Various climatic factors affecting the crop
Various climatic factors affecting the crop 
कृषी सल्ला

पिकावर परिणाम करणारे हवामानातील विविध घटक

बालाजी बोबडे, डॉ. विनायक शिंदे-पाटील

स्थानिक हवामानानुसार लागवडीसाठी योग्य पिकांची निवड करावी. यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही शाश्‍वत उत्पादन मिळण्यास मदत होते. दुष्काळी भागात कमी कालावधीमध्ये येणारे, पाण्याची गरज कमी असणारे तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असणाऱ्या पिकांच्या जातींची निवड करावी. पिकाचे लागवडीपासून ते काढणी, साठवणूकीपर्यंत सर्व नियोजन हवामानावर अवलंबून असते. हवामानातील तापमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेचा वेग व दाब आणि पाऊस असा कोणताही घटक कमी अधिक झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. तापमान

  • तापमानातील बदलामुळे हवेच्या दाबात फरक पडतो. या फरकामुळे वाऱ्याची निर्मिती होऊन ढग खेचले जातात व पाऊस पडतो. पाऊस थांबल्यावर चांगला सूर्यप्रकाश मिळून तापमान वाढू लागल्यावर काही किडी झपाट्याने अनेक अंडी घालतात. वाढीच्या अवस्था पूर्ण करतात. परिणामी किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.
  • सर्वसाधारण पिकांच्या योग्य वाढीसाठी १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान उत्तम असते. ५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी आणि ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पिकांच्या वाढीसाठी घातक असते. पीक वाढीच्या अवस्थेनुसार तापमानाची गरज वेगवेगळी असते. उदा. खरीप मका पिकासाठी पेरणीवेळी किमान ६ ते ७ अंश सेल्सिअस, बियांच्या उगवणीसाठी २१ अंश सेल्सिअस आणि पिकाच्या वाढीसाठी ३२ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
  • उष्ण हवामानातील पिकांच्या वाढीच्या कालावधीमध्ये अचानक तापमान कमी झाल्यास पिकाची वाढ कायमची खुंटू शकते. अतिउष्ण तापमानामुळे देखील पिकांची वाढ थांबते. तापमानात वाढ झाल्यामुळे वनस्पतीचा श्‍वसन करण्याचा वेग वाढतो आणि त्यांना पुरेसा प्राणवायू मिळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच अतिउष्ण तापमानामुळे फुलगळ व फळगळ होताना दिसून येते.
  • सापेक्ष आर्द्रता वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाचे प्रमाणावरून हवेतील आर्द्रता मोजली जाते. हवेतील ६० ते ८० टक्के बाष्प पिकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. हेच बाष्पाचे प्रमाण पिकांवरील रोग झपाट्याने वाढण्यास, कीड-रोगांचा प्रसार वेगाने होण्यास कारणीभूत ठरते. तापमान कमी असल्यास आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. याउलट तापमानात वाढ होताच आर्द्रता कमी होते. परिणामी उन्हाळ्यामध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव तुलनेमध्ये कमी होतो. उन्हाळी हंगामात पिकांवर सकाळी धुके पडल्यास आर्द्रतेचे प्रमाण वाढते. तसेच दवामुळे पिकांचे भाग ओले राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. भाजीपाला व कांदा पिकांमध्ये याचा फटका बसतो. सूर्यप्रकाशाचा कालावधी सूर्य प्रकाशाचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात. तसेच बियांची उगवण, पानांचा आकार, खोड, फुल व फळांची वाढ अशा पिकाच्या एकूणच वाढीसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. पावसाळी हंगामामध्ये सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी राहतो. पिकांना गरजेपेक्षा कमी सूर्यप्रकाश मिळत असला तरी योग्य तापमान असल्यास पिकांची वाढ चांगली होते. सूर्यप्रकाशाच्या आवश्यक अवधीनुसार पडणारे पिकांचे तीन प्रकार आखूड दिनमानाची पिके (शॉर्ट डे) योग्य वाढीकरिता १२ तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश कालावधी आवश्यक असलेली पिके-   भात, ज्वारी, मूग, बाजरी, कापूस, सोयबीन, कांदा, स्ट्राबेरी, मोगरा, तंबाखू. इ. लांब दिनमानाची पिके (लाँग डे) १२ तासांपेक्षा अधिक सूर्यप्रकाशाचा कालावधी आवश्यक असलेली पिके-   गहू, हरभरा, पालक, लेट्युस, कोबी, बटाटा, मुळा, बीट, ओवा, इ. दिनमान तटस्थ पिके (डे न्युट्रल) सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा काहीच परिणाम न होणारी पिके. .मका, सूर्यफूल,काकडी, टोमॅटो, गुलाब इ. हवेचा वेग व दाब

  • एखाद्या ठिकाणच्या हवेचा वेग हा तेथील भौगोलिक परिस्थिती, समुद्रसपाटीपासूनची उंची, परिसरातील झाडे या सर्व बाबींवर अवलंबून असतो. हवेच्या वेगावर फुलांतील परागीभवन, बाष्पीभवनाचा वेग व बियांचे स्थलांतर अवलंबून असते.
  • तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्यास हवेचा दाब कमी होतो. वारा हा नेहमी जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतो. सोबत बाष्प घेऊन येतो. परिणामी दाब कमी असलेल्या ठिकाणी पाऊस पडतो. तापमान सरासरीपेक्षा कमी असल्यास हवेचा दाब वाढतो. अशा ठिकाणी दुष्काळी परिस्थिती ओढवते. परिणामी शेतीचे खूप मोठे नुकसान होते.
  • पाऊस

  • महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जून ते सप्टेंबर या काळात ८५ टक्के पाऊस पडतो. सर्वसाधारणपणे १ जूनला केरळ राज्यात मान्सूनचे आगमन होवून १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसास सुरवात होते. परंतू, पूर्वीप्रमाणे आता मान्सूनचा पाऊस हा वेळेवर येत नाही. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण मिळवण्यासाछी गावामध्ये किमान एक पर्जन्यमापक बसवावा. गावात किती पाऊस झाला याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. तसेच हवामान विभागाद्वारे मिळणाऱ्या अंदाजानुसार पिकांचे नियोजन करू शकतील.
  • कोरडवाहू शेतीमध्ये कमी पाण्यावर येणारी ज्वारी, बाजरी, करडई ही पिके घ्यावीत. विविध जलसंधारण पद्धतींचा अवलंब करून जमिनीत ओलावा टिकवण्याचे प्रयत्न करावेत.
  • वातावरणातील वायू वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंवर पिकांची प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया अवलंबून असते. याशिवाय नायट्रोजन हा वायू पिकांना नत्र स्थिरीकरणासाठी उपयुक्त असतो. हवेत होणारे प्रदुषण वातावरणातील वायूंच्या उपलब्धतेवर, पर्यायाने पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करते. शाश्‍वत उत्पादनासाठी पीक नियोजन

  • हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन-   हवामानातील घटकांच्या विश्‍लेषणानुसार पावसाचा योग्य अंदाज बांधून त्यानुसार लागवडीची योग्य वेळ साधावी. स्थानिक हवामानानुसार लागवडीसाठी योग्य पिकांची निवड करावी. यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही शाश्‍वत उत्पादन मिळू शकते. दुष्काळी भागात कमी कालावधीचे, पाण्याची गरज कमी असणारे तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असलेल्या पिकांच्या जातींची निवड करावी. तसेच आंतरपीक, दुबार पीक घेणे टाळावे.बदलत्या हवामानानुसार वेळोवेळी आवश्यक निर्णय घ्यावेत.
  • योग्य वेळी लागवड, आंतरमशागत, पीक अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, योग्य वेळी पिकांची काढणी या सर्व बाबींविषयी वेळेवर योग्य निर्णय घेणे आवश्‍यक आहे. पावसातील खंडतेचा काळ ओळखून खुरपणी-कोळपणी करावी. आच्छादन-खते टाकावीत. जमिनीतील ओलावा व हवामानातील घटकांचा अंदाज बांधून योग्य वेळी पाणी द्यावे. हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन योग्य वेळी पिकाची काढणी केल्यास नुकसान टाळता येते.
  • संपर्क- बालाजी बोबडे, ७३९७९०२१०८ (वरिष्ठ संशोधन सहयोगी, कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT