Beed News : जिल्ह्यातील विविध केंद्रांवरून रखडत सुरू झालेली आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी आता थोडी गती घेताना दिसत आहे. मात्र बारदान्याची समस्या अजूनही कायम आहे. आठवड्यात दोनदा बारदाना पुरवला जाण्याचे नियोजन असले तरी त्यात अडथळा आल्यास पुन्हा एकदा बारदाना सोयाबीन खरेदीत खोडा घालू शकतो.
आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी बीड जिल्ह्यात ३० केंद्र सुरू करण्यात आले. त्यामध्ये बीड, चौसाळा, पिंपळनेर, नेकनूर, मांजरसुंबा, गेवराई, माजलगाव, वडवणी, परळी, तेलगाव, टोकवाडी, आनंदवाडी, अंबाजोगाई, जोगाईवाडी, बर्दापूर, घाटनांदुर, सेलुंबा, उजनी पाटी, केज, चिंचोली माळी, होळ, बनसारोळा, आडस, नांदुरघाट, धारूर, शिरूर, पाटोदा, पारनेर, कडा व शिराळ या केंद्रांचा समावेश आहे.
सुरुवातीला नोंदणी करण्यात पोर्टलने अनेकदा नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करण्यात अडचणी आल्या. अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील ४४,६०७ शेतकऱ्यांनाच आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करता आली. आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ १६५३५ शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष खरेदीसाठी येण्याचा एसएमएस पाठविण्यात आला.
१६ जानेवारीपर्यंत एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांपैकीही केवळ ६,९७४ शेतकऱ्यांकडूनच १ लाख ६० हजार ७३ क्विंटल ९७ किलो सोयाबीनची खरेदी करणे शक्य झाले होते. खरेदी केलेल्या सोयाबीन पैकी १ लाख २७ हजार ५२७ क्विंटल सोयाबीन वेअर हाऊसला पाठविण्यात आले.
तर ३२,५४६ क्विंटल सोयाबीन वेअर हाऊसला पाठविणे बाकी होते. गुरुवारपर्यंत (ता. १६) ८ हजार १२ शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या १ लाख ११ हजार ३४५ क्विंटलचे पैसे वितरित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.
आता बारदान्यामुळे अडू नये
सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. त्या मुदतीपर्यंत निदान ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन आधारभूत किमतीने खरेदी केले जावे. त्यात आता बारदान्याची अडचण येऊ नये असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आताच्या घडीला पुरविलेल्या बारदान्यामुळे खरेदी सगळीकडे सुरू असल्याचे दिसत असले तरी कोलकात्यावरून येणाऱ्या बारदानावरच खरेदीत अडथळा न येण्याचे गणित अवलंबून असणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.