नाव ः रमेश राजाराम गुरव
गाव ः कोकिसरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र ः१५ एकर
काजू लागवड ः ४ एकर (झाडे ४००)
माझी कोकिसरे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे १५ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी ४ एकरांवर वेंगुर्ला-४ आणि वेंगुर्ला-७ या जातींची प्रत्येकी २०० झाडे आहेत. संपूर्ण लागवड ७ बाय ७ मीटर अंतरावर केली आहे.
व्यवस्थापनातील बाबी
जून महिन्यात प्रत्येक झाडाला शेणखत, सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. पुढे ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर रासायनिक खतांचा दुसरा डोस दिला जातो.मी बागेत तणनियंत्रण आणि बाग स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर देतो. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रास कटरने बागेतील गवत काढून घेतले.ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर झाडाला पालवी येण्यास सुरुवात होते. या कालावधीत टी मॉस्किटो बगचा (पिठ्या ढेकूण) प्रादुर्भाव दिसून येतो. फवारणीपूर्वी बागेतील झाडांचे निरीक्षण केले जाते. प्रादुर्भाव दिसताच शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारणीचे नियोजन केले जाते.साधारण नोव्हेंबर महिन्यात झाडांना मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते. या काळात फुलकिड्यांसह विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव पाहून तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते.डिसेंबर महिन्यात काजू बी आकार घेण्यास सुरुवात होते. या काळात बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बागेचे वेळोवेळी निरिक्षण करून त्यानुसार फवारणीचे नियोजन करतो. या वर्षी वातावरण बदलामुळे डिसेंबर महिन्यात फवारणी घ्यावी लागली. आतापर्यंत कीटकनाशकांच्या साधारण तीन फवारण्या घेतल्या आहेत.सध्या काजू हंगाम सुरू झाला असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम सुरू राहील.झाडावरून पडलेली काजू बी गोळा करणे, ती बोंडापासून वेगळी करून स्वच्छ पाण्यातून धुऊन ठेवणे हे काम सुरू आहे. त्यानंतर काजू बी सुकवून प्रतवारी करून विक्री केली जाईल.काजू हंगाम संपल्यानंतर झाडाखाली पडलेला पालापाचोळा गोळा करून खड्ड्यात टाकला जाईल. पुढे पावसाळ्यात हा पालापाचोळा कुजतो.मागील चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्याचा झाडांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अजूनही ढगाळ वातावरण कायम आहे. वातावरण निवळल्यानंतर संपूर्ण बागेची पाहणी करून आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन आहे.