It is a misconception that plants provide oxygen day and night 
कृषी सल्ला

दिवस, रात्र ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती हा गैरसमजच

निसर्गातील सर्व वनस्पती फक्त दिवसाच ऑक्‍सिजन बाहेर सोडतात. भूतलावरील कोणतीही वनस्पती चोवीस तास, दिवस-रात्र ऑक्‍सिजन देत नाही, ही बाब सुस्पष्ट आहे. त्यामुळे लोकांनी चुकीच्या गोष्टींवर भर न देता शास्त्रीय बाजूनेच विचार करावा.

डॉ. मधुकर बाचूळकर

निसर्गातील सर्व वनस्पती फक्त दिवसाच ऑक्‍सिजन बाहेर सोडतात. भूतलावरील कोणतीही वनस्पती चोवीस तास, दिवस-रात्र ऑक्‍सिजन देत नाही, ही बाब सुस्पष्ट आहे. त्यामुळे लोकांनी चुकीच्या गोष्टींवर भर न देता शास्त्रीय बाजूनेच विचार करावा. पृथ्वीवरच्या वनस्पती जगतातील कवक (बुरशी) हा एकमेव वनस्पती गट सोडला, तर इतर सर्व वनस्पती प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेत दिवसा वातावरणातील कार्बन डायऑक्‍साइड पानांवाटे आत घेतात. सूर्यप्रकाश, हरितद्रव्य व पाणी यांच्या मदतीने अन्नाची निर्मिती करतात आणि ऑक्‍सिजन बाहेर सोडतात. त्यामुळेच जीवसृष्टीत वृक्ष हा उत्पादक घटक म्हणून प्रथम स्थानावर आहे. शेती आणि पूरक उद्योग पूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे. प्राणवायू (ऑक्‍सिजन) निर्मिती, वायू प्रदूषणास आळा, पर्यावरण स्वच्छता, जमिनीची धूप थांबविणे, सुपीकता वाढविणे, पाण्याचे चलनवलन, आर्द्रता नियंत्रण अशी पर्यावरण संतुलनाचे कार्ये वृक्ष अखंडपणे करीत आहेत. संस्कृतीमधील महत्त्व 

  • उपयुक्ततेमुळे भारतीय संस्कृतीत बेल, उंबर, वड, पिंपळ, आपटा, शमी, कदंब यांसारखे अनेक वृक्ष आणि तुळस, दवणा, दूर्वा यांसारख्या इतर काही वनस्पतींचे स्थान. 
  • वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे वृक्ष आणि वनस्पतींना सणांमध्ये मानाचे स्थान. 
  • इस्लाम धर्मात ‘पिलू’ आणि ख्रिश्‍चन धर्मात ‘ॲरूकॅरिया’ वृक्ष महत्त्वाचा.
  • आयुर्वेद व इतर संस्कृत ग्रंथात वनस्पती, वृक्षांना महत्त्व.  
  • वनस्पतींबाबत सर्वसाधारण गैरसमज  

  • आपल्याकडे पारंपरिक गैरसमज आहे, की वड, पिंपळ, उंबर, कडुलिंबासारखे इतर काही देशी वृक्ष आणि तुळस ही औषधी वनस्पती, दिवसा व रात्री चोवीस तास ऑक्‍सिजन देतात. इतर वृक्ष आणि वनस्पतींपेक्षा ते कित्येक पट जास्त ऑक्‍सिजन देतात. अशा प्रकारची माहिती असणारे अवैज्ञानिक लेख समाज माध्यमात प्रसिद्ध होत आहेत. यामुळे विज्ञान- तंत्रज्ञान युगात गैरसमज पसरणे ही बाब चिंताजनक आहे. 
  • अनेक विदेशी, सावलीत वाढणाऱ्या शोभिवंत वनस्पतींना हाउस प्लँट्‌स किंवा इनडोअर प्लँट्‌स नावाने ओळखतात. या वनस्पती दिवसा व रात्री चोवीस तास मोठ्या प्रमाणात ऑक्‍सिजन हवेत सोडतात आणि वेगाने हवा शुद्धीकरणाचे काम करतात. इनडोअर वनस्पती रात्री घरातील कार्बन डायऑक्‍साइड शोषून घेऊन, घरातील हवा शुद्ध करतात, अशी चुकीची, अशास्त्रीय माहिती काही लोकांकडून जाणीवपूर्वक सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. 
  • आरेका पाम, ॲलोव्हेरा, सॅन्सव्हेरिया, सिनड्रयॉप्सस, ॲग्लोनिमा, पायलिया, क्‍लोरोफायटम, डायफेनबेकिया, आयव्ही प्लँट, बांबू पाम, ब्रॉमिलीडस, स्पॅथिफायलम, अंब्रेला बुश, कॅलाथिया, कॉर्डिलाइन, सिंगोनियम, ॲझेलिया, ड्रेसिना, फिलोडेंड्रॉन, मनी प्लँट, मॉन्सेटेरिया या इनडोअर झाडांना बाजारपेठेत मागणी आहे. प्रदूषण व तापमान कमी करण्याचा सोपा उपाय असल्याने घराभोवती या वनस्पतींची सावली आणि कुंड्यांमध्ये लागवड करतात. फक्त सुशोभनासाठी या वनस्पती उपयुक्त आहेत.
  • अनेक ठिकाणी ऑक्‍सिजन पार्क ही संकल्पना राबविण्यात आली. या ठिकाणी तुळस आणि विदेशी इनडोअर वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. या पार्कमधून चोवीस तास आपणास ऑक्‍सिजन उपलब्ध होतो, असेही सांगितले जाते. शासकीय आदेशाप्रमाणे शहरात रस्त्यांच्या कडेला विदेशी इनडोअर वनस्पतींची कुंड्यातून लागवड करण्यात आली. पुलाच्या भिंती, शासकीय इमारतीच्या भिंतींवर इनडोअर वनस्पतींची ‘व्हर्टिकल गार्डन’ तयार झाली आहे. या इनडोअर वनस्पती चोवीस तास ऑक्‍सिजन देतात आणि प्रदूषित हवा वेगाने स्वच्छ करतात, असे चुकीचे कारण सांगितले जाते. 
  • प्रकाश संश्‍लेषण क्रिया समजून घ्या... वृक्ष, वनस्पती आणि इनडोअर प्लँट्‌स दिवसा आणि रात्री चोवीस तास ऑक्‍सिजन देतात का? यास काही शास्त्रीय आधार आहे का? हे समजून घेणे आवश्‍यक आहे.

  • प्रकाश संश्‍लेषण ही प्रक्रिया वनस्पतींमध्ये दोन टप्प्यांमध्ये होते. पहिल्या टप्प्यात वनस्पती दिवसा पानांत असणाऱ्या हरितलवकातील हरितद्रव्याच्या मदतीने, सौरऊर्जा शोषून घेतात. सौरऊर्जेचे रूपांतर जैवरासायनिक ऊर्जेत करतात. त्याच वेळी पाण्याचे विघटन करून त्यातील हायड्रोजन आणि ऑक्‍सिजन घटक वेगळे करून, पानांवर असणाऱ्या पर्णछिद्रांतून ऑक्‍सिजन बाहेर सोडतात. त्याच वेळी दुसऱ्या टप्प्यात, वनस्पती दिवसा हवेतील कार्बन डायऑक्‍साइड पर्णछिद्रांतून आत पानात घेतात आणि त्यावर पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या हायड्रोजन व जैवरासायनिक ऊर्जा यांच्या सहकार्याने, कार्बन डायऑक्‍साइडवर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून ग्लुकोजची (स्टार्च) निर्मिती करून आपले अन्न स्वतः तयार करतात. हे तयार केलेले अन्न नंतर वनस्पती मूळ, खोड, बिया, फळांमध्ये साठवतात. ज्यांचा आपण आणि प्राणी अन्न म्हणून वापर करतो. 
  • शास्त्रीय प्रक्रिया लक्षात घेतल्यास, वनस्पतींमध्ये ऑक्‍सिजन तयार होण्याची प्रक्रिया फक्त दिवसाच सूर्यप्रकाशाच्या सहकार्याने होते. ही प्रक्रिया रात्री अंधारात किंवा रात्री चंद्र प्रकाशात, तसेच कृत्रिम प्रकाशात होत नाही. सर्व वनस्पती फक्त दिवसाच ऑक्‍सिजन बाहेर सोडतात. भूतलावरील कोणतीही वनस्पती, वृक्ष चोवीस तास, दिवस-रात्र ऑक्‍सिजन देत नाहीत. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले असले, तरीही हेतुपुरस्सर काही लोक चुकीची माहिती प्रसारित करून, जनतेची दिशाभूल करत आहेत. तेव्हा शास्त्रीय अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
  • समाज माध्यमातील गैरसमज 

  • वनस्पतींच्या फांद्यांचा विस्तार, आकार व पर्णसंभार जितका मोठा व जास्त, तेवढा वनस्पतींकडून जास्त ऑक्‍सिजन हवेत सोडला जातो. वृक्ष आणि मोठ्या झुडपांच्या तुलनेत, इनडोअर प्लँट्‌स लहान असल्याने या वनस्पती इतर सर्व वनस्पतींपेक्षा जास्त ऑक्‍सिजन हवेत सोडतात, हा चुकीचा समज आहे.
  • तुळस वनस्पतीबाबत गैरसमज असा आहे, की पहाटे व सकाळी पानावाटे तुळस ओझोन वायू वातावरणात सोडते. तुळस किंवा कोणतीही वनस्पती त्यांच्या कोणत्याही प्रक्रियेतून ओझोन वायू तयार करीत नाहीत. 
  • वैद्यकीय ऑक्‍सिजन कारखान्यात तयार होतो, जो रुग्णांसाठी आवश्‍यक आहे. हवेतील ऑक्‍सिजन उपलब्धतेचा आणि वैद्यकीय ऑक्‍सिजन उपलब्धतेचा एकमेकांशी संबंध जोडणे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. सोशल मीडियावरून असे गैर समज पसरविले जात आहेत. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. 
  • पिंपळ, उंबर, कडुनिंब, कापूर, बांबू हे वृक्ष तसेच तुळस ही वनस्पती चोवीस तास ऑक्‍सिजन वातावरणात सोडते. कोरफड, आयव्ही, गोल्डन पोथास, स्नेक प्लँट व इतर इनडोअर वनस्पती रात्री कार्बन डायऑक्‍साइड आत घेऊन ऑक्‍सिजन रात्री व दिवसा बाहेर सोडतात. जास्तीत जास्त ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी काही ठरावीक वृक्ष आणि वनस्पतींची लागवड आवश्‍यक आहे. यासारखी विधाने अशास्त्रीय आणि दिशाभूल करणारी आहेत.
  • लोकांनी पर्यावरण संवर्धन आणि देशी जैवविविधता वाढीस लागण्यासाठी घरांभोवती, रस्त्यांच्या कडेने, मोकळ्या जागेत विविध देशी वृक्ष आणि झुडपांची लागवड करावी. यामुळे तापमान कमी होण्यासाठी मदत होईल.  
  • - डॉ. मधुकर बाचूळकर  ९७३०३९९६६८ (लेखक वनस्पती तज्ज्ञ आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Nanded Crop Loss: नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी भुईसपाट

    Fuel Stock Solapur: इंधनाचा मुबलक साठा; पुरवठा सुरळीत ठेवा: जिल्हाधिकारी

    Urea Import: खरिपासाठी १७ लाख टन युरिया खरेदीची तयारी, नॅशनल फर्टिलायझर्सने काढली निविदा

    Parbhani Crop Loan: परभणी जिल्ह्यात खरीप पीककर्जाचे २.३३ टक्के उद्दिष्ट साध्य

    Udid Seeds: अक्कलकोटमध्ये उडदाचे साडेआठ लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त

    SCROLL FOR NEXT