पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा
पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा 
कृषी सल्ला

पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा

डॉ. बी. बी. गायकवाड, डॉ. डी. बी. कच्छवे, डॉ. एच. एस. गरुड

हानिकारक पतंगवर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी ट्रायकोग्रामा हा परोपजीवी कीटक जगातील बहुतेक देशात सरस ठरला आहे. हा कीटक गांधीलमाशीच्या जातीचा असून, आकाराने अतिशय लहान आहे. त्याची लांबी ०.४ ते ०.७ मि.मी. व जाडी ०.१५ ते ०.२५ मि.मी. असते. ट्रायकोग्रामाच्या जगात साधारणत: १५० प्रजाती आहेत. या ट्रायकोग्रामाच्या प्रजाती जगभरात विखुरलेल्या ८ वर्गातील व ७० कुळातील साधारणत: ४०० विविध किडींच्या अंड्यावर आपली उपजीविका करतात. भारतात ट्रायकोग्रामाच्या २६ प्रजाती आढळून येतात. त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस, ट्रायकोग्रामा जॅपोनिकम, ट्रायकोग्रामा अकाई व ट्रायकोग्रामा नागरकट्टी या महत्त्वाच्या जाती आहेत. त्यांचा उपयोग विविध पिकांवरील पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो. असे होते ट्रायकोग्रामामुळे किडींचे नियंत्रण ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक असून, ते पतंगवर्गीय किडींच्या अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासांत उबतात. अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी यजमान किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन टाकते. साधारण ३ ते ४ दिवसांत कोषावस्थेत जाते. कोषावस्था २ ते ३ दिवसांत पूर्ण होते. अशा प्रकारे अंडी, अळी व कोष या तिन्ही अवस्था यजमान किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात. त्यानंतर अंड्याना छिद्र पाडून ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. पुन्हा हे प्रौढ ट्रायकोग्रामा पतंगवर्गीय किडीच्या अंड्याचा शोध सुरू करतात. त्यावर परोपजीवीकरण करतात. प्रौढ ट्रायकोग्रामा २ ते ३ दिवस जगतात. एक ट्रायकोग्रामा या अवधीमध्ये १०० अंडी घालू शकतो. ट्रायकोग्रामाचे जीवनचक्र ८ ते १० दिवसांत पूर्ण होते. हिवाळ्यात ९ ते १२ दिवसही लागतात. ट्रायकोग्रामा किडीच्या अंडावस्थेमध्येच नाश करते. पतंगवर्गीय किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा फार उपयोगी आहे. ट्रायकोग्रामाच्या यजमान किडी ः १. कपाशीवरील बोंडअळ्या २. उसावरील खोडकिडा ३. मक्यावरील खोडकिडा ४. सूर्यफुलावरील अळी ५. टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी ६. भातावरील खोडकिडा ७. ज्वारीवरील खोडकिडा ८. कोबीवरील ठिपक्याचा पतंग ट्रायकोग्रामाची निर्मिती ः

  • ट्रायकोग्रामा निसर्गात जरी असला तरी त्यांची संख्या प्रयोगशाळेत गुणन करून वाढविता येते व त्यांचा वापर करता येतो.
  • अमेरिका, रशिया आणि इतर युरोपियन देशामध्ये ट्रायकोग्रामा “सिटोट्रोगा सेरेलेल्ला” तर चीनमध्ये रेशीम कीटकाची अंडी वापरून प्रयोगशाळेत वाढ केली जाते.
  • भारतात ट्रायकोग्रामा वाढविण्यासाठी तांदळावरील पतंगाची अंडी वापरली जातात. त्याकरिता तांदळावरील पतंगाची अंडी शास्त्रीयदृष्ट्या प्रयोगशाळेत उत्पादित केली जातात.
  • ट्रायकोकार्डच्या साठवणीसंबंधी ः प्रयोगशाळेत कार्डवर तांदळावरील पतंगाच्या अंड्याचे परोपजीविकरण झाल्यानंतर ऋतुमानानुसार साधारणत: ७ ते ९ दिवसांत ट्रायकोग्रामाचे पूर्ण वाढ झालेले प्रौढ बाहेर पडतात. पूर्णपणे काळे पडलेले ट्रायकोकार्ड हे प्रौढ बाहेर पडण्यापूर्वी किडींच्या नियंत्रणासाठी वापरणे आवश्यक असते. हे कार्ड वेळीच वापरता येत नसतील तर १० ते १५ दिवस १० अंश सेल्सिअस तापमानास फ्रिजमध्ये साठविता येतात. वापरायच्या वेळी फ्रिजमधून काढून थोडा वेळ सामान्य तापमानाला ठेवावीत. त्यानंतर शेतामध्ये वापरता येतात. ट्रायकोकार्ड कसे वापरावे ? प्रत्येक ट्रायकोकार्डवर परोपजीविकरण दिनांक हे ट्रायकोग्रामा बाहेर पडण्याचा अपेक्षित दिनांक, शितकरण दिनांक व कार्ड वापरण्याचा अंतिम दिनांक इ. माहिती दिलेली असते. कार्डच्या मागील बाजूने कार्ड वापरण्यासंबंधीच्या सूचना दिलेल्या असतात. त्यावाचून कात्रीने कार्डचे समान भाग करावेत. त्यानंतर पानाच्या खालच्या बाजूस पट्टीचा रिकामा भाग स्टेपलरने अथवा टाचणीने टोचून प्रत्येक ८ ते १० मीटर या समान अंतरावर लावावेत.  

    ट्रायकोकार्ड वापर
    अ. क्र. पीक कीड ट्रायकोकार्डस / हेक्टर दोन वापरातील दिवसाचे अंतर एकूण वापर संख्या
    १. ऊस खोडकिडा ३ ते ४ १० ४ ते ६
    २. कपाशी बोंडअळ्या ७ ते ८ ४ ते ६
    ३. मका खोडकिडा  ६ ते ७ १० ३ ते ४
    ४. भात खोडकिडा २ ते ३ १० ३ ते ४
    ५. सूर्यफूल घाटेअळी ४ ते ५ ४ ते ६
    टीप ः ट्रायकोग्रामा हा परोपजीवी कीटक हरभऱ्याच्या पानांवरील खारामुळे व तूरीवर त्याच्या फुलांच्या विशिष्ट वासामुळे आकर्षित होत नाही. त्यामुळे ट्रायकोग्रामा या पिकांमध्ये घाटेअळीच्या नियंत्रणाकरिता प्रभावी ठरत नाही. 

    ट्रायकोकार्ड वापरताना घ्यावयाची काळजी ः १. ट्रायकोकार्ड हे शासन, कृषी विद्यापीठ, शासनमान्य संस्था यांच्याकडून विकत घ्यावे. २. ट्रायकोकार्ड हे विकत घेताना परोपजीवी कीटक बाहेर पडण्याची अपेक्षीत तारीख बघूनच मुदतीपूर्वी घ्यावेत. ३. ट्रायकोकार्ड वापरण्याअगोदर त्याच्या मागील बाजूने दिलेल्या वापरसंबंधीच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. ४. ट्रायकोकार्ड प्रखर सूर्यप्रकाश, अग्नी, कीटकनाशके, मुंग्या व पालीपासून दूर ठेवावेत. ५. ट्रायकोकार्ड फ्रिजमध्ये अथवा थंड जागी सुरक्षित ठेवावे. ६. ट्रायकोकार्ड सकाळी अथवा सायंकाळीच शेतात लावावे. ७. ट्रायकोकार्डवर आखलेल्या पट्ट्या कात्रीने हळूवार कापून झाडावरील पानाच्या खालील बाजूस स्टेपलरने अथवा टाचणीने लावावे. ८. शेतामध्ये ट्रायकोग्रामा सोडण्यापूर्वी व सोडल्यानंतर हानीकारक कीटकनाशकांची कमीत कमी १० ते १५ दिवसांपर्यंत फवारणी करू नये. ९. पिकास पाण्याची पाळी दिल्यानंतर परोपजीवी कीटकांचे प्रसारण करावे. ट्रायकोग्रामा वापराचे फायदे ः १. ट्रायकोग्रामा वापराने त्याचा वातावरणात व इतर मित्र किटकांवर विपरीत परिणाम होत नाही. २. ट्रायकोग्रामाचा प्रौढ स्वत: हानिकारक किडींची अंडी शोधून नष्ट करतो. त्याचबरोबर स्वत:ची पुढची पिढी त्या जागेवर वाढवितो. त्यामुळे ही पद्धत स्वयंप्रसारीत व स्वयंउत्पादीत आहे. ३. ट्रायकोग्रामाच्या वापराने कीटकनाशकाच्या तुलनेत पीक संरक्षणावर कमी खर्च होतो. हानिकारक किडीचे प्रभावी नियंत्रण होते. डॉ. बी. बी. गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ - कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT