Soybean, Cotton Rate
Soybean, Cotton Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean-Cotton Rate In Maharashtra : सोयाबीन, कापसातील किंमतवाढीचे आंतरराष्ट्रीय संकेत

श्रीकांत कुवळेकर

Cotton Rate Update : मागील आठवडा शेतीमाल बाजारपेठेसाठी आश्‍वासक ठरला. त्यापूर्वीच्या तीन-चार आठवड्यांमध्ये सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton) सातत्याने नरम राहिले तर तूर (Tur), उडीद (Urad) आणि हरभरा (Chana) वगळता बहुतेक सर्वच वस्तू मंदीच्या छायेखाली राहिल्या. परंतु आता मंदीचे मळभ नजीकच्या काळापुरते तरी दूर होण्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेमध्ये व्याजदर वाढीचे सत्र लांबणार असे वाटत असतानाच त्याला ब्रेक लागण्याची शक्यता बळावली आहे. तर बँकिंग क्षेत्रातील दिवाळखोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती सध्या तरी कमी झाली आहे.

या दोन्ही घटनांचा कमोडिटी बाजाराशी थेट संबंध दिसत नसला तरी त्याचा डॉलर मजबुतीशी थेट संबंध आहे. डॉलर मजबूत होतो तेव्हा कमोडिटी नरम होतात हा बाजारातील सर्वसाधारण नियम आहे.

तर छोट्या कालावधीसाठी तरी सर्व काही आलबेल असल्याची बाजाराची धारणा झाल्यामुळे खनिजतेलाने उसळी मारली. मागील पाच-सहा दिवसांत कच्चे तेल १० टक्क्यांहून अधिक वाढले.

मागोमाग पाम तेलदेखील ७ टक्के वाढले आणि सोयातेल देखील त्याच प्रमाणात वाढले. या तीन गोष्टींचा अपेक्षित परिणाम होऊन सोयाबीनने देखील जोरदार उसळी मारली. शुक्रवार अखेर अमेरिकी बाजारात सोयाबीनने १५ डॉलर प्रतिबुशेलचा टप्पा पार केला.

कापूसदेखील वधारला आहे. जोडीने मकादेखील सुधारला. परंतु लक्षात राहिली साखर. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव २०१६ नंतरच्या सर्वांत जास्त पातळीवर गेले आहेत.

आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे त्या गडबडीमध्ये मागील आठवड्यात भारतातील व्यापारउदीम तसा कमीच राहिला. त्यामुळे जागतिक बाजारातील कल येथील बाजारांमध्ये विशेष दिसून आला नसला तरी या आठवड्यात तो दिसून येण्यास हरकत नाही.

सोयाबीनच्या दरवाढीला आधार

सोयाबीनच्या बाबतीत अमेरिकी निर्यातीचे आकडे अपेक्षेहून जास्त तर आठवड्याचे शिल्लक साठे अपेक्षेपेक्षा खूपच कमी दिसल्यामुळे सोयाबीन बाजारात चैतन्य आले. एक मार्च रोजी अमेरिकेतील सोयाबीन साठे मागील वर्षाच्या तुलनेत १३ टक्के कमी राहिले.

तर बाजाराच्या अपेक्षेपेक्षा ते ६.८ कोटी बुशेल कमी होते. याचा परिणाम म्हणून सोयाबीनने जोरदार उसळी घेतली. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अर्जेंटिनामधील दुष्काळाचे परिणाम अधिकाधिक जाणवू लागत असल्यामुळे तेथील सोयाबीन बाजारातील परिस्थिती बदलली. त्याचा आधार सोयाबीनच्या दरवाढीला मिळाला.

अर्जेंटिनामधील सोयाबीन उत्पादन लागवडीच्या वेळी अनुमानित केलेल्या ४५-४८ दशलक्ष टनापेक्षा जवळपास निम्मे होईल, असा सुधारित अंदाज आहे. तेथील उत्पादित सोयाबीनचे फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्याची गुणवत्ता ढासाळलेली दिसते.

त्यामुळे त्यातून तेल आणि पेंड याची उपलब्धता खूपच कमी राहील, असे दिसते. परिस्थिती एवढी बिकट आहे, की अर्जेंटिना ब्राझीलमधून ३०-५० लाख टन सोयाबीन आयात करण्याची शक्यता आहे.

जगातील तिसरा मोठा सोयाबीन उत्पादक देश आपले सौदे पुरे करण्यासाठी सोयाबीन मोठ्या प्रमाणावर आयात करणार, या सेंटिमेंटचा सोयाबीनच्या किमती सुधारण्यास हातभार लागत आहे. नवीन हंगामातील अमेरिकी सोयाबीन बाजारात येण्यास निदान पाच महिने आहेत. त्यामुळे सोयाबीनचा मध्यम कालावधीसाठी पुरवठा ‘टाइट’ राहील.

यूएसडीएचा अहवाल दिशादर्शक

मागील लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे अमेरिकेतील २०२३ च्या हंगामासाठी पेरणी अंदाज अहवाल तेथील कृषी खात्याने (यूएसडीए) प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल तयार करताना तेथील शेतकऱ्यांकडे प्रश्‍नावली पाठवून पेरणीबाबतचे अंदाज घेतले जातात.

त्यामुळे या अहवालाची अचूकता बऱ्यापैकी असते आणि बाजारावर काही दिवसांसाठी तरी त्याचा प्रभाव राहतो. त्यामुळे या अहवालातील महत्त्वाची आकडेवारी पाहूया.

सोयाबीन : अमेरिकेमध्ये सोयाबीनचे क्षेत्र अपेक्षेपेक्षा कमी राहील, असे दिसून येत आहे. अहवालात ८७.५ दशलक्ष एकर क्षेत्र अंदाजित करण्यात आले आहे. मागील वर्षाहून ते किंचितसेच जास्त आहे.

नेमक्या या गोष्टीचा बाजाराला नजीकच्या काळात फायदा होण्याचे दिसत आहे. अर्थात यावरून उत्पादनाचे अंदाज एवढ्यातच लावता येणार नसले तरी जर हवामान सुधारले आणि पर्जन्यमान अपेक्षेप्रमाणे राहिले तर उत्पादकता निदान पाच ते आठ टक्के तरी वाढेल, असे यापूर्वीच म्हटले गेले आहे.

त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात अमेरिकेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काळात याबाबतचे अंदाज येऊ लागतील तसतसे बाजारात चढ-उतार दिसून येतील.

गहू आणि मका : सोयाबीनचे भाव चढेच राहिले तरी अमेरिकी शेतकऱ्यांना तुलनेने कमी उत्पादन खर्च आणि अधिक जागतिक मागणी असलेल्या मका आणि गव्हाने आकर्षित केल्याचे दिसून येत आहे. कारण गव्हाच्या क्षेत्रात ९ टक्के एवढी दणदणीत वाढ अपेक्षित आहे;

तर मक्याचे क्षेत्रदेखील ४ टक्के वाढेल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मागील १५ दिवसांत अमेरिकेतील वायदे बाजारात गव्हामध्ये आलेली मोठी मंदी आणि त्याबरोबर मक्यातील विक्रीचा मारा याचा संबंध वरील आकडेवारीशी नक्कीच मिळता-जुळता आहे.

कापूस : यूएसडीएचा अहवाल भारतीय कापूस उत्पादकांना अधिक आश्‍वासक वाटेल. कारण अमेरिकेतील कापूस क्षेत्रात तब्बल १८ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज या अहवालात वर्तवलेला आहे.

आपल्याकडे पाच महिन्यांहून अधिक काळासाठी शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक केली असली तरी अलीकडील मंदीमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यांच्यासाठी अमेरिकेतील आकडेवारी निश्‍चितच उत्साहवर्धक आहे. कारण कापूस निर्यातीत अमेरिकेचा सिंहाचा वाटा आहे.

अर्थात, ही आकडेवारी पुढील वर्षीच्या पुरवठ्याच्या संदर्भात उपयोगी असली आणि दीर्घ काळासाठी आश्‍वासक वाटत आहे.

परंतु एल निनो हवामान आणि त्याचे पीकपाण्यावरील परिणाम, जगातील मंदीसदृश वातावरण यामुळे मागणीत होणारी घट, शिल्लक साठे आणि ब्राझील, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका या देशांमधील उत्पादन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तरीही जून-ऑगस्ट या तिमाहीमध्ये कापूस मोठी झेप घेण्यासाठी तयार होत आहे, असे टेक्निकल चार्ट दर्शवत आहेत.

वरील अहवाल आणि जागतिक बाजारात दरात झालेली सुधारणा यामुळे छोट्या अवधीसाठी देशांतर्गत बाजारातही सुधारणा दिसेल, अशी आशा आहे. कडधान्यांच्या बाबतीतही एक निश्‍चित सुधारणा दिसून येत आहे.

परंतु कडधान्यांच्या वाढत्या किमती पाहता सरकारी हस्तक्षेप कधीही होऊ शकतो. सरकारकडून तसे संकेत दिले जात आहेत. लवकरच मोसमी पावसाचे अधिकृत अनुमान प्रसिद्ध होईल. तोपर्यंत आणि त्यानंतर काही काळ बाजार चढेच राहतात असे ऐतिहासिक डेटा दर्शवतो.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT