
जागतिक मका उत्पादनात (Maize Production) २०२२-२३ मध्ये घट होण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं (USDA) व्यक्त केली. मका उत्पादन ११८५ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर मागीलवर्षी १२१७ दशलक्ष टन मका उत्पादन झालं होतं. चालू हंगामात युरोपियन युनियन आणि रशियात उत्पादन घटीचा अंदाजये. तर पेरुग्वे देशात उत्पादन वाढेल. पशुखाद्यात मक्याचा वापर वाढण्याचाही अंदाज युएसडीएनं (USDA) वर्तविला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याचे दर वाढलेले आहेत. परंतु देशातील दर अधिक आहेत. त्यामुळे देशातून मका निर्यात कमी झाल्याचं जाणकारांनी सांगितलं.
बाजारात तुरीची आवक चार महिन्यांत वाढली
२०२१ मध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल एकाचवेळी न विकता टप्प्याटप्याने विकला. त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांच्या दरात सुधारणा झाली होती. हाच कित्ता कडधान्याच्या बाबतीत गिरवला तर दर वाढतील, असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र सरकारच्या विक्रमी आयातीमुळं ते झालं नाही. त्यामुळं मार्च २०२२ पासून शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणायला सुरुवात केली. परिणामी मार्च ते जून या चार महिन्यांत बाजारातील तूर आवक ३५ टक्क्यांनी वाढली. मागीलवर्षी याच काळात जवळपास साडेतीन लाख टन तुरीची बाजारात आवक झाली होती. तर यंदा आवक सव्वापाच लाख टनांपर्यंत वाढली. पण आवक दर महिन्याला कमी होत असल्यानं दरातही सुधारणा होतेय.
युक्रेनमधील गहू उत्पादन ४१ टक्क्यांनी घटणार
रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेनमधील वसंत ऋतुतील गहू लागवड (Wheat Cultivation) घटली. जागतिक गहू निर्यातीत युक्रेनचा वाटा १० टक्के आहे. युक्रेनने २०२१ मध्ये २० लाख टन गहू निर्यात केला होता. परंतु २०२२-२३ मध्ये येथील गहू उत्पादन (Wheat Production) ४१ टक्क्यांनी घटणार असल्याचं युएसडीएनं म्हटलंय. युएसडीएने जुलै महिन्याच्या अंदाजात युक्रेनमधील गहू उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा १३५ लाख टनांनी घटेल, असा अंदाज वर्तविला. गेल्यावर्षी येथे ३३० लाख टन गहू उत्पादन झालं होतं. परंतु यंदा ते १९५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली. येथील उत्पादन घटल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीये.
रशिया वाटाणा निर्यात २५ टक्क्यांनी वाढविणार
जगात वाटाणा उत्पादनात कॅनडा प्रथम तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशियात दरवर्षी २७ ते २९ लाख टन वाटाणा उत्पादन होतं. मागील हंगामात येथील उत्पादन २७.९ लाख टनांवर स्थिरावलं. २०२१ मध्ये येथून १२ लाख टन वाटाण्याची निर्यात झाली. मात्र रशियानं आता वाटाणा निर्यात २५ टक्क्यांनी वाढविण्याचं उद्दिष्ट ठवलंय. रशिया पुढील काही वर्षांत निर्यात १५ लाख टनांपर्यंत वाढवणार आहे. त्यासाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेतला जातोय. तर भारतात वाटाण्याचा वापर वाढलाय. मात्र उत्पादन त्यातुलनेत कमीये. त्यामुळं रशियातून वाटाणा आयात वाढू शकते, असं जाणकारांनी सांगितलं. असं झाल्यास देशांतर्गत मालाच्या दरावर परिणाम होऊ शकतो.
पामतेल दराचा सोयाबीनशी संबंध काय?
जगात खाद्यतेल वापरात भारत प्रथम क्रमांकावर आहे. मात्र भारताला ६५ टक्के गरज ही आयातीतून भागवावी लागते. भारताच्या आयातीत पामतेलाचा वाटा अधिक असतो. मात्र चालू हंगामात पामतेल आयात घटली, तर सोयातेल आणि सूर्यफुलतेल आयात वाढली. तेल विपणन वर्ष ऑक्टोबरपासून सुरु होते. चालू विपणन वर्षात जुलैपर्यंत पामतेल आयात जवळपास १६ टक्क्यांनी घटली. आयात ४३.३० लाख टनांपर्यंत झाली. तर मागीलवर्षी याच काळातील आयात ५१.४९ लाख टन होती. त्याऊलट सोयातेल आयात जवळपास ३५ टक्क्यांनी वाढली.
यंदा २८.१० लाख टन सोयातेल भारतानं आयात केलं. तर मागीलवर्षीतील आयात १८.५० लाख टनांवर होती. तसचं सूर्यफूल तेल आयातही ८ टक्क्यांनी अधिक राहीली. यंदा जुलैपर्यंत १४.५२ लाख टन सूर्यफुल तेल देशात आलं. तर मागील वर्षीची आयात १३.४८ लाख टन होती. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दराने विक्रमी टप्पा गाठला होता. त्यामुळं सोयातेल आणि सूर्यफुलाचे दर जवळपास समान झाले. दरातील तफावत नगण्य राहीली.
त्यामुळं आयातदारांनी सोयातेल आणि सूर्यफुलतेल आयातीला पसंती दिली.परिणामी देशात सोयाबीन दरातील तेजी टिकून होती. परंतु आता पामतेल स्वस्त झालं. त्यामुळं आयातदार पुन्हा सोयातेलाकडून पामतेलाकडे वळाले. परिणामी सोयाबीन दरातील तेजी कमी झाली. सध्या देशातील बाजारात सोयाबीनला ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.