औरंगाबाद : जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे आगार (Green Chili Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील बहुतांश गावांमधील हिरव्या मिरचीचा हंगाम (Green Chili Season) गुंडाळल्यात जमा आहे.
सातत्याने वाढलेले विविध रोगांचे आक्रमण व त्यावर उपाय करताना होणारी दमछाक, सोबतच उत्पादनात निरंतर होत चाललेली घट मिरची उत्पादकांसमोर आव्हान बनून उभे आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील खासकरून उत्तर व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. हिरव्या मिरचीच्या उत्पादनात उच्चांक प्रस्थापित करण्याचे काम सिल्लोड तालुक्यातील, तसेच लगतच्या जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.
साधारणत: एप्रिलपासून लागवड सुरू होते. जून शेवट किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिरचीचे सुरू होणारे उत्पादन फेब्रुवारी, मार्चपर्यंत चालते. एकरी ३०० ते ३५० क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीचे उत्पादन घेणारे शेतकरी सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते.
परंतु अलीकडच्या दोन, तीन वर्षांत सातत्याने हिरव्या मिरचीच्या उत्पादनात मोठी घट येते आहे. सोबतच हंगामही डिसेंबर जानेवारीमध्येच गुंडाळल्या जात असल्याची स्थिती आहे.
यंदा तर अपवाद वगळता जवळपास ४० ते ५० टक्के उत्पादनात घट आल्याची माहिती मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. यंदा बहुतांश शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन आता १५० ते १७५ क्विंटल प्रति एकरपर्यंत खाली आल्याचे शेतकरी सांगतात.
यंदा नव्याने आलेल्या ‘ब्लॅक थ्रीप्स’चा प्रादुर्भाव यंदाच्या मिरची हंगामावर चांगलाच आघात करून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हंगाम लवकर आटोपल्याचे दिसत असल्याने मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणावरून आलेले व्यापाऱ्यांनीही परतीचा मार्ग स्वीकारला आहे. शिवाय रोगांचा हल्ला मिरची आगारातील लाल मिरचीच्या अपेक्षित उत्पादनावरही आघात करून गेला आहे.
यंदा ऑगस्टमध्येच ‘ब्लॅक थ्रीप्स’ आला. नियंत्रण मिळविताना चांगलीच दमछाक झाली. दरवर्षी उत्पादन घटत चालले आहे. यंदा तर अनेक शेतकऱ्यांना उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट सहन करावी लागली. दर २० ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिले.
- जावेद देशमुख, मिरची उत्पादक, गोळेगाव, ता. सिल्लोड
दरवर्षी साधारणत: मार्चपर्यंत हिरव्या मिरचीचा हंगाम चालतो. यंदा तो डिसेंबर जानेवारीतच गुंडाळल्यात जमा आहे. लाल मिरचीचेही अपेक्षित उत्पादन नाही. दरवर्षी संकट कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे.
- अमोल बावस्कर, मिरची उत्पादक, लिहाखेडी, ता. सिल्लोड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.