प्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची तीव्रता
प्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची तीव्रता 
महिला

प्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची तीव्रता

डॉ. क्षितिजा कुलकर्णी

निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक असलेले साप, विंचू यांच्याशी संपर्क नक्कीच येतो. यातूनच सर्पदंशासारख्या घटना घडतात. अशावेळी घाबरून न जाता प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करावेत. शेतकरी, शेतमजूर व लहान मुले यांच्या बाबतीत साप, विंचू चावणे अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. भारतात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्व जगात जास्त आहे, असे मानले जाते. परंतु वास्तविक पाहता हे मृत्यू आपण टाळू शकतो. त्याकरिता रुग्णास आवश्यक ते प्रथमोपचार व ताबडतोब रुग्णालयात हलवणे आवश्यक असते. आपण याची माहिती घेऊच, पण त्याआधी विषारी सापांची माहितीसुद्धा घेऊ. भारतामध्ये २३६ प्रकारचे साप आहेत. त्यातल्या १३ जाती विषारी आहेत. आपल्याकडे साधारणपणे चार प्रकारचे विषारी साप आढळतात. बहुतांश साप बिनविषारी असतात.

१. नाग : (cobra) काळ्या रंगाचा मोठा, प्रसंगी ६-८ फूट लांबी व फणा असलेला साप. किंग कोब्रा हा एक याचा भाऊबंद. अत्यंत विषारी. काही मिनिटांतच यामुळे शरीराचे व श्वासाचे स्नायू कमजोर होऊन मृत्यू होतो.

२ मण्यार : (common krait) काळ्या रंगाचा व अंगावर आडवे काळे पट्टे असलेला आकाराने लहान साप. २ फुटाच्या आसपास. बऱ्याचदा रात्री झोपेमध्ये असताना याचा दंश होतो व दंशाच्या खुणासुद्धा लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे निदान होण्यास अवघड. यामुळे साधारण ८ ते १२ तासांनी शरीराचे व श्वासाचे स्नायू कमजोर होऊन मृत्यू होतो.

३. घोणस : (Russels viper) पिवळसर करड्या रंगाचा व अंगावर स्पष्ट, उठावदार, गोलाकार नक्षी. २ फुटाच्या आसपास. यामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊन शरीरात रक्ताच्या गुठळ्या व काहीवेळा रक्तस्राव होतो. यामुळे मूत्रपिंड निकामी होते व मृत्यू होतो.

४ फुरसे : (saw scaled viper) पिवळसर करड्या रंगाचा व अंगावर अस्पष्ट, फिकट ,गोलाकार नक्षी व डोक्यापासून शेपटीकडे जाणाऱ्या दोन लाटेसारख्या रेषा. मातीसारखा रंग असतो व मातीमध्ये लवकर दिसून येत नाही. विषाचे परिणाम घोणसे सारखेच साधारण.

प्रथमोपचार

  • रुग्णाला कल्पना द्यावी की, सर्पदंशावर उपचार आहेत, घाबरून जाऊ नये. कारण घाबरल्याने हृद्याचे ठोके वाढतात आणि विष लवकर पसरते.
  • रुग्णास खाली झोपवावे आणि दंश झालेली जागा हृदयाच्या खाली असावी. रुग्णाचे बूट, घड्याळ, अंगठी, ज्वेलरी आणि घट्ट कपडे काढून घ्यावे. दंश झालेली जागा स्थिर करावी. गरज पडल्यास मोडलेले हाड जागी नीट स्थिर बसावे यासाठी त्याभोवती बांधण्यासाठी वापरतात ती लाकडी फळी वापरून त्या भागाला हालचाल होणार नाही असे बांधावे. हा सर्वात महत्त्वाचा प्रथमोपचार आहे.
  • हृदयाला बाहेरून दाब देऊन ठोके चालू ठेवणे, तोंडाने कृत्रिम श्वास देणे याची गरज पडू शकते.
  • रुग्णास जवळच्या अद्ययावत रुग्णालयात न्यावे, जिथे सापाचे विष उतरवणारे औषध उपलब्ध असेल.
  • दंश झालेल्या जागेच्या वरती पूर्वी घट्ट दोरी किंवा कापड बांधावे. आता नवीन संशोधनानुसार असे करण्याची गरज नाही. दंशाच्या जागी ब्लेडने कापू नये, साबणाने धुवू नये, तिथे विजेचा झटका देऊ नये, बर्फ लावू नये, कुठलाही लेप लावू नये.
  • रुग्णाला पाणी, दारू आणि कुठलीही औषधे देऊ नयेत. सर्प पकडणे, मारणे असा आटापिटा करू नये. तसेच कुठल्याही भोंदू व्यक्तीकडे नेऊ नये.
  • दंश झालेल्या जागी घट्ट दाब देऊन पट्टी बांधणे फायदेशीर असते असे नवीन परदेशी संशोधनातून पुढे आले आहे.
  • प्रत्यक्षात बरेचसे सर्पदंश बिनविषारी सापांकडून होतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते. सर्पदंश झालेल्या प्रत्येक रुग्णास साधारणपणे २४ तास निरीक्षणाखाली रुग्णालयात ठेवणे आवश्यक आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT