The use of trap crops is beneficial in cotton 
कृषी सल्ला

सापळा पिकांद्वारे किडींचे व्यवस्थापन

पिकाच्या लागवडीवेळीच त्यातील सापळा पिकांचे योग्य नियोजन करावे. पुढे होणाऱ्या पीक संरक्षणाच्या खर्चात बचत शक्य होते. एकात्मिक पद्धतीतील अशा घटकांच्या वापराने पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येतो.

डॉ. कृष्णा अंभुरे

पिकाच्या लागवडीवेळीच त्यातील सापळा पिकांचे योग्य नियोजन करावे. पुढे होणाऱ्या पीक संरक्षणाच्या खर्चात बचत शक्य होते. एकात्मिक पद्धतीतील अशा घटकांच्या वापराने पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येतो. निसर्गातील बहुतांश किडींच्या नियंत्रणासाठी निसर्ग आपल्या पातळीवर कार्यरत असतो. काही किडींसाठी रासायनिक नियंत्रणाची गरज भासते. मात्र, अनेकजण थोडा धीर न धरता शेतात कीड रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. त्यातून पर्यावरणासाठी ऱ्हास होतो. हानिकारक किडींसोबत उपयुक्त कीटकांची संख्या कमी होते. मित्र कीटकांची संख्या कमी झाल्याने पुन्हा किडींची संख्या आटोक्यात आणण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपल्याकडे बहुतांश शेती उत्पादनामध्ये रासायनिक कीटक नाशकांचे अवशेष निर्धारित पातळीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. पर्यावरणातही चारा, पाणी यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष राहत असून, पुढे ते दुधातही आढळून येतात. त्याचे विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होतात. हे सर्व टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. यातून सजीवसृष्टीची संभाव्य हानी टाळता येईल. तसेच पीक संरक्षणाच्या खर्चातही बचत होऊ शकेल. एकात्मिक कीड व्यवस्थापनातील सापळा पिकाच्या लागवडीचे नियोजन मुळ पिकाच्या पेरणीसोबत केले पाहिजे. सापळा पीक म्हणजे काय? मुख्य पिकांचे किडींमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावले जाते. या पिकाकडे कीड आकर्षित होते. पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते. अशा पिकांना “सापळा पिके” म्हणतात. सापळा पीक वापरण्याची तत्त्वे

  • सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे.
  • ते उपयोगी असल्यास त्यापासून शेतकऱ्यास अधिक उत्पन्न मिळेल.
  • मुख्य पिकाच्या शेतातील मुदतीच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.
  • सापळा पिकावरील किडींची अंडीपुंज व किडी वेळोवेळी गोळा करून नष्ट करावीत. अन्यथा सापळा पिकातील किडी मुख्य पिकामध्ये येऊन मुख्य पिकाचे नुकसान होऊ शकते.
  • सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे. किंवा केवळ तेवढ्या भागावर कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • महत्त्वाच्या पिकातील सापळा पिके कापूस

  • कपाशीच्या प्रत्येक १० ओळीनंतर दोन ओळी मका किंवा चवळीची पेरणी करावी. त्यावर नैसर्गिक मित्र कीटकांचे संवर्धन व अभिवृद्धी होते. चवळीवर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यावर क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल, सिरफिड माशी अशा मित्र कीटकांचीही वाढ होते. ते मावा किडींची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत करतात.
  • कपाशीमध्ये उडीद, मुग, यांसारखी आंतरपिके घेतल्यास मित्र कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.
  • कपाशीमध्ये १० व्या किंवा ११ व्या ओळीत भगर पिकाची एक ओळ टाकावी. भगरीच्या कणसातील दाणे वेचून खाण्यासाठी चिमणी सारखे पक्षी आकर्षित होतात. आकर्षित झालेले पक्षी पिकावरील उंटअळ्या, हेलीकोवर्पा, स्पोडोप्टेरा अशा किडींच्या अळ्या आवडीने वेचून खातात. परिणामी किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते.
  • कपाशी भोवती आफ्रिकन किंवा फ्रेंच झेंडू या सापळा पिकाची एक सीमा ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंडअळीची मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालते. झेंडूच्या मुळांमध्ये ‘अल्फा टर्निथल’ हे रसायन स्रवते, त्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते.
  • कपाशीभोवती एक ओळ एरंडी या सापळा पिकाची सीमा ओळ घ्यावी. उंटअळ्या व स्पोडोप्टेराचा पतंग एरंडीच्या पानांवर अंडी घालतो. दर काही काळाने निरीक्षणामध्ये असे अंडीपुंज व अळ्या वेचून नष्ट कराव्यात. मुख्य पिकाचे संरक्षण होते.
  • सोयाबीन

  • सोयाबीन पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकांची एक-एक सीमा ओळ लावावी. स्पोडोप्टेराचा मादी पतंग एरंडीच्या पानांवर समूहाने अंडी घालतो. अशी अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त पाने अळीसहित नष्ट करावीत किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • सूर्यफुलाची पिवळी फुले आणि रुंद पाने हेलीकोवर्पा, उंटअळ्या, स्पोडोप्टेरा आणि केसाळ अळीच्या मादी पतंगांना अंडी घालण्यास आकर्षित करतात. अशी पाने अंडी व अळ्यासहित नष्ट करावीत.
  • तूर 

  • घाटेअळी, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तूर अधिक ज्वारी ४:२ किंवा ३:३ या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
  • तूर सलग पेरणीसाठी तुरीच्या बियाण्यात १% ज्वारी किंवा बाजरी किंवा सूर्यफुलाचे बी मिसळून पेरणी करावी. १० किलो तूर बियाणात १०० ग्रॅम सापळा पिकाचे बी मिसळावे. याकडे मित्र पक्षी आकर्षित होऊन शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करतील.
  • भुईमूग भुईमूग पिकाच्या सीमा ओळीने सूर्यफुलाची सापळा पीक म्हणून लागवड केल्यास हेलीकोवर्पा, स्पोडोप्टेरा आणि केसाळ अळीच्या मादी पतंग पिवळ्या रंगाच्या फुलाकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. अशा फुलांवरील अंडीपुंज आणि अळ्या वेचून नष्ट कराव्यात. टोमॅटो  टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी आणि सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी टोमॅटो पिकाभोवती झेंडूची एक ओळ सापळा पीक म्हणून लावावी. फळपिके  फळ पिकामध्ये मुळांवर हल्ला करणाऱ्या सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी झेंडू सारखी मिश्रपिके घ्यावीत. झेंडूच्या मुळांमध्ये ‘अल्फा टर्निथल’ हे रसायन स्रवते, परिणामी सूत्रकृमींच्या नियंत्रणास मदत होते. फुलांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. सापळा पिकाचे फायदे

  • कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
  • मित्र कीटकांचे संवर्धन होते.
  • पिकाचे उत्पादन व प्रत सुधारते.
  • पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
  • पर्यावरणाचे संवर्धन होते.
  • सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
  • संपर्क- डॉ. कृष्णा अंभुरे, ८८३०७५०३९८ (विषय विशेषज्ञ-पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

    Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

    Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

    Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

    Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

    SCROLL FOR NEXT