मेथी पावडर पॅकिंग करताना गटातील सदस्या.
मेथी पावडर पॅकिंग करताना गटातील सदस्या. 
महिला

प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगती

Vinod Ingole

छोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते, याचे उदाहरण म्हणजे दाभा (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील मनीषा सचिन टवलारे. कृषी विज्ञान केंद्रातून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी विविध चवींच्या शेवया तसेच कढीपत्ता, मेथी आणि पुदिना पावडर निर्मितीला सुरवात केली. प्रक्रिया उद्योगातून त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांना रोजगारही दिला आहे.

अमरावती शहरापासून दाभा हे गाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. या गावामध्ये मनीषा सचिन टवलारे यांची शेती आहे. अमरावती बाजारपेठ उपलब्ध असल्याने घराजवळील वीस गुंठे शेतीमध्ये त्या पुदिना आणि भाजीपाला पिकांची लागवड करतात. उर्वरित दोन एकर कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीन लागवड असते. शेती आणि प्रक्रिया उद्योगामधील नवीन तंत्रज्ञान समजावून घेण्यासाठी टवलारे कुटुंबीय दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रात माहिती घेण्यासाठी गेले असताना गृह विज्ञान शाखेतील तज्ज्ञ डॉ. अर्चना काकडे यांनी शेवया तसेच पुदिना, भाजीपाला पावडर निर्मितीबाबत माहिती दिली. त्यानुसार प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मनीषा टवलारे यांनी २०१० मध्ये दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मनीषाताईंनी मेथी पावडर, कडीपत्ता पावडर, ग्रीन मसाला पावडर (विविध पालेभाज्यांची पावडर) तयार करण्यास सुरवात केली. प्रक्रिया व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनीषा टवलारे यांच्यासमोर यंत्रसामग्रीच्या खरेदीचा प्रश्न उभा होता. या दरम्यान खादी ग्रामोद्योग मार्फत गृहउद्योगासाठी वित्त पुरवठ्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी केव्हीकेशी संपर्क साधला. तांत्रिक पूर्तता केल्यानंतर खादी ग्रामोद्योगकडून दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. यातून मनीषाताईंनी यांनी दोन शेवया निर्मिती यंत्र, एक पल्व्हरायझर आणि एक पीठगिरणी खरेदी केली. पहिल्या टप्प्यात शेवया आणि पीठ निर्मितीला सुरवात केली. या व्यवसायातील मिळकतीतून कर्ज रकमेपैकी एक लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर ५० हजार रुपयांचे अनुदान खादी ग्रामोद्योगकडून मिळाले.  विविध चवींच्या शेवया आणि पावडर निर्मिती  दर्जेदार शेवया निर्मितीमुळे दाभा गावासह लगतच्या गावांमध्ये मनीषाताईंच्या प्रक्रिया उद्योगाची माहिती पोचली. पूर्वी मनीषाताई दहा रुपये प्रति किलो याप्रमाणे शेवया तयार करून देत होत्या. आता वाढत्या खर्चामुळे त्यांनी प्रति किलो बारा रुपये असा दर ठेवला आहे. मनीषाताई दररोज सरासरी ८० किलो शेवया तयार करतात. मनीषाताई पहिल्यांदा साध्या शेवया तयार करायच्या. परंतू हळूहळू ग्राहकांकडून आंबा, अननस आणि पालकाच्या चवीच्या शेवयांची मागणी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी विविध स्वादाच्या शेवयांच्या निर्मितीबाबत माहिती घेऊन उत्पादन सुरवात केले. या शेवयांना स्थानिक बाजारपेठ तसेच राज्यभरातील प्रदर्शनातून चांगली मागणी मिळू लागली. एक किलो शेवया तयार करण्यासाठी सरासरी ५५ रुपयांचा खर्च होतो. विविध स्वादानुसार प्रति किलो शेवयाची विक्री ७५ ते ८० रुपयांना होते. मुंबईमध्ये यापेक्षा अधिकचा दर मिळतो. शेवयांच्या बरोबरीने पुदिना पावडर (४० ग्रॅम) ३० रुपये, मेथी पावडर (४० ग्रॅम) ३० रुपये, चहा मसाला पावडर (३० ग्रॅम) ३० रुपये आणि ग्रीन मसाला(१०० ग्रॅम) ६० रुपये या दराने विक्री केला जातो. घरच्या शेतीमध्येच पुदिना लागवड केली जाते. पुदिना वाळवून पावडर तयार केली जाते. यापुढील काळात पावडर तयार करण्यासाठी मनीषाताई सोलर ड्रायर खरेदी करणार आहेत.

अशी आहेत उत्पादने   ग्रीन मसाला पावडर, चहा मसाला पावडर,कढीपत्ता पावडर, पुदिना पावडर,सोया आटा, पापड, शेवया 

बचत गटाची झाली मदत  

प्रक्रिया उद्योगाची वैयक्‍तिक स्तरावर उभारणी करणाऱ्या मनीषाताईंनी पुढाकार घेत गावामध्ये कुमकूम महिला गट तयार केला. गटातील दहा महिला सुरवातीला प्रति महिना ५० रुपयांची बचत करत होत्या. परंतू अंतर्गत कर्ज वितरण किरकोळ स्वरूपात होत होते. त्यामुळे महिन्याला होणाऱ्या बचत रकमेत वाढीचा निर्णय घेण्यात आला. आता महिन्याला १०० रुपये बचत केली जाते. माहूली चोर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत बचत गटाचे खाते आहे. मनीषा टवलारे या कुमकूम महिला बचत गटाच्या सचिव आहेत. मनीषाताईंनी प्रक्रिया उद्योगाची उभारणी स्वनिधीतून केली असल्याने उत्पन्नातील हिश्‍श्‍याचे विभाजन केले जात नाही. परंतू उत्पादन निर्मिती आणि विक्रीसाठी महिला गटाची मदत होते. उत्पादनाच्या पॅकिंगवर कुमकूम महिला बचत गटाचा उल्लेख मनीषाताईंनी केला आहे. 

व्यवसायातून प्रगती  मनीषाताईंचे पती सचिन हे गावालगतच्या एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. दरम्यान कंपनी बंद पडल्याने हा आर्थिक स्रोतही ठप्प झाला. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान उभे असताना प्रक्रिया उद्योगातून आर्थिक समस्येवर त्यांनी मात केली. प्रक्रिया उद्योगातून मिळालेल्या पैशातून त्यांनी घरही बांधले. ही भरभराट प्रक्रिया उद्योगामुळेच शक्‍य झाल्याचे मनीषाताई आत्मविश्‍वासाने सांगतात. आज त्यांचे पती सचिन हे सोयाबीन तेलाच्या विक्रीचा व्यवसाय करतात.

प्रदर्शनातून उत्पादनाची विक्री  कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनांमध्ये मनीषाताई शेवया तसेच विविध पावडरींची विक्री करतात. गुणवत्तेमुळे या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. याचबरोबरीने माहिती पत्रक छापून त्यांनी परिसरातील गावांमध्ये उत्पादनांची प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे विविध गावांतून त्यांच्या उत्पादनांना मागणी येत असते. त्यानुसार ही उत्पादने मनीषाताई घरपोच देतात. दरवर्षी मनीषाताई अकोला, अमरावती, यवतमाळ आणि मुंबई येथील प्रदर्शनात सहभागी होतात. त्यामुळे विविध शहरांतूनही त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. मुंबईतील प्रदर्शनात सरासरी दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाल होते. स्थानिक स्तरावरील प्रदर्शनाचा कालावधी एक ते तीन दिवसांचा असतो. या प्रदर्शनात ३० ते ४० हजार रुपयांची उलाढाल होत असल्याचे मनीषाताई सांगतात. 

- मनीषा टवलारे, ९६५७४७३५९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT