योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन, पाचट आच्छादनामुळे उसाची जोमदार वाढ.
राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या प्रक्षेत्रावर संवर्धित शेतीतून खोडवा व्यवस्थापनाचा प्रयोग येथे घेण्यात येत आहेत. यामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर,जैविक व सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन, रासायनिक खतांचा योग्य वापर आणि पाचट आच्छादानावर भर देण्यात आला आहे. संवर्धित शेतीतून खोडवा व्यवस्थापनाचा प्रयोग राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या प्रक्षेत्रावर येथे घेण्यात आला. येथील हवामान उष्णकटिबंधीय आहे. हे क्षेत्र अनियमित, कमी प्रभावी पावसाचे म्हणून ओळखले जाते. प्रायोगिक काळात ६२७.७२ मिमी सरासरी पाऊस झाला. प्रायोगिक कालावधीत कमाल ३२.४ अंश सेल्सिअस आणि किमान १८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
प्रयोगाचा तपशील एम १: लेझर जमीन सपाटीकरण + पारंपारिक नांगरणी + खतांच्या शिफारस केलेल्या मात्रेच्या १० टक्के बेसल मात्रा (शिफारशीत मात्रा ः२५० किलो नत्र, १२० किलो स्फुरद, १२० किलो पालाश प्रति हेक्टर) उर्वरित ९० टक्के खत मात्रा ठिबक सिंचनातून देण्यात आली.
२. एम २ लेझर जमीन सपाटीकरण + खोल नांगरणी कमी करणे + १० टक्के बेसल खत मात्रा आणि उर्वरित ९० टक्के खतमात्रा ठिबक सिंचनातून देण्यात आली.
एम ३: लेझर जमीन सपाटीकरण + खोल नांगरणी कमी करणे + १० टक्के बेसल खत मात्रा, ४० टक्के खत सॉर्फ यंत्राद्वारे आणि उर्वरित ५० खत मात्रा ठिबक सिंचनातून देण्यात आली. एम ४ शेतकऱ्यांच्या पद्धतीने पारंपरिक ऊस व्यवस्थापन.टी १: जमिनीच्या पृष्ठभागावर ऊस पाचट आच्छादन करणे. टी २: जमिनीच्या पृष्ठभागावर ऊस पाचट आच्छादन न करणे किंवा पाचट जाळणे. प्रयोगाचे परिणाम
पारंपरिक नांगरणी (एम १) आणि खोल नांगरणी कमी करणे (एम २) पद्धती अंतर्गत उसाचे उत्पादन आणि गुणधर्मामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक नव्हता. यामधून असे दिसून येते, की उसाच्या उत्पन्नाशी तडजोड न करता खोल नांगरणी कमी केलेली शेती स्वीकारली जाऊ शकते. रासायनिक खतांची शिफारस केलेली मात्रा १० टक्के बेसल डोस, ४० टक्के खत मात्रा सॉर्फ यंत्राद्वारे देण्यात आली. उर्वरित ५० टक्के मात्रा ठिबक सिंचनातून दिल्याने ऊस उत्पादनात लक्षणीय सुधारणा झाली. खतांची शिफारस मात्रा पीक वाढीस फायदेशीर ठरते. खत मात्रा ठिबक सिंचनातून दिल्याने पोषक घटकांच्या योग्य पुरवठ्याद्वारे पीक वाढ टिकवून ठेवण्यास मदत झाली. लेझर जमीन सपाटीकरण, ठिबक सिंचन पद्धत आणि पाचट आच्छादन केल्याने पाणी वापरात ४८ टक्के बचत आणि ऊस उत्पादनात ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. संवर्धित पद्धतीने ऊस खोडव्यामध्ये करावयाच्या उपाययोजना
ऊसतोडणी झाल्यानंतर जमा झालेले पाचट व्यवस्थित पसरून द्यावे. बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे. उसाचे बुडखे मोकळे केल्याने त्यावर सूर्यप्रकाश पडून कोंब जोमदार येतात. ऊसतोडणी यंत्राने केल्यास पाचटाचे लहान तुकडे होतात. त्यामुळे बुडख्यांवर असणारे पाचट काढावे लागत नाही. मोठे बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटावेत. जेणेकरून जमिनीत असणाऱ्या कोंबाला फुटण्यास मदत होते. फुटव्यांची एकूण संख्या वाढते. बुडखे छाटल्यानंतर त्यावर बुरशीनाशकाची फवारणी करावी. सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति एकरी ३२ किलो युरिया आणि ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात टाकावे. त्यानंतर ४ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन सेंद्रिय खत किंवा ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर टाकावे. पाचट कुजविण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते.शेतात पाचट असल्याने सुरुवातीस पाणी पोहोचण्यास वेळ लागतो, त्यामुळे सर्वत्र पाणी जाईल याची काळजी घ्यावी. पाचट आणि मातीचा संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. तयार केलेली रोपे वापरून पिकामध्ये नांग्या भराव्यात. खोडव्यास पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वाफसा असताना दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. पहिली खतमात्रा १५ दिवसांच्या आत द्यावी. यासाठी पहारीने बुडाख्यापासून १० ते १५ सेंमी अंतरावर वरंब्याच्या बगलेत १५ ते २० सेंमी खोल छिद्र घेऊन दोन छिद्रांमधील अंतर ३० सेंमी ठेवून सरीच्या एका बाजूस पहिली खतमात्रा द्यावी. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी. खते दिल्यानंतर नेहमी प्रमाणे पाणी द्यावे. खोडवा उसासाठी पहारीने द्यावयाची खतमात्रा (प्रती एकर)
खते | पहिली मात्रा | दुसरी मात्रा |
युरिया | १२५ किलो | १२५ किलो |
सिंगल सुपर फॉस्फेट | १७५ किलो | १७५ किलो- |
म्युरेट ऑफ पोटॅश | ५० किलो | ५० किलो |
किंवा |
युरिया | १५० किलो | १५० किलो |
सिंगल सुपर फॉस्फेट | ७५ किलो | ७५ किलो |
म्युरेट ऑफ पोटॅश | ५० किलो | ५० किलो |
सल्फर | १२ किलो | १२ किलो |
ठिबक सिंचनाची सोय असल्यास ठिबक सिंचन संचातून उसासाठी पाण्याबरोबर शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते (८० नत्र, ४० स्फुरद, ४० पालाश किलो/एकर) खोडवा ठेवल्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा याप्रमाणे २६ हप्त्यांत दिल्याने उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ होऊन २० टक्के खत मात्रेत बचत होते.
खोडवा उसासाठी ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचे वेळापत्रक
आठवडे | युरिया (किलो/एकर/आठवडा) | मोनो-अमोनिअम फॉस्फेट (किलो/एकर/आठवडा) | म्युरेट ऑफ पोटॅश (किलो/एकर/आठवडा) |
१ ते ४ | ६ | २ | १.५ |
५ ते ९ | १० | ६ | २ |
१० ते २० | ६.५ | ४.५ | २ |
२१ ते २६ | -- | -- | २ |
सूक्ष्म अन्नद्रव्ये : माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅंगेनीज सल्फेट,२ किलो बोरॅक्स १:१० या प्रमाणात सेंद्रिय खतामध्ये मिसळून ४ ते ५ दिवस सावलीत मुरवून वापरावीत.अझोस्पिरिलिअम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आणि जिवाणूसंवर्धन प्रत्येकी अर्धा किलो प्रति एकर या प्रमाणात एकूण १.२५ किलो जिवाणू खतांचे मिश्रण २५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र करून ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र मिसळून वापरावीत. जिवाणू खतांचा वापर केला असता २५ टक्के नत्रयुक्त आणि स्फुरदयुक्त खतांची बचत होते.संवर्धित ऊस खोडवा पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही. यामध्ये तणांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो. तणे उगवल्यास ती उपटून शेतातच पाचटावर टाकावीत. पाणी नियोजन : पारंपरिक खोडवा व्यवस्थापनामध्ये पाण्याच्या २६ ते २८ पाळ्या लागतात.परंतु संवर्धित शेतीच्या माध्यमातून फक्त १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या असल्या तरी खोडवा उसाचे चांगले उत्पादन मिळते. दोन पाळ्यांतील अंतर नेहमीच्या पद्धतीपेक्षा दीड पटीने वाढवावे. पाचटाच्या आच्छादनामुळे पीक पाण्याचा तान सहन करू शकते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे ही पद्धत ज्या भागात पाण्याचा जास्त तुटवडा आहे त्या भागांसाठी उपयुक्त आहे. पीक संरक्षण: खोडवा पिकामधील काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीची बेटे समूळ उपटून नष्ट करावीत. खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी दोन फुले ट्रायकोकार्ड लावावीत. शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर करावा. कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन फुले ट्रायकोकार्ड मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार ऊस तोडणी अगोदर एक महिन्यापर्यंत वापरावीत. संवर्धित ऊस खोडवा पद्धतीचे फायदे
पाचट आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. आच्छादनामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. जमिनीची जलधारणा शक्ती वाढते, भौतिक गुणधर्म सुधारतात. उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थाचे विघटन होत असताना त्यातून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. पिकाला कर्बग्रहणाच्या क्रियेसाठी हा कार्बन डायऑक्साइड वायू लागतो. हवेमध्ये या वायूचे प्रमाण ३०० पीपीएम एवढे असते. परंतु पाचट ठेवलेल्या क्षेत्रात हे प्रमाण पाचट कुजण्याच्या क्रियेमुळे हळूहळू वाढते. परिणामी कर्बग्रहणाचा वेग वाढतो, उसाची जोमदार वाढ होते. संपर्क : डॉ. गोरक्ष वाकचौरे, ७३५०९१६९८५ प्रशांत भोसले, ८१४९२३०६३० (राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था, माळेगाव (खुर्द), बारामती, जि. पुणे)