जमिनीची सुपिकता जपण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी.
जमिनीची सुपिकता जपण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. 
कृषी सल्ला

जमिनीची क्षारता थांबवून वाढवा सुपीकता

डॉ. पपिता गौरखेडे

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी पीक लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी. नियमित सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा.“मातीची क्षारता थांबवून उत्पादकता वाढवा” हे यंदाच्या जागतिक मृदा दिनाचे घोषवाक्य आहे. जागतिक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने जमिनीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडच्या काळात अनियंत्रित रासायनिक खतांचा वापर, शहरीकरण आणि उद्योगधंद्यासाठी होणारी जंगलतोड आणि इतर कारणांमुळे मातीची झीज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चोपण जमिनी 

  • जमिनीचे विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण शेकडा १५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षाराची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते, सामू ८.५ ते १० पर्यंत असतो.
  • जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. त्यामुळे वाळल्यावर जमीन कडक होते. ओली असताना अतिशय चिबड होते. त्यामुळे पाण्याचा वाफसा लवकर होत नाही.
  • अशा जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही. पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही.
  • सुधारणा 

  • जमिनीला एक टक्क्याचा उतार द्यावा.
  • जमीन सपाट करून योग्य अंतरावर जमिनीच्या बाहेरच्या दिशेला चर खोदावेत.
  • माती परीक्षण करून योग्य प्रमाणामध्ये जिप्सम, गंधक, आयर्न पायराईटचा वापर करावा.
  • जमिनीमध्ये गरजेनुसार जिप्सम ५ ते १५ टन प्रति हेक्टरी शेणखतात मिसळून द्यावे.
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये भूसुधारके जसे की, गंधक १ टक्का किंवा आयर्न पायराईट २ टक्के वापरावे.
  • जमिनीमध्ये १ ते २ दिवस पाणी साठवून ठेवून ते चराद्वारे बाहेर काढावे. त्यातून क्षारांचा निचरा होतो.
  • क्षारांचा निचरा केल्यानंतर अशा जमिनीत गहू, ऊस, कापूस अशा क्षारसहनशील पिकांची लागवड करावी.
  • सेंद्रिय खतांचा नियमित वापर करावा.
  • पिकांच्या फेरपालटीत हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
  • क्षारयुक्त जमीन 

  • जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा पातळ थर दिसून येतो. या जमिनीचा सामू ८.५ पेक्षा कमी असून निचरा चांगला होतो.
  • जमिनीतील विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा कमी असते.
  • सुधारणा 

  • जमिनीला १ टक्का उतार द्यावा.
  • शेतात उताराच्या आडव्या दिशेने योग्य अंतरावर चर खोदावेत.
  • शेताला पुरेसे पाणी देऊन ते पाणी साठवून ठेवून नंतर ते पाणी चरावाटे बाहेर केल्यास विद्राव्य क्षारांचा निचरा होतो.
  • पिकांच्या फेरपालटीत हिरवळीच्या पिकांची लागवड करावी.
  • जमिनीत जास्त पाणी साचल्यास किंवा ओलिताखालील जमीन पडीक ठेवल्यास जमीन क्षारयुक्त होते. त्यामुळेच जमीन नेहमी लागवडीखाली ठेवावी.
  • जमिनीवर पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
  • चुनखडीयुक्त जमीन 

  • मुक्त चुन्याचे प्रमाण सरासरीपेक्षा ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असते. सामू ८ पेक्षा जास्त असतो. जमिनीची घडण ही अतिशय कठीण बनलेली असते.
  • जमिनीची विद्युतवाहकता १ डेसी सायमन प्रती मीटरपेक्षा कमी असते. अशा जमिनीची जलधारण शक्ती कमी असते. हवा व पाणी खेळण्याचे प्रमाण अतिशय कमी होते.
  • जमिनीमध्ये नत्र : स्फुरद : पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता अतिशय कमी असते. जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त झाल्यास वाळवी, हुमणी किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढतो, पिकांची वाढ खुंटते.
  • सुधारणा 

  • खोलवर नांगरट करावी.
  • हिरवळीची खते, सेंद्रिय खतांचा नियमित वापर करावा.
  • अन्नद्रव्यांचा वापर शक्यतो फवारणीद्वारे करावा.
  • क्षार सहनशील पिकांची लागवड करावी. उदा. आवळा, बोर, सीताफळ, सोयाबीन, गहू, कापूस इत्यादी.
  • पाणी धरून ठेवण्यासाठी आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी सेंद्रिय खते त्याचबरोबर ऊस मळी कंपोस्ट खत ५ टन प्रति हेक्टरी नांगरटीपूर्वी जमिनीत मिसळावे.
  • ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
  • जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होवू नये यासाठी काळजी 

  • पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत.
  • जमीन शक्यतो सपाट असावी. वेळोवेळी बांधबंदिस्ती करावी.
  • वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी द्यावे.
  • कालव्यामधून जमिनीमध्ये पाणी झिरपणार नाही याची काळजी घ्यावी.
  • नियमित सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
  • विहीर किंवा कूपनलिकेचे पाणी जास्त खारे असल्यास मोकाट पद्धतीने देऊ नये.
  • माती व पाण्याचा वापर नेहमी तपासणीनंतर करावा.
  • जमीन जास्त क्षारयुक्त असल्यास क्षार संवेदन पिकांचा वापर करावा.
  • सूक्ष्म जलसिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • क्षार व चोपण जमिनीसाठी पिकांची संवेदनशीलता

    जमिनीचा प्रकार क्षार संवेदनशील  मध्यम सहनशील जास्त सहनशील
    अन्नधान्य पिके उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा, तीळ  गहू, बाजरी, मका, मोहरी, करडई, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस ऊस, कापूस, भात
    भाजीपाला पिके चवळी, मुळा, श्रावणघेवडा  कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर पालक, शुगरबिट
    फळ पिके आंबा, लिंबूवर्गीय पिके चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्ष नारळ, बोर, आवळा  
    वन पिके साग, सिरस, चिंच  लिंबू, बाभूळ विलायती बाभूळ, सुरू, सिसम, निलगिरी
    चारा पिके  ब्ल्यू पॅनिक, पांढरे व तांबडे फ्लोअर पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत लसूणघास, बरसीम, ऱ्होडस गवत.

      क्षारयुक्त पाण्याचा वापर करताना 

  • पिकामध्ये वेळोवेळी उताराच्या दिशेने खोल नांगरट, आंतरमशागत करावी.
  • पीक लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी.
  • रासायनिक खतामध्ये नत्रयुक्त खताचा वापर शिफारशीपेक्षा २५ टक्यांनी जास्त करावा.
  • सरीमध्ये पाचाटासारख्या आच्छादनाचा वापर करावा.
  • मोकाट पाण्याचा वापर करू नये.
  • ठिबक संचाचा वापर विद्राव्य क्षारांची मात्रा ३.१२ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असल्यास करावा.
  • क्षार सहनशील पिकांची लागवड करावी. उदा. गहू, ज्वारी, सूर्यफूल, कापूस इ.
  • पाणी जास्त क्षारयुक्त असल्यास निलगिरी, बांबू लागवड करावी.
  • जमीन क्षारपड होण्याची कारणे 

  • भारी चिकण माती, अतिखोल काळ्या निचरा कमी असलेल्या जमिनीस अतिरिक्त पाण्याचा वापर जास्त केल्यामुळे जमिनी क्षारपड होतात.
  • अति उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही. त्यामुळे जमिनी क्षारपड होतात.
  • सिंचनास क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढते.
  • कालव्याच्या पाझरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षारयुक्त व चोपण होतात.
  • जास्त पाणी लागणारी पिके वारंवार घेतल्याने, फेरपालट न केल्याने जमिनी क्षारपड होत जातात.
  • नैसर्गिक नाले, ओढे बुजवून जमिनीची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी होतो.
  • संपर्क : डॉ. पपिता गौरखेडे, ८८३०६९४१६३ (सहायक प्राध्यापक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT