
Mumbai News: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मुंबईतील शासकीय बंगला सोडलेला नाही. यामुळे त्यांच्यावर बंगला न सोडल्यामुळे तब्बल ४६ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल . सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा दंड माफ न करण्याची आणि बंगला तात्काळ खाली करण्याची विनंती केली आहे. मुंडे यांनी मुलीच्या शिक्षणाचं कारण देत बंगला खाली न केल्याने नवे मंत्री छगन भुजबळ यांना गृहप्रवेशात अडचणी येत आहेत. नियमांनुसार, मंत्रिपद सोडल्यानंतर १५ दिवसांत बंगला खाली करणं बंधनकारक आहे.
काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे यांनी ४ मार्च २०२५ रोजी बीड येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपद सोडल्यानंतर नियमानुसार १५ दिवसांच्या आत शासकीय बंगला खाली करणे बंधनकारक आहे.
मात्र, पाच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी मुंडे यांनी मलबार हिल येथील सातपुडा या शासकीय बंगल्यातून आपलं सामान हलवलं नाही. या बंगल्याचं क्षेत्रफळ ४,६६७ चौरस फूट आहे, आणि नियमांनुसार, बंगला खाली न केल्यास प्रतिचौरस फूट २०० रुपये दंड आकारला जातो. यानुसार, मुंडे यांच्यावर दरमहा ९.३३ लाख रुपये दंड आकारला जात आहे. आतापर्यंत हा दंड ४६ लाखांवर पोहोचला आहे.
अंजली दमानियांचं आवाहन
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका व्हिडिओद्वारे याबाबत आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "धनंजय मुंडे यांनी पाच महिन्यांहून अधिक काळ शासकीय बंगला ताब्यात ठेवला आहे. त्यांनी आजारपण आणि मुलीच्या शिक्षणाचं कारण देत बंगला खाली न करण्याचा निर्णय घेतला. पण असा निर्णय घेणं अत्यंत चुकीचं आहे. स्वाभिमानी व्यक्तीने स्वतःचं घर खरेदी केलं असतं किंवा भाड्याने राहण्याचा पर्याय निवडला असता. मुंडे यांच्यावर ४६ लाखांचा दंड आहे, आणि हा दंड माफ करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. पण मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, त्यांनी एक रुपयाचाही दंड माफ करू नये.
भुजबळांनाही अडचण
धनंजय मुंडे यांनी बंगला खाली न केल्याने नवे मंत्री छगन भुजबळ यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मे २०२५ मध्ये भुजबळ यांना अन्न व औषध प्रशासन विभागाचं मंत्रिपद मिळालं, आणि त्यांना सातपुडा बंगला देण्यात येणार होता. मात्र, मुंडे यांनी बंगला खाली न केल्याने भुजबळ अजूनही या बंगल्यात गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, मुंडे यांना बंगला खाली करण्यासाठी अद्याप कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही, असं समजतं.
मुंडे यांनी बंगला खाली न करण्यामागे मुलीच्या शिक्षणाचं कारण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीचं शिक्षण सुरू असल्याने त्यांना तात्काळ बंगला खाली करणं शक्य नाही. यासाठी त्यांनी बंगला खाली करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीही अनेक माजी मंत्र्यांना अशी मुदतवाढ मिळालेली आहे, त्यामुळे मुंडे यांनाही तशी शक्यता आहे. मात्र, दमानिया यांनी यावर आक्षेप घेतला असून, नियमांचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.