे प्रमुख अन्न आहे. उपवासासाठी याचे प्रमुख अन्न म्हणून भाताच्या स्वरूपात सेवन करतात.

शास्त्रीय ओळख- हे एकदल प्रकारातील पीक असून, उंची ३० ते १५० सेंमीपर्यंत असते. पाने गवताच्या पात्यांप्रमाणे असून, मऊ किंवा त्यावर लव असते. खोड काडीसारखे बारीक व सरळ वाढणारे आहे. भातासारखी यास फुले येत असून, चार ते पाच सेंमी. लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे हे पीक जास्त पर्जन्यमान प्रदेशात देखील चांगले उत्पादन देते.

आहारविषयक महत्त्व

पौष्टिक घटक भरपूर असूनही याचा समावेश दैनंदिन आहारात न होता फक्त उपवासाच्या दिवशीच होत आहे ही खेदाची बाब आहे. पोषक घटकांचा विचार करता गहू आणि भातापेक्षा वरईचा आहारात समावेश करणे आरोग्याच्या दृष्टीने निश्‍चितच फायद्याचे आहे.

  • बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारावर उपयुक्त

  • तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी लाभदायक

  • शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका

  • स्त्रियांमधील अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर उपयुक्त

  • वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी उपयोगी

  • लागवड तंत्रज्ञान- ठळक बाबी

  • अनुकूल हवामान- वार्षिक पर्जन्यमान- २५०० मिमी.

  • समुद्रसपाटीपासून २१०० मी. उंचीपर्यंत प्रदेशात होते.

  • वाढीसाठी पोषक तापमान- २३ ते २७ अंश सेल्सिअस.

  • जमीन- हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पादन मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. रोपलागवड पारंपरिक आणि प्रचलित पद्धत आहे.

  • रोपवाटिका- एक एकर क्षेत्र लागवडीसाठी २ ते ३ गुंठे क्षेत्र, ८ ते १० सेंमी. उंच व उतारानुसार लांबी ठेवावी. बीजप्रक्रिया आवश्‍यक आहे.

  • लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास २० ते २५ दिवसांनी पहिले आणि ४० ते ४५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

  • लागवडीनंतर एक महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरावे.

  • आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर, कारला ही पिके २-१ या प्रमाणात घेता येतात.

सुधारित वाण

फुले एकादशी- सरासरी धान्य उत्पादन हेक्टरी १२ ते १४ क्विं. कडबा उत्पादन २० ते २५ क्विंटल. कालावधी- १२० ते १३० दिवस.

राळा (Foxtail Millet)

या पिकास जर्मन मिलेट असेही संबोधतात. याचे कणीस झुपकेदार असून, पक्वतेच्या वेळेस कोल्ह्याच्या शेपटीसारखे अर्धगोलाकार होते. म्हणून यास फॉक्सटेल (कोल्ह्याची शेपटी) मिलेट असे म्हणतात. हिंदीत कागनी, गुजरातमध्ये कांग तर पंजाबमध्ये कंगनी म्हणतात. राळा हे एकदल प्रकारातील पीक असून, ६० ते १०० सेंमी.पर्यंत उंच तसेच खोड काडीसारखे सरळ वाढते. फुटव्यांची संख्या ४ ते ८ असते. पाने गवताळ असून, लव असते. कणसे १० ते २० सेंमी. लांब, अर्धगोलाकार, केसाळ झुपकेदार असतात. पक्वतेच्या अवस्थेत कणसातील दाणे भरल्यामुळे कणसे खाली झुकतात. ७० ते ९५ दिवसांच्या कालावधीत पीक कापणीस येते.

पिकाचे महत्त्व

४० ते ५० वर्षांपूर्वी आहारात मुख्य अन्न म्हणून याचा समावेश होता. जगातील एकूण पौष्टिक तृणधान्य उत्पादनात राळा पिकाचा दुसरा क्रमांक असून, अंदाजे सहा दशलक्ष टन उत्पादन होते. पिकाचा वाढीचा वेग जास्त असल्याने कमी दिवसांत जीवनक्रम पूर्ण होतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही हे पीक तग धरू शकते. मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्यास आकस्मित पीक नियोजनात या पिकास भरपूर वाव आहे. महाराष्ट्रात राळा पिकाची पेरणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. मानवी आहारासोबतच धान्याचा उपयोग पाळीव पक्ष्यांसाठी खाद्यान्न, तसेच कडब्याचा उपयोग जनावरांसाठी होतो.

लागवडीतील ठळक बाबी

  • बियाणे प्रमाण- हेक्टरी ८ ते १० किलो.

  • शिफारशीत वाण : पी.एस.-४, एआय.ए.-३२६, ३०८५, ३०८८ आदी.

  • आंतरपिके- राळा + कापूस (५ : १), तूर (५ : १) ही पद्धती फायदेशीर. ७० ते ९५ दिवसांत काढणीस येते.

  • उत्पादन- हेक्टरी- धान्य- १५ ते १८ क्विं.

  • कडबा- २० ते ४० क्विं.

बर्टी (Barnyard Millet)

यास सावा, शमुल, सावऱ्या नावानेही ओळखतात. हिंदीत झंगोरा नावाने परिचित आहे. हे एकदल वर्गातील पीक असून, ५० ते १०० सेंमी. सरळ उंच वाढते. फुटव्यांची ४ ते ७ पर्यंत संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे सपाट व मऊ, बारीक लव असते. दुष्काळजन्य तसेच अतिपर्जन्यमान असलेल्या भागात तग धरुन राहते. या लघू पौष्टिक तृणधान्याची लागवड धान्य आणि चारा अशा दुहेरी हेतूने केली जाते. उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तमिळनाडू, गुजरात व महाराष्ट्रात लागवड होते. भारतात ०.९३ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून ०.७३ लाख टन एकूण उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता ७५८ किलो प्रति हेक्टरी आहे.

आरोग्यदायी महत्त्व

  • उपवासासाठी बर्टीचा वापर भाताप्रमाणे शिजवून केला जातो. नवरात्रीत तसेच इतर उपवासाच्या दिवशी पचनास हलका अन्न पदार्थ म्हणूनही अनेकांची पसंती बर्टी भगरीला असते.

  • धान्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून प्रथिने सहज पचण्याजोगी.

  • पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीत कमी कामाचे किंवा बैठे काम करणाऱ्यांसाठी बर्टी वरदान आहे.

  • यातील नियासिन जीवनसत्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

  • लिनोलिक, पाल्मेटिक आणि ओलिक ही असंपृक्त स्निग्धाम्ले हृदयरोगी व मधुमेहींसाठी उपयुक्त आहार.

  • रक्तातील साखरेची आणि लिपीडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी.

  • बर्टी धान्य ग्लुटेन मुक्त (Gluten free) असल्यामुळे ग्लुटेनची ॲलर्जी असणाऱ्यांना उपयुक्त.

लागवड तंत्रज्ञान- ठळक बाबी

  • हलकी ते मध्यम जमीन उपयुक्त. पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम.

  • उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात येणारे पीक. समुद्रसपाटीपासून २७०० मी. उंचीपर्यंतच्या भागात पीक

  • लागवड - वार्षिक पर्जन्यमान २०० ते ४०० मिमी. आवश्यक.

  • हंगाम- खरीप हंगाम. लागवड पेरणी पद्धतीने. जास्त पावसाच्या प्रदेशात रोप लागवड.

  • बियाणे- ३ ते ४ किलो हेक्टरी.

  • आंतर पीक पद्धती- बर्टी अधिक राजमा (४ : १) प्रमाणात फायदेशीर.

  • वाण- फुले बर्टी, व्हीएल २०३

  • उत्पादन- हेक्टरी धान्य- १८ ते २० क्विं, कडबा- २० ते २५ क्विं.

क्रमश:

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Protection: वाहनांसह बचाव साहित्य वन विभागाकडे सुपूर्द

Kharif Season Planning: खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध : शंभूराज देसाई

HTBT Seeds Illegal Sale: एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री विरोधात कारवाई करा

Paddy Procurement Process: धान खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी

Fertilizer Linking: खताबरोबर अन्य सह-उत्पादनांची सक्ती केल्यास कारवाई

SCROLL FOR NEXT