Crop Loan Agrowon
ॲग्रोमनी

Crop Loan : कर्जावरील व्याज आकारणी योग्य झाली आहे का?

Loan Interest : आपण शेती करत असताना भांडवलाच्या उभारणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्जे घेत असतो. पीककर्ज (अल्प मुदत कर्ज), मध्यम मुदतीचे कर्ज अशा दोन्ही कर्जांसाठी व्याजदराची आकारणी नेमकी कशी होते समजून घेतले पाहिजे.

Team Agrowon

Loan Interest Rate : आपण शेती करत असताना भांडवलाच्या उभारणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्जे घेत असतो. पीककर्ज (अल्प मुदत कर्ज), मध्यम मुदतीचे कर्ज अशा दोन्ही कर्जांसाठी व्याजदराची आकारणी नेमकी कशी होते समजून घेतले पाहिजे. त्याच प्रमाणे आपण घेतलेल्या कृषी अथवा कोणत्याही अन्य कर्जावर योग्य तितकेच व्याज घेतले जात असल्याची खातरजमा वेळोवेळी करून घेतली पाहिजे. तरच होणारी फसगत टाळता येईल.

अ ल्प मुदतीच्या असो की मध्यम मुदतीच्या, कोणत्याही कृषी कर्जामध्ये सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारले जाते. मात्र कर्जाची परतफेड न झाल्यास किंवा कर्जाचा हप्ता थकित झाल्यास व्याजावर व्याज लावले जाते, म्हणजेच चक्रवाढ व्याज आकारले जाते. याबाबत पीककर्जाचे उदाहरण पाहू. समजा आडसाली ऊस लागवडीसाठी पीककर्ज घेतले असल्यास त्याची मुदत असते १८ महिने. म्हणजेच हे पीककर्ज मुदत संपल्यावर व्याजासह परत करावयाचे असते. या कर्जास या मुदतीपर्यंत (१८ महिने) सरळव्याज पद्धतीने व्याज आकारले जाते. रु. ३ लाखांपर्यंतच्या पीककर्जासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून व्याज सवलत मिळते. पीककर्जाची रक्कम घेतानाच ही व्याज सवलत नेमकी किती आहे हे कर्जदाराने जाणून घेतले पाहिजे. त्याच प्रमाणे पीककर्जाची परतफेड करतेवेळी व्याजाची आकारणी ही सरळ व्याजाने झाली आहे का आणि योग्य व्याज सवलत मिळाली आहे का, याचीही खात्री करून घेतली पाहिजे.

मध्यम मुदत कर्जामध्ये परतफेडीचे हप्ते हे प्रकल्पानुसार आणि प्रकल्पाच्या उत्पन्नानुसार ठरविले जातात. हे हप्ते मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक असे असू शकतात. त्या सोबतच एखाद्या प्रकल्पाची उभारणी आणि त्यानंतर उत्पन्न सुरू होण्याचा प्रकल्पनिहाय भिन्नभिन्न असा एक ‘ना हप्ता’ (Moratorium Period) कालावधी असतो. या कालावधीमध्ये उत्पन्न सुरू झालेले नसल्यामुळे कर्जाचे हप्तेही नसतात. या काळात कर्जास सरळ व्याज आकारले जाते. हे व्याज मुदलामध्ये जमा केले जाते. त्यावर पुढील परतफेडीचे हप्ते ठरविले जातात. मात्र एकूणच मध्यम मुदत कर्जासाठी सरळ व्याज पद्धतीने व्याजाची आकारणी होते. कर्जदाराने आपल्या मध्यम मुदत कर्जास योग्य व्याज आकारणी होत असल्याची खात्री करून घ्यावी.
वेगवेगळ्या सरकारी योजनांप्रमाणे काही कृषी मुदतकर्जास अनुदान मिळू शकते. हे अनुदान वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते.  सर्वसाधारणपणे ठरावीक कालावधीनंतर (सामान्यतः शेवटी - Backend Subsidy) ते कर्जात जमा केले जाते. मंजूर होऊन आलेले अनुदान बँकेकडे जमा असते. ते बॅंक एका वेगळ्या खात्यात जमा करून ठेवते. अनुदान जमा झालेल्या तारखेपासून मिळालेल्या अनुदानाच्या रकमेइतक्या कर्जावर व्याज लागत नाही आणि अनुदानावरही व्याज मिळत नाही. याबाबतची सर्व माहिती कर्जदाराने बॅंकेतील अधिकाऱ्यांकडून व्यवस्थितपणे जाणून घ्यावी.   माहिती असणे आवश्यक आहे. कर्जदाराची जबाबदारी आहे की, त्याने  खालील बाबींची माहिती बँके कडून जाणून घेणे आवश्यक आहे.
आपले प्रश्न सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे असले पाहिजेत.
  मंजूर झालेले अनुदान बँकेकडे किती तारखेला जमा झाले आहे?
  अनुदान हे कर्ज खात्यात जमा केव्हा होणार ?
  बँकेकडे अनुदान जमा झालेल्या तारखेपासून, अनुदान रकमे इतक्या कर्जावर व्याज लावले जात आहे की नाही?  


महत्त्वाचे....
सरळ व्याज :

  कर्जाची  रकमेच्या म्हणजेच मुद्दल आणि व्याज किंवा कर्ज हप्ता आणि व्याज यातील फक्त मुदलावर परतफेड सुरू होण्याच्या व असल्याच्या कालावधीपर्यंत व्याज आकारले जाते. त्यास ‘सरळ व्याज आकारणी’ म्हणतात.
चक्रवाढ व्याज :
  कर्जाची किंवा कर्ज हप्त्याची परतफेड वेळेवर न झाल्यास मुद्दल आणि मुदतीपर्यंत लावलेले व्याज या एकत्रित रकमेवर व्याज आकारले जाते. म्हणजेच मुदतीनंतर व्याजावरही व्याज लागते, त्याला ‘चक्रवाढ व्याज’ म्हणतात.
अल्प व मध्यम मुदत कर्ज व त्यावरील व्याज आकारणी :
अ) अल्प मुदत कर्ज किंवा पीककर्ज आणि त्यावरील व्याज आकारणी
  पीककर्जाचा जो परतफेडीसाठीचा कालावधी असतो, तोपर्यंत या कर्जास सरळ व्याज दराने व्याज आकारले जाते.
  दिलेल्या मुदतीत पीककर्जाची परतफेड झाली नाही, तर मुद्दल आणि मुदतीपर्यंत लावलेले व्याज यावरही व्याज आकारले जाते. म्हणजे मुदतीनंतर ‘व्याजावर व्याज’ (चक्रवाढ व्याज) लागते.
ब) मध्यम मुदतीचे कर्ज आणि त्यावरील व्याज आकारणी ः
  मध्यम मुदतीच्या कर्जास ही सरळ व्याजाने व्याज आकारले जाते.
  कर्जाचा हप्ता व व्याज एकत्र भरायचे असते.
  कर्जाच्या मुद्दलाचे समान भाग केलेले असतात. जसजसे कर्जाचे हफ्ते आपण भरत जाऊ, तसतशी व्याज आकारणी कमी होत जाते.
  कर्जाचा हप्ता व व्याज वेळेत भरले नाही, तर व्याजावर व्याज आकारले जाते. त्यास ‘चक्रवाढ व्याज’ म्हणतात.

जागरूकता महत्त्वाची...
वसंतराव तशी गावातील तालेवार व्यक्ती. त्यांच्या शेतीबरोबरच त्याचा व्यापही मोठा. उसाखालील क्षेत्रही मोठे. त्यांनी ऊस पिकासाठी पीककर्ज घेतले होते. तसेच बँकेकडून कृषी व्यवसायासाठी विविध कर्जे घेतली होती. मध्यम मुदत कर्ज घेऊन द्राक्ष आणि डाळिंब बागांची लागवड केली होती. या फळपिकासाठी घेतलेल्या मध्यम मुदत कर्जासाठी ‘ना हप्ता’ कालावधी होता. त्यानुसार कर्जाचे हप्ते हे उत्पादन ज्या वर्षी येणार, त्या वर्षापासून हप्ते ठरविले होते. कर्ज घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी वसंतरावांनी बॅंकेचे स्टेटमेंट मागवून त्याची तपासणी केली. त्यांच्या चाणाक्ष नजरेतून मध्यम मुदत कर्जास व्याज योग्य लागत नसल्याचे सुटले नाही. विशेषतः ‘ना हप्ता’ कालावधीत कर्जावर सरळ व्याजाने व्याज आकारणी होणे आवश्यक होते. मात्र बॅंकेतील काही चूक किंवा त्रुटीमुळे ती सरळ व्याज पद्धतीने होत नसल्याची बाब त्यांनी त्वरित बँकेच्या नजरेस आणली. त्यामुळे बँकेला व्याजामध्ये योग्य ती दुरुस्ती करावी लागली. वसंतरावांच्या सतर्कतेमुळे त्यांचे होऊ घातलेले मोठे नुकसान टळले.
         

गावात कर्णोपकर्णी झालेली गोष्ट ऐकून वसंतरावांच्या बंधू श्यामरावही जागे झाले. त्यांचेही बॅंकेकडून कर्ज घेऊन उभारलेले पॉलिहाउस होते. तेही तातडीने बॅंकेत जाऊन स्टेटमेंट घेऊन आले. येताना कर्जाचे अनुदानही बँकेकडे जमा झाल्याचे समजले. ते तातडीने वसंतरावांकडे आले. त्यांच्याकडून स्टेटमेंटची तपासणी करून घेतली. खात्यामध्ये अनुदान जमा झालेले असूनही, त्या रकमेइतक्या कर्जरकमेवरही व्याज आकारणी झालेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती बाब श्यामरावांनी तातडीने बँकेच्या निदर्शनास आणून दिली. बँकेने त्वरित दुरुस्ती केली आणि योग्य व्याज आकारणी केली. बँकेकडे अनुदान ज्या तारखेला जमा झाले, त्या दिवसापासून व्याज हे अनुदान वजा जाता शिल्लक कर्ज रकमेवर लावणे गरजेचे होते. ही माहिती वसंतरावांनी सांगितल्यामुळे श्यामरावांची त्यांच्या कर्जखात्यावरील पुढील व्याज आकारणी योग्य प्रकारे सुरू झाली. 

अनिल महादार,  ८८०६०२२०२२
(लेखक बँक ऑफ इंडिया येथून सहाय्यक महाप्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT