सरस्वती महिला समूहाचा केळी उपपदार्थ, फरसाण विक्रीचा फैजपूर (ता.यावल, जि.जळगाव) येथील स्टॉल. 
महिला

केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगती

शिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती बहुउद्देशीय महिला समूहा’ने केळी वेफर्स, लाडू, चिवडा आदी प्रक्रिया पदार्थ निर्मिती आणि विक्रीतून अर्थकारणाला बळकटी दिली. यासोबत गाव परिसरात स्वच्छता, आरोग्याबाबत जनजागृती उपक्रमामध्ये गटाचा चांगला सहभाग आहे.

Chandrakant Jadhav

शिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती बहुउद्देशीय महिला समूहा’ने केळी वेफर्स, लाडू, चिवडा आदी प्रक्रिया पदार्थ निर्मिती आणि विक्रीतून अर्थकारणाला बळकटी दिली. यासोबत गाव परिसरात स्वच्छता, आरोग्याबाबत जनजागृती उपक्रमामध्ये गटाचा चांगला सहभाग आहे. शिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) शिवारात केळी हे महत्त्वाचे पीक. गाव शिवारातील बहुतांश जमीन काळी कसदार आहे. शेती असली तरी महिलांसाठी वर्षभर रोजगाराचा अभाव हा मोठा अडथळा ठरत होता. हा अडथळा कसा दूर होईल यासाठी महिलांनी एकत्र येऊन चर्चा केली. प्रतिभा पाटील यांनी याबाबत पुढाकार घेऊन महिलांशी चर्चा केली. गावातील महिलांचा त्यास प्रतिसाद मिळत गेला. महिलांनी एकत्र येत २०१६ मध्ये गाव परिसरात दारूबंदीसाठी काम सुरू केले. या कामाला विविध गावांतील महिलांचा प्रतिसाद मिळू लागला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर भातखेडा, वाघोड, ऐनपुरातही दारूबंदीसाठी महिलांनी काम केले. ‘सरस्वती महिला समूहा’ची स्थापना  शिंदखेडा येथील महिलांनी एकत्र येऊन ३१ डिसेंबर २०१५ मध्ये ‘सरस्वती महिला समूहा’ची स्थापना केली. डिसेंबर महिन्याच्या म्हणजेच वर्षाच्या अखेरच्या दिवशी संस्थेची स्थापना करण्याचा उद्देशही आगळा वेगळा होता. वर्षअखेरचा दिवस म्हटले, की जुने विसरून नव्याने सुरवात करण्याचा संदेश. हा संदेश लक्षात घेऊन महिला गटाने सुरुवातीला व्यसनाधीनता दूर करण्यासाठी काम केले. यानंतर गांधी जयंतीच्या निमित्ताने गावात स्वच्छता मोहीम हाती घेतली. सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमात सहभागी झाली. या कामासाठी अॅड. तुषार महाजन, विकास देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या समूहाच्या अध्यक्ष म्हणून प्रतिभा पाटील काम पाहतात. जयश्री पाटील या सचिव आहे. प्रमिला पाटील, छाया पाटील, रुचिरा महाजन, उत्कर्षा पाटील, सविता महाजन, बेबाबाई इंगळे या महिला या समूहामध्ये सक्रिय आहेत. सध्या ११ गावातील ५०० महिला गटातील पाच हजार महिला ‘सरस्वती महिला समूहा’शी जोडल्या गेल्या आहेत. प्रक्रिया उद्योगात पदार्पण 

  • सामाजिक उपक्रम राबवीत असताना प्रतिभा पाटील यांनी प्रगती महिला कृषी गटाची स्थापना केली. या गटामध्ये सरस्वती महिला समूहातील सदस्या कार्यरत आहेत. गटातील महिलांनी पूरक उद्योग सुरू करण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतले. या गटासोबत परिसरातील दहा महिला कृषी गट जोडले गेले.
  • बाजारपेठेचा अभ्यास करून गेल्या चार वर्षांपासून गटाने केळीप्रक्रियेला सुरुवात केली. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात प्रक्रिया उद्योगामध्ये थोड्याशा अडचणी आल्या. परंतु टप्याटप्प्याने गटाने यावर मात करत केळी वेफर्स, लाडू, गुलाबजाम, शेव, चिवडा, पीठ आदी पदार्थांच्या निर्मितीला सुरुवात केली. प्रक्रिया उद्योगातून महिलांना ऑक्टोबर ते जूनपर्यंत रोजगार मिळतो. या महिलांना गावामध्ये प्रतिदिन २०० रुपयांची मिळकत होते. मुंबई येथे २०१८ मध्ये झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्री उपक्रमात गटाने भाग घेऊन केळी प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीतून दहा लाखांची उलाढाल केली.
  • कृषी, पंचायत समितीच्या योजना राबविण्यासाठी महेंद्र वाघ, अंकुश जोशी, सचिन गायकवाड, चंद्रकांत माळी हे महिला गटाला मार्गदर्शन करतात. पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ धीरज नेहेते, महेश महाजन यांचे सहकार्य लाभते. कृषी विज्ञान केंद्राने महिला गटाला फैजपूर (ता. यावल) येथे केंद्राच्या वस्तू भांडारामध्ये एक स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या स्टॉलमध्ये कोरोना काळ वगळता केळी उपपदार्थांची विक्री सुरू आहे.
  • भाजीपाला पुरवठ्यामध्ये सहभाग  महिला समूहातर्फे तालुक्यातील विविध गावांमध्ये कुपोषित मुले तसेच गरोदर महिलांना भाजीपाला पुरवठा केला जातो. यामध्ये पालेभाज्यांचा चांगला समावेश आहे. या पालेभाज्या थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जातात. यातून वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाखांची उलाढाल होते. यासाठी शैलेंद्र देशमुख, अरुण पाटील, तुषार माळी आदींचे सहकार्य मिळते. प्रक्रिया उद्योगाची उलाढाल  केळी उपपदार्थ विक्रीतून महिला गटांची दरवर्षी दहा लाखांची उलाढाल होते. केळीचे विविध पदार्थ तसेच पापड, लोणचे, कापडी पिशव्यांची विक्री केली जाते. रावेर, जळगावातील काही किरकोळ विक्रेते, लहान खरेदीदार प्रक्रिया पदार्थ घेऊन जातात. तसेच पुणे, मुंबई येथेही काही खरेदीदार तयार झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे विक्री यंत्रणा मजबूत करण्यात गेल्या वर्षात अडचणी आल्या. यामुळे उलाढाल वाढू शकली नाही. पण स्थानिक भागात या उपपदार्थांची विक्री सुरू होती. येत्या काळात मॉलमध्ये केळी पुरवठ्याचे नियोजन गटाने केले आहे. तालुका, जिल्हास्तरावर आयोजिल्या जाणाऱ्या विविध प्रदर्शने-विक्री उपक्रमातही या समूहाचा सहभाग असतो. आरोग्य शिबिरांचे आयोजन दरवर्षी महिला समूह गटातर्फे शिंदखेडा आणि लगतच्या गावामध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. या उपक्रमासाठी डॉ. अनिल पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. रवींद्र वानखेडे यांचे सहकार्य मिळते. समूहातर्फे आयोजित शिबिरांच्या माध्यमातून १३७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शिंदखेडा गावात दरवर्षी दोन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. जनजागृतीवर भर  नवरात्रीच्या काळात नऊ दिवस विविध विषयांवर व्याख्यान आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते. ‘बेटी बचावो-बेटी पढाओ’ याबाबत महिला समूह कार्यरत आहे. विविध सरकारी योजना गावात राबविण्यासाठी समूहाने काम सुरू केले आहे. यामध्ये घरकुल योजना, हागणदारीमुक्त योजना, झाडे लावा- झाडे जगवा, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, विधवा महिलांना मानधन ही कामे समूहाने पूर्ण केली आहेत. वृक्षारोपण, शांतता, रोजगार, आरोग्य आदी उपक्रमांची दखल घेऊन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी संस्थेने वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप नॅशनल ॲवॉर्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-फुले नॅशनल अॅवॉर्ड या पुरस्कारांनी समूहाचा सत्कार करण्यात आला आहे. राज्यातील मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. संपर्क : प्रतीक्षा पाटील, ९५४५२२११८७ महेश महाजन, ९९७०६६१५४६

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

    Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

    Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

    Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

    Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

    SCROLL FOR NEXT