Maize
Maize Agrowon
ॲग्रोमनी

Maize : मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा विळखा

मुकूंद पिंगळे

नाशिक : जिल्ह्यात सर्वाधिक लागवडी मका पिकाच्या (Maize Crop) आहे. सटाणा, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा व सिन्नर तालुक्यांत आहेत. तर सटाणा, कळवण व सिन्नर तालुक्यांत लागवडी (Maize Cultivation) यंदा वाढल्याची स्थिती आहे. मात्र, यंदा आगाप लागवडीवर अमेरिकन लष्करी अळीचा (Army Worm Outbreak On Maize) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सटाणा, येवला, देवळा व मालेगावात या समस्येने डोके वर काढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कमी भांडवल, काढणीपश्चात रब्बीत पुन्हा पिके घेता येणे शक्य व दराचा फायदा यामुळे जिरायती शेतकऱ्यांचे हे प्रमुख नगदी पीक झाले आहे. पोल्ट्री उद्योगात कुक्कुट खाद्यासाठी मागणी वाढती असल्याने दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत लागवड वाढती आहे. मात्र, लष्करी अळीमुळे हे पीक अडचणीत आले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात चालू वर्षी २ लाख १५ हजार ५०६.८४ हेक्टरवर लागवड झाली असून ही टक्केवारी ९९.८२ इतकी आहे. मात्र खते, बियाणे व मजुरी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना अधिकचा हंगामी खर्च वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून हंगाम उभा केला; मात्र सुरुवातीच्या टप्प्यातच अमेरिकन लष्करी अळीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे पीक संरक्षण खर्च वाढला आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात या लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळे मोठा फटका बसला होता. चालू खरीप हंगामात सध्याच्या वातावरणात सर्वत्र पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे मक्याची उत्पादकता घटण्याची भीती शेतकऱ्यांसमोर आहे, असे सातमाने येथील शेतकरी गोरख जाधव यांनी सांगितले.

निफाड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. लागवडीला २० ते २५ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र प्रादुर्भाव रोखण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे सततच्या पाऊस व सूर्यप्रकाश नसल्याने मका पिवळा पडला आहे. अनेक ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. मात्र पाऊस उघडित देत नसल्याने शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे दुहेरी अडचण झाली आहे.

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तो नियंत्रित करण्यासाठी फवारणी सुरू केल्या आहेत. रासायनिक कीटकनाशकांचे दर वाढल्याने पीक संरक्षण खर्चात मोठी वाढ होत आहे. - -
जनार्दन कमोदकर, शेतकरी, कोळगाव, ता. येवला
पाऊस उघडल्यानंतर मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकीकडे पावसामुळे तण वाढल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ती पिवळी पडली आहेत. त्यातच हे लष्करी अळीचे संकट उभे राहिले आहे.
मधुकर मोरे, शेतकरी-ठेंगोडा, ता. सटाणा

ही आहेत नुकसानीची स्थिती

- लष्करी अळी पिकाचा कोंब खात असल्याने पिकांची वाढ खुंटली

- कोंबाचा गाभा खाऊन आत अंडी घालत असल्याचे पाऊस उघडल्यानंतर दिसून येत आहे.

- अनेक ठिकाणी लागवड क्षेत्रात पान कुरतडण्याची समस्या

शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांचा वापर करावा

कृषी विभागाकडून लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम, शेतीशाळा या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली आहे. इमामेक्टीन बेंझाईट हे कीटकनाशक सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

जिल्ह्यातील मका लागवड स्थिती:

तालुका...सर्वसाधारण क्षेत्र...झालेली लागवड...टक्केवारी

मालेगाव...३६, ८१५...३६, १५२...९८.२

सटाणा...३४, ७३३...४२, २४२...१२१.६२

कळवण...१७, ४०४...१७, ४६०...१०१.३६

देवळा...१५, ९४३...१४, ९४०...९३.७१

नांदगांव...२५, ५८९...२६, ८९०...९०.८८

नाशिक...१, ३७०.५४...१८९...१३.७९

दिंडोरी...१, ३१९.८८....१८४...१३.९४

इगतपुरी...२२८.२...९.७...४.२५

निफाड...१२, ५८२.५६...८, ५८३.६४...६८.२२

सिन्नर...११, २६६.९६...१३, १३३.५...११६.५७

येवला...३५, ११९...३७, ९४५...१०८.०५

चांदवड...१९, ७२५.७५...१७, ५९८...८९.२१

एकूण...२, १६, ११३...२, १५, ५०६.८...९९.७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT